Friday, October 11, 2024
HomeUncategorizedट्रम्प दौर्‍यातून काय साधणार ?

ट्रम्प दौर्‍यातून काय साधणार ?

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौर्‍यावर येत आहेत. अलीकडे भारताने रशियाकडून एस-400 क्षेपणास्त्रासह अन्य संरक्षण साहित्याची खरेदी करण्याचा करार केल्यामुळे ट्रम्प यांचे पित्त खवळले. मोदी यांचे कौतुक करताना भारताच्या नावे बोटे मोडायची, ही त्यांची जुनी खोड आहे. अमेरिकेत स्थित असलेल्या भारतीयांची मते निवडणुकीत मिळवण्याची व्यवस्था करण्यासाठी ते हा दौरा करत आहेत, हे लक्षात घ्यावे लागेल.

 प्रा. अशोक ढगे

- Advertisement -

कोणत्याही देशाचा अध्यक्ष दुसर्‍या देशाच्या दौर्‍यावर शिळोप्याच्या गप्पा मारायला नक्कीच जात नसतो. दोन देशांमधले संबंध वृद्धिंगत करणे, व्यापारी संबंध वाढवणे हा त्या दौर्‍याचा हेतू असतो. दौर्‍यामधून आपल्या देशाचा अधिकाधिक फायदा कसा होईल, हे पाहिले जाते. येत्या 24 तारखेला
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पत्नी मेलेनियासह भारत दौर्‍यावर येत आहेत. भारतभेटीवर येणारे ट्रम्प हे अमेरिकेचे सातवे अध्यक्ष आहेत. हा दौरा ट्रम्प आणि भारत दोन्हींसाठी अनेक कारणांनी महत्त्वाचा मानला जात आहे. ट्रम्प यांच्या दौर्‍यापूर्वीच भारताने रशियाकडून एस-400 क्षेपणास्त्रासह अन्य संरक्षण साहित्याची खरेदी करण्याबाबतचा करार केला. हा करार 16 अब्ज डॉलर्सचा आहे. त्यामुळे ट्रम्प यांचे पित्त खवळले असावे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करायचे आणि त्याचवेळी भारताच्या नावाने बोटे मोडायची, ही ट्रम्प यांची जुनी खोड आहे. दुसर्‍याला कस्पटासमान लेखण्याची त्यांची वृत्ती फेसबुकवरही आपण मोदी यांच्या पुढे आहोत, या अनावश्यक विधानावरून अलीकडेच दिसून आली. एकंदरीत, ट्रम्प यांचा हा दौरा वादळी ठरण्याची शक्यता आहे.

अहमदाबादमध्ये होणार्‍या ट्रम्प यांच्या स्वागतावरूनही वाद सुरू आहे. जगातल्या सर्वात मोठ्या स्टेडियमचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार असले तरी ट्रम्प यांना तिथल्या झोपड्यांचे दर्शन होऊ नये म्हणून बांधली जात असलेली भिंत आणि स्टेडियम परिसरात वीस वर्षे राहत असलेल्यांवर आलेली बेघर होण्याची वेळ यावरून त्यांचा दौरा वादात सापडला. हे होत असताना आपल्या मित्रालाच ट्रम्प यांनी अडचणीत आणले आहे. अहमदाबादमध्ये 1 लाख लोक त्यांचे स्वागत करणार असताना फुशारकी मारण्याच्या नादात ट्रम्प यांनी आपल्या स्वागतला 70 लाख लोक येणार असल्याचे ठोकून दिले. खरे तर हा दौरा मोदी यांच्यापेक्षाही ट्रम्प यांच्यासाठी जास्त महत्त्वाचा आहे. त्याचे कारण अमेरिकेत 38 लाख भारतीय मतदार आहेत. येत्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये त्यांची मते आपल्यालाच मिळावीत, असा त्यांचा प्रयत्न आहे. साऊथ एशियन अ‍ॅडव्होकसी ग्रुपच्या अहवालानुसार, अमेरिकेत भारतवंशी नागरिकांची संख्या 38 टक्क्यांनी वाढली आहे. परिणामी अमेरिकेत स्थायिक भारतीय ट्रम्प यांच्यासाठी आगामी निवडणूक सोपी करू शकतात. वाढलेल्या भारतीय लोकसंख्येत तेलंगणा, आंध्र, गुजरात, केरळ, पंजाब या राज्यांमधील अनेक लोक आहेत. भारतभेटीवर आल्यानंतर जिमी कार्टर वगळता अन्य सर्व अमेरिकन अध्यक्षांनी पाकिस्तानलाही भेट दिली होती. ट्रम्प मात्र पाकिस्तान भेटीवर जाणार नसल्याचे समजते तसेच आपल्या भारत दौर्‍यापूर्वी त्यांनी पाकिस्तानला आपल्या देशातल्या दहशतवाद्यांवर कारवाई करण्यास भाग पाडले. एखादा राष्ट्राध्यक्ष दुसर्‍या देशाच्या दौर्‍यावर जातो तेव्हा मनात कितीही कटुता असली तरी तो यजमान राष्ट्राचे कौतुक करत असतो.

ट्रम्प त्याला अपवाद आहेत. भारताच्या आताच्या भेटीत व्यापार करार केला जाणार नाही. त्यावर निवडणुकीनंतर विचार करू, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. याआधी त्यांचा दौरा निश्चित होताच असा करार होण्याची शक्यता सूचित करण्यात आली होती. नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत अध्यक्षीय निवडणूक होणार आहे. त्यामुळे आताच हा करार होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ट्रम्प यांनी आतापर्यंत ‘अमेरिका प्रथम’ धोरण जोरकसपणे लावून धरले असताना भारताला ‘व्यापार करांचा महाराजा’ (टॅरिफ किंग) म्हटले होते. अमेरिकी वस्तूंवर जास्त आयात कर लागू केल्याबाबत त्यांनी अनेकदा नाराजीही व्यक्त केली होती. अमेरिका-भारत व्यापार असमतोलावर ट्रम्प यांनी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, भारताने आम्हाला व्यापारात नीट वागणूक दिलेली नाही. अ‍ॅल्युमिनियम उत्पादनांवर अमेरिकेने लादलेले कर कमी करावेत, असे भारताचे मत आहे.

व्यापार अग्रक्रम प्रणालीतल्या वस्तूंवर कर लागू करण्याची प्रक्रिया बंद करावी. कारण आधी या उत्पादनांना करातून सूट देण्यात आली होती, असे भारताचे म्हणणे आहे. भारताबरोबरच्या व्यापारात 2018-2019 अखेर 16.9 अब्ज डॉलर्सची तूट असल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे. भारत आणि अमेरिका हे घाईघाईने व्यापारविषयक करार करू इच्छित नसून दीर्घकालीन दृष्टिकोनातून विचार केल्यानंतर याबाबत निर्णय घेतील, असे सूत्रांनी सांगितले. ट्रम्प यांच्या या दौर्‍यापूर्वीच दिल्लीच्या सुरक्षेसाठी भारत अमेरिकेकडून ‘नॅशनल अ‍ॅडव्हान्स सरफेस टू एअर मिसाईल सिस्टीम’ खरेदी करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. भारत याचा उपयोग स्वदेशी, रशियन आणि इस्रायली प्रणालींसोबत मिळून एक बहुस्तरीय ढाल बनवण्यासाठी करू शकेल. या सुरक्षा प्रणालीमुळे राजधानी दिल्ली केवळ मिसाईल हल्ल्यापासून नाही तर ड्रोन आणि बॅलेस्टिक मिसाईलपासूनही सुरक्षित राहील. परिणामी दिल्लीत 9/11 सारखे हल्ले घडवून आणणे दहशतवाद्यांना अशक्यप्राय होईल. संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिका आपल्या तब्बल सहा हजार कोटी रुपयांच्या ‘परदेशी सैन्य विक्री कार्यक्रमाअंतर्गत’ भारताला संरक्षण साहित्याची विक्री करणार आहे. यासाठी अमेरिकेकडून भारताला स्वीकृतीपत्राचा अंतिम मसुदा जुलै-ऑगस्ट महिन्यापर्यंत मिळण्याची शक्यता आहे. असे असले तरी ट्र्म्प यांच्या दौर्‍यात त्याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. करार झाल्यानंतर पुढच्या चार वर्षांमध्ये अमेरिकेकडून ही सुरक्षा प्रणाली भारताकडे हस्तांतरीत केली जाईल. सुरक्षा मंत्रालयाने याआधीच यासाठी आवश्यक परवानगी मिळवली आहे.

गेल्या काही महिन्यांमध्ये निर्यातीत झालेली घट आणि अर्थव्यवस्थेचा ढासळलेला वेग पाहता भारत आणि अमेरिकेदरम्यान सप्टेंबर 2019 मध्ये स्थगित झालेला व्यापारविषयक संवाद पुन्हा सुरू होणे ही स्वागतार्ह बाब आहे. दोन्ही देशांना द्विपक्षीय व्यापार वाढवण्यासाठी बराच वाव आहे. अमेरिकेने जून महिन्यापासून भारतीय निर्यातीसाठी काढून टाकलेली जीएसपी (जनरलाईझ सिस्टीम ऑफ प्रेफरन्स) ही कमी जकात भरण्याची सुविधा पुन्हा लागू करण्यासाठी भारत अमेरिकेला प्रवृत्त करू शकतो.
जीएसपीमुळे भारताचा 6.3 अब्ज डॉलर्स किमतीचा माल अमेरिकेत जकातमुक्त प्रवेश करू शकतो. भारत आणि अमेरिकादरम्यानचा व्यापार गेल्या काही वर्षांमध्ये वेगाने वाढला आहे.

भारत-अमेरिका व्यापारी उलाढालीत भारताचा व्यापार 31 अब्ज डॉलर्सने जास्त आहे. हाच राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासाठी मतभेदाचा मुद्दा आहे. दोन्ही देशांमध्ये स्वदेशी वस्तूंसाठीचा आग्रह वाढत असल्यामुळे तणाव आणखी वाढत आहे. यामुळे नवीन व्यापारी करारात किचकट प्रश्न सोडवावे लागतील. अमेरिकेने विशेषतः डाळींवर जकात कपात करण्याची मागणी केली आहे. तसेच भारताने काही डाळींच्या आयातीवर बंदी घातली आहे. त्याबद्दल जागतिक व्यापार समिती आणि ऑस्ट्रेलिया, कॅनडा यांच्याकडे तक्रार केली आहे.

अमेरिकेने दुग्धजन्य उत्पादनांसाठी भारतीय बाजारपेठेत बिनशर्त प्रवेश मिळावा अशी मागणी केली आहे. काही धार्मिक आणि सांस्कृतिक कारणांमुळे भारत ही मागणी पूर्ण करू शकलेला नाही.
याखेरीज अमेरिकेच्या भारतकडे काही मागण्या आहेत.

अमेरिकेतून भारतात येणार्‍या वैद्यकीय उपकरणांवर भारताने जकात कपात करावी आणि भारताचे त्या उपकरणांच्या किमतींवर नियंत्रण नसावे, असा आग्रह अमेरिकेने धरला आहे. अशी ही संबंधांची गुंतगुंत लक्षात घेता येत्या काळात या दोन राष्ट्रांचे संबंध कसे राहतात, हे पाहावे
लागणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या