Thursday, June 25, 2026
Homeक्राईमAhilyanagar : लग्न आठ दिवसांवर असताना मोडले; हुंड्यासाठी अतिरिक्त मागणी

Ahilyanagar : लग्न आठ दिवसांवर असताना मोडले; हुंड्यासाठी अतिरिक्त मागणी

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

मुलीचे लग्न ठरल्यानंतर साखरपुडा करून लाखो रूपयांचा खर्च करवून घेतला, 11 तोळे सोन्याचे दागिने स्वीकारले आणि लग्न अवघ्या काही दिवसांवर आले असताना आणखी पाच लाख रूपयांची मागणी करत लग्न मोडल्याप्रकरणी पंढरपूर येथील चौघांविरूध्द येथील तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत अहिल्यानगर शहरातील बालिकाश्रम रस्ता परिसरात राहत असलेल्या 51 वर्षीय महिलेने मंगळवारी (23 जून) फिर्याद दिली आहे. त्यानुसार अभिजीत निवृत्ती जावळे, अलका निवृत्ती जावळे, आकांक्षा समर्थ कोकाटे व समर्थ कोकाटे (सर्व रा. पंढरपूर, जि. सोलापूर) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीच्या मुलीचे लग्न करण्यासाठी वधू-वर सूचक मंडळात नाव नोंदविण्यात आले होते. डिसेंबर 2025 मध्ये अलका जावळे हिने संपर्क साधून त्यांचा मुलगा अभिजीत हा शिक्षण क्षेत्रात नोकरीला असून विवाहासाठी इच्छुक असल्याचे सांगितले. त्यानंतर दोन्ही कुटुंबीयांची भेट झाली व जानेवारी 2026 मध्ये पंढरपूर येथे विवाहाबाबत बोलणी झाली. या चर्चेदरम्यान अलका जावळे हिने मुलगा सरकारी नोकरीत असून निर्व्यसनी असल्याचे सांगत 20 तोळे सोन्याच्या हुंड्याची मागणी केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

चर्चेनंतर 11 तोळे सोने देण्याचे ठरले. त्यानंतर 25 जानेवारी 2026 रोजी साखरपुडा पार पडला. साखरपुड्यावर सुमारे पाच लाख रूपयांचा खर्च करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, दोन्ही कुटुंबांच्या संमतीने 27 जून 2026 रोजी विवाह निश्चित करण्यात आला. लग्नापूर्वी कुलदेवतेसमोर ठेवण्याची प्रथा असल्याचे कारण देत जावळे कुटुंबीयांनी 11 तोळे सोन्याचे दागिने आधीच देण्याची मागणी केली. त्यानुसार 13 जून रोजी सुमारे 11 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मात्र त्यानंतर 14 जून रोजी अलका जावळे व अभिजीत जावळे यांनी फोनवरून फर्निचर, संसारोपयोगी भांडी, वरातीसाठी वाहने व डीजे व्यवस्थेसाठी आणखी 5 लाख रूपये खर्च करण्याची मागणी केली.

ही मागणी मान्य करण्यास नकार दिल्यानंतर अभिजीत जावळे याने आरेरावीची भाषा वापरत मागणी पूर्ण करणार नसाल तर लग्न मोडले समजा असे सांगितल्याचा आरोप करण्यात आला आहे. यानंतर 15 जून रोजी मध्यस्थांच्या माध्यमातून जावळे कुटुंबीयांनी हे लग्न होणार नसल्याचा निरोप दिला. त्या वेळी विवाहासाठी मंगल कार्यालय, केटरिंग, कपडे आदींसाठी मोठ्या प्रमाणावर बुकिंग करून आगाऊ रक्कम दिलेली होती तसेच नातेवाईकांना निमंत्रणपत्रिकाही वितरित झाल्या होत्या, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता

0
पुणे |प्रतिनिधी| Pune नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनची वाटचाल अतिशय वेगाने सुरू असून, बुधवारी (24 जून) मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापल्याची अधिकृत घोषणा हवामान शास्त्र विभागाने...