खरेतर प्रत्येकात लपलेले असते एक लहान मूल. फक्त आपल्याला घेता यायला हवा आपल्या आत दडलेल्या या मुलाचा शोध. तोही अगदी त्रयस्थपणे! मुले निरागस असतात, खोडकर असतात पण त्यांच्या मनात नांदत असते सदैव एक सच्चाई. तिथपर्यंत पोहोचता आले की समजावे आपण अजूनही आहोत लहान. आपल्यात शाबूत आहे अजूनही ते मूल; मुक्त हुंदडणारे, बिनधास्त असणारे आणि कोणत्याही चांगल्या-वाईट परिणामांची पर्वा न करता मित्रत्वाच्या सावलीला हलवणारे. त्या सावलीतून उन्हाला पळता भुई थोडी करणारे.
राजेंद्र उगले, नाशिक
मुलांचे जग अतिशय छान असते. या जगात नसतो स्वार्थाला थारा… तिथे लागत नाही अहंकाराचा वारा. अवतीभवती केवळ आणि केवळ असतो तो म्हणजे आपलेपणाचा पसारा. या जगातून मुले स्थापून असतात स्वतःचे राज्य आणि ते स्वतःच असतात या राज्याचे अनभिषिक्त सम्राट. मोठ्या माणसांना वाटतो याचा हेवा. आपल्याला आठवू लागते स्वतःचे बालपण; पण आठवण्यापलीकडे नाही घालत आपण त्याला साद. असे करणे कमीपणाचे वाटते.
आपल्याला आपण मोठे झाल्यावर. समाजात वावरायचे असेल तर पाळावे लागतात समाजाचेच काही नियम वगैरे. जपावी लागते सामाजिकता आणि दाखवावे लागते अकाली आलेले प्रौढत्व. आपण झिडकारतो आपल्याच बालपणाला आपल्यापासून लांब. अंगावर पडलेला केरकचरा झटकावा तसे.‘लहान माझी बाहुली, मोठी तिची सावली म्हणत-म्हणत आम्ही होत गेलो मोठे आणि आम्ही भासू लागलो या सावलीपुढे एखाद्या बुजगावण्यासारखे. ‘मनाच रे मोरा’… म्हणताना आम्ही मोठे झालो खरे; पण आमच्याच कर्तृत्व गाजविण्याच्या भानगडीत गळून पडला आमच्या बालपणाच्या रंगीत स्वप्नांचा पिसारा.
‘सांग-सांग भोलानाथ… अजूनही येतो डोळ्यासमोर आणि मागतो आठवड्यातून तीन रविवार. कारण या धावपळीच्या जगण्यात इतकी झालीय आमची दमछाक की, ‘चांदोबा-चांदोबा भागलास का?’ हे आम्हीच आम्हाला विचारतोय; असे लागते वाटायला. आमच्या लहानपणी हमखास म्हणायची आई ‘एक घास चिऊचा… एक घास काऊचा!’ पण आम्ही आज स्वतःचाच घास शोधण्याचा मोहिमेवर निघालेलो असताना पडतो आम्हाला या चिऊ-काऊचा विसर. एकूणच काय तर हरवून गेलेय आमचे बालपण.
कोमेजलेल्या चेहर्याने आमचा सुरू होतो दिवस आणि मावळतोही त्याच चेहर्याने. आपल्या आत दडलेल्या बालकाचा घ्यावा म्हणतो शोध तर त्याला कधीच लोटलेले असते आम्ही आमच्यापासून बाजूला.
मग कधीतरी निवांत बसलेलो असताना आठवतो एखादा किस्सा आणि आपल्या डोळ्यासमोर घालू लागते एक-एक आठवण पिंगा.
कधीतरी बागेत खेळणार्या लहानग्यात दिसतो आपल्याला आपला चेहरा. मैदानात क्रिकेट खेळणार्या लेकरांचा चेंडू येतो आपल्या दिशेने आणि त्या क्षणापुरते का होईना आम्ही होतो लहान आणि भिरकावतो चेंडू मुलांच्या दिशेने मोठ्या ताकतीने. घरात अभ्यास करताना आपली मुले मारतात शाळेतल्या गप्पा; तेव्हा नकळतपणे आपणही फिरून येतो आपला वर्ग, वर्गात बसलेले आपण आणि बरेच काही. आपल्या वर्गातला ऐकू येतो स्पष्ट गोंधळ आणि घरातल्या गोंधळातही लागते आपली समाधी. घरातून येतो आवाज जेवण तयार असल्याचा आणि आपले राहून जाते मधल्या सुट्टीत आपल्या मित्रांबरोबर एकत्र डबा खाणे.
आपण करतो तुलना आपल्या आणि मुलांच्या बालपणाची. आपण वाचायला घेतो आपल्या बालपणीच्या आठवणींची गाणी नि हरवून जातो त्यात. हे असे घडत असते आपल्या बाबतीत. माझ्या बाबतीत तर रोजच; कारण शिक्षक असल्याने मला अनुभवता येत आहे अजूनही मला माझे बालपण. वर्गातल्या मुलांशी खेळताना, बोलताना मी अजूनही होतो त्यांच्या वयाचा आणि रोजच घेतो अनुभव मी लहान असल्याचा.
वर्गातल्या मुलांशी छान झालीय माझी गट्टी आणि म्हणूनच समजू लागते मला त्यांच्या मनातले बरेच काही. मुलांना गाणी आवडतात; हे जाणून आहे मी माझ्या बालपणातून आणि त्यामुळेच सुरू असतात आमच्या वर्गात कधी बडबडगीत तर कधी ताला-सुरातली गाणी, कविता. मुलांशी बोलता-बोलता सुचू लागतात मला त्यांच्याच वयाची गाणी आणि त्याचाच होतो मग ‘थांब ना रे ढगोबा!’ मी लिहिलेली गाणी मुले गाऊ लागतात तालासुरात… ठेक्यावर आणि मीच धरतो ठेका.
पुस्तकाला मिळतात पुरस्कार पण त्यापेक्षा वर्गातल्या मुलांच्या चेहर्यावर उमटलेले हसू हा माझ्यासाठी असतो सर्वात मोठा पुरस्कार. मी शिकून घेतो त्यांच्याकडून अजून लहान होण्याची कला. मुलंही घेतात मला समजून आणि शिकवतात आवडीने. माझी मात्र होते दमछाक त्यांच्या गतीने शिकताना. कारण आजच्या पिढीचा वेग प्रचंड. ही मुले एकाच वेळी असतात वर्गात आणि असतात त्यांच्या भावविश्वातही. मोबाईल आणि इतर तंत्रज्ञानाने ही मुले प्रचंड झाली आहेत वेगवान. त्यांच्यासोबत चालताना आपली होते सर्कस. मुले हसतात आपल्या वेगावर.
आपण तेव्हा नेमके होतो मोठे आणि दाबून टाकतो त्यांचा आवाज… आपल्या खोट्या इगोखाली. आपल्यात लपलेले लहान मूल शोधता आले आपल्याला तर नक्कीच येतो एक वेगळा सुगंध आपल्या जगण्याला; याचा घेतो आहे मी अनुभव. वाढत्या वयाबरोबर वाढत्या जबाबदार्या पेलताना गुदमरतेय आपल्या आत एक लहान मूल त्याला जपता यायला हवे. नाहीतर ताणतणावाच्या ओझ्याखाली वाकून जाऊ आपण अकाली. आपल्या चेहर्यावर खुलवायचे असेल निरागस हास्य आणि हसत-खेळत जगताना घ्यायची असेल जगण्याची मजा तर नक्कीच जपा. आपल्यातल्या बालकाला आणि द्या स्वतःच स्वतःला बालदिनाच्या शुभेच्छा…!




