Thursday, May 2, 2024
Homeनाशिककुंभारीचे सरपंच भागवितात गावची तहान

कुंभारीचे सरपंच भागवितात गावची तहान

पालखेड मिरचीचे। वार्ताहर

गेल्या महिनाभरापूर्वीच कुंभारी गावाला पाणीपुरवठा करणार्‍या सर्व विहिरी व बोअरवेलेचे जलस्त्रोताचे पाझर पूर्णपणे बंद झाल्याने कुंभारी गावाला पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. त्यातच पालखेड डाव्या कालव्याला गेल्या दीड महिन्यापासून पिण्यासाठी पाणी न सोडल्याने महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती.

- Advertisement -

परिणामी ग्रामपंचायत सरपंच राजेंद्र जाधव यांनी आपल्या स्वमालकीच्या विहिरीतील पिण्याचे पाणी डॉ. भाऊसाहेब जाधव यांच्या स्वमालकीच्या पाईपलाईनद्वारे गावाला उपलब्ध करून दिल्याने गावाची तहान भागविली जात आहे.

गेल्या महिनाभरापूर्वीच कुंभारी गावाला पिण्याच्या पाण्याच्या समस्यांनी ग्रासले होते. महिलावर्गासह जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. यासाठी तत्काळ उपलब्ध होईल अशी कोणतीही उपाययोजना नसल्याने शेतातील द्राक्षशेती व इतर पिकांना पाणी देत सरपंच गावाची तहान गेल्या महिनाभरापासून भागवत आहेत. तीन हजाराच्या आसपास गावाची लोकसंख्या असल्याने पिण्याच्या पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.

दरवर्षी मे, जून महिन्यात कुंभारी गावाला तीव्र पाणीटंचाईच्या झळा बसतात. पाणी मागणीत वाढ झाल्याने यावर्षी त्याचा जास्त परिणाम दिसून आला. दिवसेंदिवस वाढणार्‍या लोकसंख्येचा विचार करता नागरीकांची पिण्याच्या पाण्याची मागणी वाढणार आहे. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी गावाला नव्याने पाणीपुरवठा योजना राबविणे गरजेचे आहे. सध्याची पाणीपुरवठा योजना कुचकामी ठरत असून गावाची सार्वजनिक मालमत्ता असलेल्या जागेत व ज्या ठिकाणी जलस्त्रोताचे पाझर आजही कार्यन्वित आहे अशा ठिकाणी नवीन विहिरींचे खोदकाम करून त्या ठिकाणापासून नविन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करता येवू शकत असल्याचे मत सरपंच राजेंद्र जाधव यांनी व्यक्त केले आहे.

नवीन योजनेसाठी पाठपुरावा करू

गावातील जनतेची पिण्याच्या पाण्याची तहान भागविण्यासाठी लवकरच नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम हाती घेऊन ते पूर्ण केले जाईल. आतापर्यंत ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य यांच्या सहकार्याने गावात विविध विकासकामे राबविली आहेत. शासनाच्या विविध योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहचल्या पाहिजे याला प्राधान्य दिले जात आहे.

बी.एच. कदम, ग्रामसेवक (कुंभारी)

- Advertisment -

ताज्या बातम्या