नाशिक । प्रतिनिधी Nashik
राज्यातील काही भागात मार्च महिन्याचे दुपारचे कमाल तापमान हे सरासरीपेक्षा अधिक तर उर्वरित महाराष्ट्रात सरासरी किंवा त्यापेक्षा खाली असण्याची शक्यता आहे.मुंबई सह संपूर्ण कोकण विभाग व वरील १२ जिल्ह्यात मार्च महिन्यात उष्णतेच्या लाटेची शक्यताही ४५ टक्के तर संपूर्ण उन्हाळ्याच्या ३ महिन्यात ६५ टक्के जाणवते.या आठवड्यात उत्तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरण तर उर्वरित महाराष्ट्रात दि.४,५ व ६ मार्च असे ३ दिवस उष्णतेची काहिलीही जाणवू शकते,असा अंदाज निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तविला आहे.
दुपारी ३ चे कमाल तापमान
मार्च महिना -महाराष्ट्रातील मुंबईसह संपूर्ण कोकण विभाग व नाशिक,नगर,पुणे, सातारा, कोल्हापूर,सांगली, अमरावती, अकोला,वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात मार्च २०२३ महिन्याचे दुपारचे कमाल तापमान हे सरासरीपेक्षा अधिक तर उर्वरित महाराष्ट्रात सरासरी किंवा त्यापेक्षा खाली असण्याची शक्यता ५५ टक्के जाणवते.
संपूर्ण उन्हाळा
– संपूर्ण २०२३ च्या उन्हाळ्यातील ३ महिन्यात मुंबई,ठाणे,रत्नागिरी जिल्ह्यात कमाल तापमान हे एकूण ३ महिन्याच्या सरासरी इतके तर उर्वरित महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता ४५ टक्के जाणवते.
पहाटे ५ चे किमान तापमान मार्च महिना
महाराष्ट्रातील लातूर,हिंगोलीपरभणी, नांदेड यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यात मार्च २०२३ महिन्याचे पहाटेचे किमान तापमान हे मार्च महिन्याच्या सरासरी इतके तर उर्वरित महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता ४५ टक्के जाणवते.संपूर्ण उन्हाळ्यात तीन महिने पहाटेचे किमान तापमान सोलापूर,मराठवाडा,बुलढाणा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात ३ महिन्याच्या सरासरी इतके तर उर्वरित महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता ४५ टक्के जाणवते.
उष्णतेची लाट
मुंबई सह संपूर्ण कोकण विभाग व वरील १२ जिल्ह्यात मार्च महिन्यात उष्णतेच्या लाटेची शक्यताही ४५ टक्के तर संपूर्ण उन्हाळ्याच्या ३ महिन्यात ६५ टक्के जाणवते.
मार्च महिन्याचा पाऊस
मार्च २०२३ महिन्यात नंदुरबार,धुळे, नाशिक, नगर, पुणे सातारा जळगाव बुलढाणा जिल्ह्यात मार्च महिन्याच्या पावसाच्या सरासरी पेक्षा कमी असण्याची तर उर्वरित जिल्ह्यात सरासरी पेक्षा अधिक असण्याची शक्यता ४५ टक्के जाणवते.
देशाच्या वायव्य राजस्थान तसेच दक्षिण पाकिस्तान दरम्यानची दिड कि.मी. उंची पर्यंतची चक्रीय वाऱ्याच्या स्थितीमुळे शनिवार दि. ४ मार्चपासुन त्यापुढील ५ दिवस नंदुरबार, धुळे,जळगांव, औरंगाबाद,मुंबई,ठाणे, नाशिक, नगर जिल्ह्यात केवळ ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता अधिक असुन क्वचितच तूरळक ठिकाणी अगदीच किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिक घाबरून न जाता शेतकामाच्या नियोजनात सावधानता बाळगावी. मात्र,दि. ४,५ व ६ मार्च असे ३ दिवस महाराष्ट्रात उष्णतेची काहिलीही जाणवू शकते.