Friday, May 3, 2024
Homeनाशिककाझीगढीलगत रस्त्याचे काम कधी पूर्ण होणार?

काझीगढीलगत रस्त्याचे काम कधी पूर्ण होणार?

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिकमधील ऐतिहासिक गंगाघाट परिसरात असलेल्या काझीगढीच्या ( Kazi Gadhi ) खाली असलेल्या मागील कित्येक महिन्यांपासून सुरू असलेले रस्त्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. यामुळे नागरिकांसह बाहेरून येणार्‍या भाविकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष देऊन हा मार्ग पूर्णपणे चालू करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

- Advertisement -

जुने नाशिक भागातील नागरिकांना पंचवटीशी जोडणार्‍या प्रमुख मार्गांपैकी एक असलेला हा मार्ग आहे. तर या ठिकाणी दररोज देशभरातील हजारो भाविकदेखील येत असतात. तसे पाहिले तर हा मार्ग व्यवस्थित होता. मात्र, प्रशासनाने तो नव्याने बनवण्याचा निर्णय घेतला. यामुळे नागरिकांनी त्याला विरोध केला नाही.प्रमुख मार्ग असल्यामुळे लवकर काम होईल असे वाटत असताना आता या कामाला वर्ष होत आले तरी काम काही पूर्ण होत नाही. या अपूर्ण कामामुळे अनेक लहान-मोठे अपघातदेखील झाले आहेत. नाशिकचा आठवडे बाजार या परिसरात भरतो. त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील नागरिक बुधवारच्या बाजारात येतात. या कामाचा फटका त्यांनाही बसत आहे.

स्मार्ट सिटीमुळे नागरिक त्रस्त

केंद्र सरकारचा बहुचर्चित स्मार्ट सिटी प्रकल्प नाशिकमध्ये अपयशी झाल्याची चर्चा आहे. कोट्यवधी रुपये खर्च करूनदेखील नागरिकांना अपेक्षित अशी स्मार्ट सिटी झाली नसल्याचा आरोप वेळोवेळी करण्यात आला आहे. यामध्ये महापालिकेच्या नगरसेवकांसह नागरिकांनीदेखील अनेक वेळा आवाज उठवला आहे. स्मार्ट सिटीच्या मनमानी कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्याच्यात हा रस्तादेखील खोदून ठेवण्यात आल्यामुळे नागरिकांचा संताप वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने हा मार्ग तरी सुरू करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या