Sunday, May 19, 2024
HomeनाशिकNashik News : येवला,निफाड,मनमाडसाठी करंजवण धरणातून रब्बीसाठी आर्वतन सुरु

Nashik News : येवला,निफाड,मनमाडसाठी करंजवण धरणातून रब्बीसाठी आर्वतन सुरु

ओझे l विलास ढाकणे |Oze

दिंडोरी तालुक्यातील (Dindori Taluka) सर्वात मोठे व येवला, मनमाडसह निफाड तालुक्यातील शेतीसह पिण्याच्या पाण्याची तहान भागविणाऱ्या करंजवण धरणातून (Karanjwan Dam) रब्बी हंगामातील पिके व पिण्याच्या पाण्यासाठी करंजवण धरणातून कादवा नदीद्वारे पालखेड धरणामध्ये (Palkhed Dam) पहिले आवर्तन सोडण्यात आले आहे. पालखेड धरणामध्ये नियोजित पाणीसाठा झाल्यानंतर पुढे निफाड, येवला व मनमाड शहरासाठी पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती करंजवण धरण शाखा अभियंता शुभम भालके व पालखेड धरण शाखाअभियंता सुदर्शन सानप यांनी दिली…

- Advertisement -

सध्या करंजवण धरणाच्या दोन गेटमधून ६०० क्युसेक्स तर जलविद्युत प्रकल्पातून ४०० क्युसेक्स पाणी कादवा नदी पात्रात सोडण्यात आले आहे. चालू वर्षी दिंडोरी तालुक्यासह निफाड, येवला, नादगाव (मनमाड) तालुक्यात अत्यअल्प पाऊस पडल्यामुळे दुष्काळी परिस्थिती असून खरीप हंगाम वाया गेला असून चालू वर्षीच्या रब्बी हंगामासाठी दिंडोरी तालुक्यातील धरणामधून एक आर्वतन मिळणार असल्याचे पाटबंधारे विभागाने घोषित केल्यामुळे निफाड, येवला तालुक्यातील (Yeola Taluka) शेतकरी (Farmer) वर्गामध्ये चिंतेचे वातावरण पाहण्यास मिळत आहे. चालू वर्षी पाटबंधारे विभागकडून पाण्याचे योग्य नियोजन करण्याची आवश्यकता निर्माण झाली असून येवला,निफाड तसेच पुढे जाणाऱ्या पाणीचे काटेकोर पणे नियोजन केले तर कडक उन्हाळ्यामध्ये येवला, मनमाड शहाराना पुरेसे पाणी मिळू शकते.

त्याचप्रमाणे करंजवण धरणातून सोडण्यात येणा-या आवर्तनाचा कालावधी मोठा असल्यामुळे दिंडोरी तालुक्यातील कादवा नदी काठावर असणा-या गावामध्ये पाण्याची तीव्र स्वरूपाची पाणी टंचाई निर्माण होणार यात शंका नाही. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधीनी तालुक्यातील पाणी टंचाई संदर्भात आताच नियोजन करण्याची आवश्यकता आहे कारण कादवा नदी पात्र कोरडे पडल्यास गावानां पाणी पुरवठा करणा-या पाणी योजना कोरड्या पडतात त्यांमुळे गावामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण होते यासाठी आताच योग्य नियोजन करण्याची आवश्यकता आहे. चालू वर्षी आताच करंजवण धरण क्षेत्रातील कृषीपंपवर पाटबंधारे विभागाकडून नियंत्रण ठेवण्यात आले असून दृष्काळी परिस्थिती असल्यामुळे पाण्याचा जपून वापर करण्याच्या सूचना शेतकरी वर्गाला देण्यात आल्या आहे.

देशाच्या अर्थव्यवस्थेत नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नोंद – शरद पवार

करंजवण जलविद्युत प्रकल्पातून विज निर्मिर्ती सुरु

करंजवण धरणावरील जलविद्युत प्रकल्प चालू वर्षी सुरळीतपणे सुरु झाला असून या जलविद्युत प्रकल्पांतून तीन मेगावॅट विज निर्मिर्ती सुरु झाली आहे. ही तयार झालेली वीज येथून जवळ असलेल्या महावितरणच्या लखमापूर उपकेंद्रात सोडली जात असल्यामुळे स्थानिकाना या जलविद्युत प्रकल्पाचा फायदा होत आहे. हा जलविद्युत प्रकल्प पाण्याच्या रोटेशन पद्धतीवर अवलंबून असल्यामुळे जेव्हा धरणातून पाणी सोडण्यात येते तेव्हाच हा प्रकल्प चालू होतो. मागील वर्षी काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा प्रकल्प बंद होता. मात्र,चालू वर्षी या जलविद्युत प्रकल्पाची दुरुस्ती होऊन सध्या जलविद्युत प्रकल्पातून ४०० क्युसेक्स पाणी सोडल्यामुळे विजनिर्मिती सुरुवात झाली आहे.

करंजवण धरणावर बैठक संपन्न

करंजवण धरणावर या वर्षीच्या दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने पालखेड पाटबंधारे विभागाच्या वतीने उपविभागीय अभियंता निलेश वन्नेरे यांच्या अध्यक्षतेखाली व करंजवण धरण शाखा अभियंता शुभम प्रकाश भालके यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीला करंजवण धरणावरील उपसाधारक शेतकरी तसेच उपसा संस्थांचे संचालक उपस्थित होते. सदर बैठकीत उपस्थित करंजवण धरणाच्या फुगवट्यावरील करंजवण, खेडले, पिंपरखेड, कोकणगाव, ओझे, उमराळे खुर्द, नळवाडी, निगडोळ तसेच नदीवरील म्हेळूस्के व ओझे येथील लाभधारक शेतकऱ्यांनी या वर्षाची दुष्काळी परिस्थिती पाहता करंजवण धरणातील पाणी जपून वापरण्याची हमी दिली व जलसंपदा विभागास शेतकऱ्यांमार्फत संपूर्ण सहकार्य करण्यात येईल असे आश्वस्त केले.

दिंडोरी तालुक्यातील धरणाचा आजचा पाणीसाठा

करंजवण ९३ टक्के

पालखेड ५१ टक्के

पुणेगाव ६९ टक्के

वाघाड ८९ टक्के

ओझरखेड ८२ टक्के

तिसगाव ६५ टक्के

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या