नाशिक | प्रतिनिधी | Nashik
मावळत्या वर्षाला हर्षोल्हासात निरोप देत नववर्षाचे स्वागत (Welcome New Year) फटाक्यांच्या आतषबाजीने पहाटेपर्यंत नाचत गाजत करण्यात आले. सर्वत्र पाट्यांचा जल्लोष तर दुसरीकडे व्यसनमुक्तीचा गजर झाला. सोशल मीडियावर (Social Media) नववर्ष शुभेच्छांचा अक्षरशः वर्षाव झाला. मध्यरात्री ठीक बारा वाजता ‘हॅपी न्यू इअर’चा जल्लोष झाला.
नववर्ष स्वागतासाठी सर्वच हॉटेल्समध्ये (Hotels) गर्दी होती. तरुणांचा वाढता जल्लोष, हॉटेलांवरील आकर्षक विद्युत रोषणाई, वाद्यांचा दणदणात अशा या उत्साही वातावरणात २०२४ या मावळत्या वर्षाला निरोप देत २०२५ या नववर्षाचे स्वागत जल्लोषात नागरिकांनी (Citizens) मध्यरात्री केले. थंडी वाढली असतानाही त्याची पर्वा न करता सर्वच जण नववर्ष स्वागतात रममाण झाले होते.संगीतमय कार्यक्रम, फटाक्यांची आतषबाजी आणि पार्थ्यांची रेलचेल रात्री उशिरापर्यंत सुरू होती. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी युवापिढी रस्त्यावर उतरली होती. मध्यरात्री ठीक बारा वाजता ‘हॅपी न्यू इअर’चा जल्लोष सुरू झाला. एकमेकांना नववर्ष शुभेच्छा देण्याची स्पर्धा सुरू होती.
दरम्यान, जगातील सर्वप्रथम न्यूझीलंड (New Zealand) या देशाने नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले. भौगोलिकदृष्ट्या सर्वात आधी दिवस सुरू होणाऱ्या न्यूझीलंडमधील ऑकलंड (Oakland) या शहरात नवीन वर्षाचे जंगी स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. ३१ डिसेंबर २०२४ च्या मध्यरात्री घड्याळात १२ वाजताच, न्यूझीलंडच्या लोकांनी नवीन वर्षाचे भव्य स्वागत केले आणि २०२५ मध्ये प्रवेश करणारा जगातील पहिला देश म्हणून साऱ्यांना सकारात्मक ऊर्जा दिली.