Friday, May 3, 2024
Homeअग्रलेखइशारा गंभीर, सावधगिरी तर हवीच!

इशारा गंभीर, सावधगिरी तर हवीच!

महाराष्ट्रात पंधरा जिल्हे उष्माघात प्रवण आहेत. 2016 पुर्वी हीच संख्या सात होती. राज्यातील उष्माघातप्रवण जिल्ह्यांची संख्या वाढत आहे. राज्याच्या आपत्ती विभाग व्यवस्थापनाच्या कृती आराखड्यात ही माहिती देण्यात आली आहे. गेल्या 25 वर्षांपासून उष्णतेच्या लाटेचे काय परिणाम होत आहेत याचा सर्व जिल्ह्यात तौलनिक अभ्यास केला जात आहे. सलग दोन दिवस सामान्य तापमानात 4.5 सेल्सियसपेक्षा जास्त तापमानाची वाढ झाली तर ती उष्णतेची लाट समजावी आणि त्याला सामोरे जाण्यासाठी सज्ज राहावे असे आदेश दिले गेले आहेत. 36 जिल्ह्यांपैकी 24 जिल्ह्यात सरासरी तापमान 40 सेल्सियसपेक्षा अधिक राहिल्याची माहिती कृती आराखड्यात नमुूद आहे. उष्णतेच्या लाटेची चुणूक लोकांनी फेब्रुवारी महिन्यातच अनुभवली. यंदाचा फेब्रुवारी महिना 123 वर्षातील ‘सर्वाधिक उष्ण महिना’ ठरल्याचे सांगितले जाते. वाढत्या उष्णतेचे निसर्गावर आणि मानवी जीवनावर गंभीर परिणाम होतात. वाढत्या तापमानामुळे भुस्खलन होऊ शकते असे तज्ञ सांगतात. राज्यातील 11 जिल्ह्यांना भुस्खलनाचा धोका असल्याचा अहवाल ‘इस्त्रो’ने जाहीर केला आहे. या जिल्ह्यांना सर्वाधिक धोका आहे. अचानक झालेले भूस्खलन किती धोकादायक असते याचा अनुभव लोकांनी घेतला आहे. आंबेगाव तालुक्यातील माळीण गाव एका रात्री अचानक डोंगराच्या उदरात गडप झाले. या घटनेची अनेक कारणे वर्तवली गेली. तीव्र उन्हाळा आणि जोरदार पाऊस यामुळे खडक दुभंगतात हे त्यापैकी एक कारण होते. तेव्हा, उष्णतेची लाट आणि भुस्खलनाचा संभाव्य इशारा शासन गंभीरपणे घेईल आणि आपत्ती निवारणाचा आराखडा तयार ठेवेल अशी जनतेची अपेक्षा असेल. वाढत्या तापमानाचे जलसाठ्यावर विपरित परिणाम होतात. पाण्याचे वेगाने बाष्पीभवन होते. नाशिक जिल्ह्यासह राज्याच्या आदिवासी भागातील अनेक गावांना पाणीटंचाई जणू त्यांच्या पाचवीला पुजली आहे. पावसाळ्यात धोधो पाऊस पडतो आणि पावसाळा संपता संपता पाणीटंचाईची चाहूल लागते. राज्यातील धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा असल्याचे सांगितले जाते. तथापि उष्णतेच्या लाटेचा इशारा आणि हंगामी पावसावर परिणाम करणार्‍या एल निनोचा इशारा लक्षात घेतला पाहिजे. तसे झाले तर पाणीटंचाईग्रस्त गावांची संख्या वाढू शकेल. कदाचित काही गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ शकेल. असे झाले तर ती परिस्थिती शासन कशी हाताळणार? पशुधन आणि वन्यजीवांचाही विचार करावा लागेल. त्यांच्या चारापाण्याची व्यवस्था तयार ठेवावी लागेल. आपत्ती व्यवस्थापन आणि इस्त्रोचा इशारा फक्त शासनापुरता मर्यादित नाही. लोकांनीही तो गंभीरपणे घ्यायला हवा. मानवी आरोग्यावरही उष्माघाताचे परिणाम होतात. उष्माघात प्रसंगी जीवघेणा देखील ठरू शकतो. तेव्हा वाढत्या उष्णतेचा सामना करण्याची तयारी ठेवायला हवी. भरपूर पाणी पिणे, शक्यतो कडक उन्हात फिरणे टाळणे, आवश्यकच असेल तर उन्हाच्या झळांपासून बचाव करणे, सकस आणि ताजा आहार घेणे, पाणीदार फळे खाणे, फॅशनेबल पोशाख न घालता कॉटनचे कपडे घालणे हे त्यापैकीच काही उपाय! तरीही उष्माघाताचा त्रास जाणवलाच तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. ‘सरकार काही करत नाही’ हा ठपका खोडून काढण्याची संधी उपरोक्त दोन्ही अहवालांनी शासनाला दिली आहे. त्याचे सोने केले जाईल का? ReplyReply allForward

Displaying IMG-20230407-WA0290.jpg.

- Advertisment -

ताज्या बातम्या