श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
शहराची गरज लक्षात घेऊन महायुती सरकारने वाढीव पाणी पुरवठा योजनेला मंजूरी दिली आहे. 178 कोटी रुपयांच्या निधीतून कार्यान्वित होणार्या पाणी पुरवठा योजनेचे काम निश्चित वेळेत पूर्ण होण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याबाबत जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सूचना दिल्या.
श्रीरामपूर पालिकेच्या वतीने विकसित करण्यात येत असलेल्या शहराच्या वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या कामाची पाहणी त्यांनी अधिकारी व पदाधिकार्यांच्या समवेत केली. महायुती सरकारने या योजनेच्या कामाला केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून 178 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. 2051 सालची लोकसंख्या गृहीत धरून 26.36 लाख लिटर पाणी प्रतिदिन लागण्याची शक्यता गृहीत धरून योजनेचा आराखडा तयार करण्यात आला आहे.
सद्य परिस्थितीत जल शुद्धीकरण केंद्राचे आरसीसी डिझाइन प्रमाणे फिल्टर बेडचे खोदकाम पूर्ण झाले असून दगडी सोलिंग व क्रॅकींटचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी दिली. पाणी योजनेतील नवीन उंच जलकुंभाचे काम जुन्या टाकीचे बांधकाम पाडल्यानंतर हाती घेण्यात येणार असून, वितरण व्यवस्थेसाठी 59 किमी पाईपलाईनच्या कामापैकी 17 किमी पूर्ण झाले असल्याचे या पाहणी दरम्यान सांगण्यात आले.
पाणी योजनेकरिता तलावाचे सर्वेक्षण पूर्ण करून बोअर कोअर चाचणी करण्यात आली आहे. तलावाचे खोलीकरण हे निर्धारित वेळेत पूर्ण करून आर.सी.सी. काम करण्यात येणार आहे. तलावात आर.सी.सी. काम पूर्ण झाल्यानंतर तळातील मातीचा थर, प्लास्टिक शीट, वाळूचा थर इत्यादी काम पूर्ण करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे.
योजनेतील सर्व काम कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत, अशी आशा पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश ना. विखे पाटील यांनी दिले.
वाढीव पाणी पुरवठा योजना शहराच्या भविष्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण असल्याने सामाजिक भावना लक्षात घेऊन योजनेचे काम दिलेल्या कालावधीत पूर्ण करण्याची काळजी पालिकेच्या अधिकार्यांनी घेण्याचे आवाहन ना. विखे पाटील यांनी केले.
यावेळी प्रांताधिकारी किरण सावंत पाटील, मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.




