मुंबई | Mumbai
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी (28 जानेवारी) बारामती विमान अपघातात निधन झाले आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरला. त्यांच्या अकाली जाण्याने एक मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्यावर २९ जानेवारी रोजी बारामतीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. अशामध्ये आता काही राजकीय हालचालींना वेग आला आहे. अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री होते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षही होते. तसेच, त्यांच्याकडे राज्याचे महत्त्वाचे खाते म्हणजे अर्थ खातेही होते. त्यामुळे आता ही सर्व पदे किंवा खाती यांच्याबद्दल काय निर्णय घेतले जाणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान अजित पवार यांच्या निधनानंतर आता नवा उपमुख्यमंत्री कोण? अशी चर्चा सुरू झाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्रिपदासाठी सुनेत्रा पवार यांचं नाव आघाडीवर आहे, उपमुख्यमंत्रिपदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या गोटात हालचालींना वेग आला असून, मोठी बातमी समोर येत आहे.
उपमुख्यमंत्रिपदाबाबत एकमुखी निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती समोर येत आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे देखील आज मुंबईच्या पक्ष प्रदेश कार्यालयात दाखल झाले आहेत. राष्ट्रवादीकडे असलेल्या उपमुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय घेण्यासाठी सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावले जाणार आहे. सर्व आमदारांना मुंबईमध्ये बोलावून एकमुखाने उपमुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
अजित पवार यांच्या अकाली निधनाने पक्ष शोकसागरात बुडालेला असताना सुनील तटकरे यांनी आज राष्ट्रवादीच्या कार्यालयात येऊन अजित पवार ज्या खुर्चीवर बसायचे, त्या खुर्चीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी झालेल्या भेटीचा तपशील दिला.
सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार? CM सोबतच्या बैठकीत काय झालं? प्रफुल्ल पटेलांनी सगळचं सांगितलं
आम्ही शोकमग्न अवस्थेत आहोत
दादांच्या अकाली जाण्याचा आम्हाला झटका बसला आहे. त्यातून आम्ही सावरलेलो नाही. आम्ही शोकमग्न अवस्थेत आहोत. त्यामुळे आज दादांच्या अनुपस्थितीत कार्यालयात येणे हे अत्यंत क्लेशकारक आहे. जिथे त्यांनी पक्षाचे संघटन उभे केले, त्या कार्यालयात त्यांच्याशिवाय जाणे हे पचत नाही. अजित पवार ज्या खुर्चीवर बसायचे, तिथे जाऊन मी नमस्कार केला, असे तटकरे यांनी सांगितले.
धार्मिक विधी झाल्यानंतर परिवाराशी चर्चा करु
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट झाली. अजित पवार यांच्या सावडण्याचा विधी सुरू आहे. धार्मिक विधी झाल्यानंतर सर्व परिवाराशी चर्चा करू. सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करू. जनतेच्या मनातील, आमदारांच्या मनातले जाणून घेऊन पुढील निर्णय घेऊ. चर्चा करून उपमुख्यमंत्रिपदाचं काय ते ठरवू, असे सुनील तटकरे म्हणाले.
सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावले आहे
सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांना उद्या मुंबईत बोलावले आहे. सुनेत्रा पवार यांच्याशी आज किंवा उद्या चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती समजते आहे.





