Saturday, September 14, 2024
Homeनगरवाकडीत एकाच रात्री पाच मंदिरांमध्ये चोरी

वाकडीत एकाच रात्री पाच मंदिरांमध्ये चोरी

चोरट्यांना तातडीने अटक करण्याची ग्रामस्थांची मागणी

- Advertisement -

वाकडी (वार्ताहर) – राहाता तालुक्यातील वाकड़ी गावात व परिसरातील शेतीमधील शेती उपकरणे चोरीचा तपास अजून लागलेला नसताना आता मात्र थेट वाकडी गावातील भरवस्तीमधील असलेल्या पाच मंदिरांमध्ये दानपेट्या फोडून चोरी करण्यात आली. चोरट्यांनी तीन दानपेट्या फोडल्या तर दोन दानपेट्या सोबत घेऊन गेले. अशा प्रकारची चोरी या चोरट्यांनी पोलिसांना एक प्रकारे उघड चेतावणीच दिली आहे. यामुळे मंध्यतरी थांबलेले चोरीचे सत्र पुन्हा चालू झाल्याचे चित्र दिसत आहे. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाकडी गावातील लक्ष्मी नारायण मंदिर, दत्त मंदिर, सावता मंदिर, हनुमान मंदिर, नारायणगिरी महाराज मंदिर या पाच मंदिरांकडे चोरट्यांनी आपला मोर्चा वळविला. सर्वप्रथम चोरट्यांनी दरवाजे तोडून सावता मंदिर व लक्ष्मी नारायण मंदिरमधील दानपेटी सोबत नेली. तसेच लक्ष्मी नारायण मंदिरासमोर असलेली सौर बॅटरी देखील या चोरट्यांनी चोरून नेली. सदरची घटना पहाटे दरम्यान घडली असावी.

सकाळी संबंधित मंदिरात काकडा भजन व पूजेसाठी येणार्‍या भाविकांना हा प्रकार समजताच एक एक करून पाच मंदिरामध्ये चोरीची घटना घडली असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तातडीने श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे यांनी श्वानपथक, अंगठे तज्ज्ञ पथक बोलावले. यातील श्वानपथकने साई मंदिर लगत असलेल्या दत्त मंदिरापासून सावता मंदिर व लक्ष्मी नारायण मंदिर ते वाकड़ी श्रीरामपूर रस्त्यावर माग काढला. यावरून चोरट्यांनी गावातील दानपेटी फोडून शेवटी श्रीरामपूर रस्त्यावरील लक्ष्मी नारायण मंदिरची पेटी फोडून दुचाकी किंवा चारचाकीने तेथून पलायन केले असावे.

दरम्यान दीपावलीपासूनच गावातील वाड्यावस्त्यांवरील शेतातील मोटार, स्प्रिंकलर गन चोरीच्या घटनांत मोठी वाढ झाली आहे. अंधाराचा फायदा घेत अज्ञात चोरटे शेतातील स्प्रिंकलर गन चोरून नेतात. गणाचे लोखंडी पाईप कट करून जवळच शेतात किंवा विहिरीत टाकून देतात. वाकडीतील लांडेवाडी भागात तसेच बरडवस्ती भागात अशाच प्रकारे चोरी करण्यात आली आहे.

यामुळे नागरिकांसह शेतकरी वर्ग देखील हवालदिल झाला आहे. गावात चोरट्यांची दहशत वाढत चालली का? असा संतप्त सवाल नागरिकांमधून व्यक्त होत आहे. त्यातच आता मंदिरांच्या दानपेट्याच्या चोरीमुळे वाकडीत पुन्हा एकदा खळबळ निर्माण झाली आहे.

सदर घटनेचा पोलिसांनी त्वरीत तपास करुन चोरट्यांना अटक करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गावातील सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा चालू करावेत
श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे तात्कालीन पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्या संकल्पेतून सुरक्षा कारणास्तव गावात सीसी टीव्ही यंत्रणा राहाता तालुक्यातील वाकडी गावात पहिली कार्यान्वित करण्यात आली होती. ही यंत्रणा बसवल्यानंतर गावातील घडणारे चोरीच्या गुन्ह्यांना मोठ्या प्रमाणात आळा बसला होता. पण सध्या ही यंत्रणा बंद आहे. गावातील मुख्य रस्त्यावर ही यंत्रणा चालू केली होती. परत ही यंत्रणा चालू करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या