वैजापूर |प्रतिनिधी| Vaijapur
भ्रष्टाचाराच्या विरोधात सातत्याने मोहीम राबवत असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-Corruption Department) छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यामध्ये एक मोठी कारवाई करत प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.
वैजापूर जलसंधारण विभागातील (Water Conservation Department) एका वर्ग-1 अधिकार्याला 7,000 रुपयांची लाच (Bribe) स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. विशेष म्हणजे, तंत्रज्ञानाचा वापर करत हा लाचेचा व्यवहार ऑनलाईन माध्यमाद्वारे करण्याचा प्रयत्न या अधिकार्याच्या अंगाशी आला आहे. निखिल अशोक कवाडे (वय 33) असे या अटक (Arrested) करण्यात आलेल्या उपविभागीय जलसंधारण अधिकार्याचे नाव आहे.
या प्रकरणातील 35 वर्षीय तक्रारदार यांची टूर्स अॅन्ड ट्रॅव्हल्सची एजन्सी आहे. त्यांनी आपली बोलेरो गाडी जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत येणार्या वैजापूर जलसंधारण विभागाला (Vaijapur Water Conservation Department) मासिक भाडेतत्त्वावर दिली होती. या गाडीचे भाड्याचे बिल प्रलंबित होते. हे प्रलंबित बिल तयार करणे, एम.बी. बुक, लॉग बुक आणि काँटीजेन्सी बिल यावर स्वाक्षरी करून ते अंतिम मंजुरीसाठी मुख्य कार्यालयाकडे पाठवणे, हे काम निखिल कवाडे यांच्या अखत्यारीत होते. मात्र, हे हक्काचे बिल पुढे पाठवण्यासाठी कवाडे यांनी तक्रारदाराकडे 10 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. सरकारी काम करण्यासाठी अशा प्रकारे पैशांची मागणी झाल्याने तक्रारदार संतप्त झाले आणि त्यांनी लाच न देण्याचा निर्णय घेत थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय गाठले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या तक्रारीची गंभीर दखल घेत 7 मार्च 2026 रोजी सापळा रचला. विभागाच्या पथकाने आधी लाचेच्या मागणीची पंचांसमक्ष पडताळणी केली. या पडताळणी दरम्यान, आरोपी निखिल कवाडे याने 10,000 रुपयांची मागणी करून तडजोडीनंतर 7,000 रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. तक्रारदाराने जसे 7,000 रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले, लगेच एलसीबीच्या पथकाने कवाडे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सॅमसंग कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला असून, त्यातील डिजिटल व्यवहारांचे विश्लेषण सध्या सुरू आहे.
ही यशस्वी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी केदार कांगणे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. राजीव तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सापळा पथकाचे नेतृत्व पोलीस उपअधीक्षक बाळासाहेब सदाशिव शिंदे यांनी केले, तर पोलीस निरीक्षक वाल्मिक कोरे हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. पथकामध्ये अनवेज शेख, प्रकाश डोंगरदिवे आणि चांगदेव बागुल या पोलीस अंमलदारांचा समावेश होता. आरोपी निखिल कवाडे याच्या घरातील झडतीचे कामही रात्री उशिरापर्यंत सुरू होते.




