Sunday, November 29, 2026
HomeनगरAhilyanagar : रखडलेल्या पाणी योजनांना 350 कोटींचे बळ!

Ahilyanagar : रखडलेल्या पाणी योजनांना 350 कोटींचे बळ!

धरणातील पाणीवाटपाच्या नियोजनाला धक्का नाही

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन पाणीटंचाई निवारणासाठी प्रशासनाने आता रखडलेल्या पाणीपुरवठा योजनांवर लक्ष केंद्रित केले आहे. जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या 75 टक्क्यांपेक्षा अधिक पूर्ण झालेल्या पाणी योजनांची कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी तब्बल 350 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. त्याचवेळी धरणातील यापूर्वी निश्चित केलेल्या पाणीवाटपाच्या नियोजनात कोणताही बदल अथवा हस्तक्षेप होणार नसल्याचे स्पष्ट करीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाणीटंचाईच्या प्रश्नावर प्रशासनाला कामाला लावले आहे. जिल्ह्यातील सर्व पाणी योजनांची प्रत्यक्ष पाहणी करून आठ दिवसांत वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

- Advertisement -

जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हास्तरीय टंचाई आढावा बैठक झाली. विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्यासह आ. सुनील कर्जतकर, विठ्ठलराव लंघे, काशीनाथ दाते, मोनिका राजळे, अक्षय कर्डिले, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे आमदार प्राजक्त तनपुरे, विक्रम पाचपुते आणि हेमंत ओगले सहभागी झाले.

जिल्ह्यात अनेक पाणी पुरवठा योजना अपूर्ण अवस्थेत आहेत. या योजनांवर कोट्यवधींचा खर्च करूनही त्या प्रत्यक्षात सुरू झालेल्या नसल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आता केवळ बांधकाम पूर्ण करण्यापेक्षा योजनेचा पाणीस्रोत किती काळ टिकणार, याचीही तपासणी करण्याचे निर्देश विखे पाटील यांनी दिले. एखाद्या योजनेवर खर्च केल्यानंतर महिनाभरातच पाण्याचा उद्भव आटणार असेल, तर अशा योजनेवर खर्च करण्यापूर्वीच त्याची शहानिशा करावी, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. जिल्हा परिषद, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि पाणीपुरवठा विभागाने सर्व योजनांची प्रत्यक्ष पाहणी करावी. पाण्याची उपलब्धता, वितरण व्यवस्था, दुरुस्तीची कामे आणि पर्यायी स्रोत यांचा समावेश असलेला अहवाल आठ दिवसांत सादर करावा.

अनधिकृत उपसा रोखण्यासाठी वीजजोडण्या तोडणार
धरणे आणि तलाव क्षेत्रातील अनधिकृत वीजजोडण्या तातडीने खंडित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पाण्याचा अनधिकृत उपसा रोखण्यासाठी ही कारवाई महत्त्वाची ठरणार आहे. टँकरसाठी वापरल्या जाणार्‍या प्रत्येक पाणीस्रोताचा उपलब्ध साठा तपासून त्यातून आणखी किती दिवस पाणीपुरवठा शक्य आहे, याचा अंदाज घ्यावा. पाणीस्रोत संपण्याची वेळ येण्यापूर्वीच पर्यायी व्यवस्था उभी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

टँकरच्या पाण्यावर आता लोकेशनचा पहारा
टँकरद्वारे होणार्‍या पाणीवाटपात प्रशासनाने देखरेखीची यंत्रणा अधिक कडक करण्याचे ठरविले आहे. टँकर गावात पोहोचल्यानंतर तलाठी आणि ग्रामसेवकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून पाणीवाटपावर लक्ष ठेवावे. टँकर दाखल होताच लोकेशन आधारित छायाचित्र काढावे. प्रत्यक्ष पाणीपुरवठा झाला की नाही, याची खात्री करूनच वितरणाची नोंद करावी. नागरिकांना ठरलेल्या वेळेत आणि प्रमाणात पाणी मिळण्याची जबाबदारी संबंधित अधिकार्‍यांची असेल.

टँकर भरणा केंद्रांवर शुद्धीकरण यंत्रणा
जिल्ह्यात सध्या पाच ठिकाणी कॅनलमधून टँकरमध्ये पाणी भरले जात आहे. या पाचही ठिकाणी सुमारे 30 लाख रुपये खर्चून पाणीशुद्धीकरण यंत्रणा बसविण्यात येणार आहे. त्यामुळे टँकरमधून नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध होण्यास मदत होईल. गावोगावी खरेदी केलेल्या पाण्याच्या टाक्यांना तोट्या बसवून त्याद्वारे पाणी वितरण करण्याचेही नियोजन आहे.

चाराटंचाईवर हायड्रोपोनिकचा पर्याय
पाणीटंचाईबरोबरच जनावरांच्या चार्‍याचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यासाठी हायड्रोपोनिक पद्धतीने चारा निर्मितीला प्रोत्साहन देण्याचे निर्देश देण्यात आले. शासकीय कार्यालयांत प्रात्यक्षिके आयोजित करून शेतकर्‍यांना या तंत्रज्ञानाची माहिती द्यावी. इच्छुक शेतकर्‍यांचे सर्वेक्षण करावे, तसेच दूध उत्पादक संस्थांच्या माध्यमातून या पर्यायाचा प्रचार करावा, असे विखे पाटील यांनी सांगितले.

टंचाई उपाययोजनांची माहिती गावागावात पोहोचवा : शिंदे
विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी उपलब्ध पाण्याचे सूक्ष्म नियोजन करण्याची गरज व्यक्त केली. प्रत्येक गावातील पाणीटंचाईची परिस्थिती वेगवेगळी असल्याने स्थानिक गरजेनुसार उपाययोजना राबविण्यावर भर द्यावा. शासन आणि जिल्हा प्रशासनाकडून टंचाई निवारणासाठी केल्या जाणार्‍या उपाययोजना, उपलब्ध सुविधा आणि निर्णयांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी व्यापक जनजागृती करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

ताज्या बातम्या

Chitra Wagh : शरद पवारांच्या भूमिकेचे कौतुक, तर रोहित पवारांवर निशाणा;...

0
नाशिक | Nashik सोमवार (दि.३० नोव्हेंबर) पासून संसदेचे विशेष अधिवेशन सुरू होणार असून, या अधिवेशनात केंद्र सरकारतर्फे मतदारसंघ पुनर्रचना (डिलिमिटेशन) विधेयकासह तीन विधेयके मांडण्यात येणार...