नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
वक्फ दुरुस्ती विधेयकाला संयुक्त संसदीय समितीने (जेपीसी) मंजुरी दिली आहे. यात एकूण १४ बदल करण्यात आले आहेत. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा अहवाल सभागृहात सादर केला जाईल. आज झालेल्या संयुक्त समितीच्या बैठकीत या विधेयकासंदर्भात सत्ताधाऱ्यांनी मांडलेल्या १२ सुधारणा मंजूर करण्यात आल्या असून विरोधी खासदारांनी मांडलेल्या ४४ सुधारणा फेटाळण्यात आल्या.
प्रस्तावित वक्फ बोर्ड विधेयकावर सखोल चर्चा करण्यासाठी ते संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आले. यावर दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत मोठी खडाजंगी पाहायला मिळाली. या वादानंतर बैठकीत समितिचे अध्यक्ष जगदम्बिका पाल यांच्यावर हुकुमशाही कारभार करत असल्याचा आरोप विरोधी खासदारांकडून करण्यात आला. यावर गोंधळ घालणाऱ्या १० खासदारांना दिवसभरासाठी निलंबितही करण्यात आले होते.
वक्फ दुरुस्ती विधेयकाची तपासणी करत असलेल्या संयुक्त संसदीय समितीने सोमवारी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सदस्यांनी प्रस्तावित केलेल्या सर्व दुरुस्त्या स्वीकारल्या आहेत. तर, विरोधी सदस्यांनी मांडलेल्या सर्व दुरुस्त्या फेटाळून लावल्या आहेत. बैठकीनंतर समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी पत्रकारांशी संवाद साधत समितीने स्वीकारलेल्या सुधारणांमुळे कायदा अधिक चांगला आणि प्रभावी होईल, असे त्यांनी म्हटले आहे.
या बैठकीत विरोधी पक्षांनी मांडलेल्या सर्व ४४ सुधारणा फेटाळण्यात आल्यामुळे विरोधकांवर अन्याय झाल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यावरही जगदम्बिका पाल यांनी उत्तर दिले. “या विधेयकावर प्रत्येक कलमानुसार चर्चा करण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी विरोधी पक्षांकडून मांडण्यात आलेल्या सर्व ४४ सुधारणा मी त्यांच्या नावासकट वाचून दाखवल्या. मी त्यांना विचारले की त्यांना या सुधारणा सुचवायच्या आहेत का? त्यानंतर त्या मांडल्या गेल्या. ही प्रक्रिया याहून अधिक लोकशाही पद्धतीने होऊ शकली नसती”, अस जगदम्बिका पाल म्हणाले.
“जर सुधारणा मांडल्या गेल्या आहेत आणि त्यांच्या बाजूने फक्त १० सदस्यांनी मत नोंदवले आहे, तर मग अशा सुधारणा मंजूर होऊ शकतात का? संसद असो की संयुक्त संसदीय समिती असो, ही प्रक्रिया तितकीच नैसर्गिक आहे”, असेही जगदम्बिका पाल यांनी नमूद केले.
समितीसमोर बदलांसाठी एकूण ४४ प्रस्ताव सादर करण्यात आले होते, परंतु केवळ १४ प्रस्तावांनाच मंजुरी देण्यात आली. पाल म्हणाले, विरोधी सदस्यांनी विधेयकाच्या सर्व ४४ कलमांमध्ये शेकडो सुधारणा प्रस्तावित केल्या होत्या, परंतु त्या मतदानाद्वारे फेटाळण्यात आल्या. भाजपच्या सर्व 10 प्रस्तावांना मंजूरी – बैठकीत भाजप खासदारांनी १० दुरुस्त्या सुचवल्या होत्या आणि सर्व दुरुस्त्या मंजूर करण्यात आल्या. याच वेळी, विरोधकांकडून अनेक दुरुस्त्यादेखील मांडण्यात आल्या, परंतु मतदानानंतर त्या सर्व फेटाळण्यात आल्या. विरोधकांनी मांडलेल्या सर्व दुरुस्त्या १०-१६ मतांनी फेटाळण्यात आल्या. तर, भाजपच्या सर्व दुरुस्त्या १६-१० मतांनी स्वीकारण्यात आल्या आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा