Friday, May 3, 2024
Homeब्लॉगस्पंदन : हृदयी वसंत फुलताना...

स्पंदन : हृदयी वसंत फुलताना…

डॉ.प्रवीण घोडेस्वार

फाल्गुन पोर्णिमा झाल्यावर वसंत ऋतूची सुरुवात होते. यावर्षी सोमवार २९ मार्च पासून वसंतोत्सवरांभ झाला आहे. वसंत ऋतूची बातच न्यारी. वर्षा प्रमाणेच हाही ऋतू कलावंत-लेखक-कवी मंडळींना साद घालणारा.

- Advertisement -

भुरळ पडणारा. सर्जनशीलता जागृत करणारा. सृजनाचे बीज रुजवणारा. वसंत ऋतूवर विपुल साहित्य निर्माण झालंय. अगणित कलाकृती साकार झाल्या आहेत. चित्रपट-नाट्य-संगीत-साहित्याने वसंत ऋतूचं मनसोक्त गुणगान केलं आहे. वसंतावर शेकडो गाणी-कविता रचल्या गेल्या आहेत. विविध भाषांमध्ये. वेगवेगळ्या देशांमध्ये. निरनिराळ्या भूप्रदेशांत. भिन्न-भिन्न कालखंडात. आजही यात खंड पडलेला नाहीये. वसंत ऋतू आजही सर्जकाना आवाहन करतोय..क्वचित प्रसंगी आव्हान देखील देत आहे. वसंताला ऋतूंचा राजा म्हटलं जातं. त्याचं आगमन सुखावणारं, आनंद देणारं मानलं जातं. मानवाच्या मानसिक समाधानासाठी निसर्गाने वसंत ऋतू नामक चैतन्याचा झरा निर्माण केला आहे. वसंत आपल्यासमवेत नवा उत्साह, नवी उमेद, नवी आशा घेऊन येत असतो.

वसंत ऋूतवर बॉलीवूड गाणी

अनेक हिंदी – मराठी चित्रपट गाण्यांमधून वसंत ऋतूने आपली हजेरी लावलेली आहे.हिंदी भाषेत आपला वसंत ‘बसंत’ म्हणून ओळखला जातो. १९५६ मध्ये ‘बसंत-बहार’ नावाचा चित्रपट आला होता. यातली सारी गाणी रागदारी संगीताने नटलेली होती. संगीतकार शंकर-जयकिशन यांच्या कारकिर्दीतला हा महत्वाचा सिनेमा होय. पंडित भीमसेन जोशी आणि मन्ना डे यांनी गायलेलं ‘केतकी –गुलाब-जुही, चंपक बने फूल’ हे गाणं तेव्हा गाजलं होतं. आजही बुजूर्ग आणि शास्त्रीय संगीताचे चाहते असणाऱ्या श्रोत्यांना हे गाणं फार आवडतं. या ऋतूत अनेकदा हे गीत आकाशवाणीवरून हमखास ऐकवलं जातं. पंडित जोशी आणि पार्श्वगायक मन्ना दडे यांच्यातली ही जुगलबंदी अफलातून म्हणता येईल अशीच ! हे गाणं सुद्धा बसंत या रागावारच बेतलेलं आहे. या रागासमवेतचा ‘बसंत-बहार’ हा जोड राग सर्वात जास्त लोकप्रिय समजला जातो. बसंती केदार, हवेली बसंत, शुद्ध बसंत, आदिबसंत, दाक्षिणात्य बसंत हे याच बसंतचे इतर भावंडे.

नव्वदच्या दशकांत ‘सिंदूर’ नावाचा हिंदी चित्रपट आला होता. शशी कपूर, ऋषी कपूर आणि जयाप्रदा यांच्या यात प्रमुख भूमिका होत्या. यातलं ‘पतझड सावन बसंत बहार..’ हे युगल गीतही तेव्हा लोकप्रिय झालं होतं. हे गाणं दोन भागात होतं. एक भाग लता आणि सुरेश वाडकर यांनी तर दुसरा भाग लता व मोहम्मद अझीजने गायला होता. ऋषी कपूरसाठी सुरेश वाडकरांचा तर शशी कपूरसाठी मोहम्मद अझीझ यांचा आवाज संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी वापरला आहे. अलीकडच्या ‘देवदास’ चित्रपटात पंडित बिरजू महाराज यांची एक रचना आहे. ‘काहे छेड छेड मोहे गरवा लगाई…’ ही रचना देखील बसंत रागावारच आधारलेली आहे. या गाण्यावर माधुरी दीक्षितने केलेलं नृत्य अप्रतिम नि अविस्मरणीय ! त्याचप्रमाणे महान संगीतकार इलय्या राजा यांनी ‘राज पार्वई’ या सिनेमातल्या ‘अंदी मळे’ या गाण्यांत कर्नाटक शैलीत वापरलेला बसंत राग अफलातूनच!

शांतीनिकेतनला यासाठी द्या भेट

संस्कृत कवी कालिदास यांनी मेघदूत, ऋतूसंहार अशा लघुकाव्यांमधून तर रघुवंशम, कुमारसंभव अशा दीर्घ रचनांमधून वसंताचं मनोज्ञ दर्शन घडवलं आहे. कालिदास नि वसंत ऋतू यांची गहिरी दोस्ती होती. कालिदास यांच्याप्रमाणे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर देखील निसर्ग कवी होत. जाणकारांच्या मते वसंतोत्सवाचा अस्सल आनंद घेण्यासाठी टागोरांच्या शांतीनिकेतनला भेट दयायलाच हवी. वसंत ऋतू हा फक्त भारतातच महत्वाचा नि मोलाचा मानला जातो असं नाहीये. हा ऋतू धर्म-जाती-वंश-देश-चालीरीती-प्रथा-परंपरा निरपेक्ष आहे. ख्रिस्ती धर्मीय देखील वसंताचा उत्सव साजरा करतात. सुफी दर्ग्यावर देखील वसंत पंचमी जल्लोषात साजरी केली जाते. आज सुद्धा दिल्ली इथल्या हजरत निजामुद्दीन दर्ग्यावर हर्षोल्हासात वसंत पंचमी साजरी होते. शांतीनिकेतन आणि हजरत निजामोद्दीन यांच्या दर्ग्याला भेट दिल्याशिवाय इथल्या माहोलचा अंदाज आपल्याला येणार नाही. सार्वकालिक महान इंग्रजी साहित्यिक विल्यम शेक्सपिअरच्या ‘ अ मिडसमर नाइटस ड्रीम’ या गाजलेल्या नाटकाचा ‘ऐन वसंतात अर्ध्या रात्री’ या नावाने मराठीत अनुवाद झाला आहे.

प्रेम आणि वसंत याचं अतूट नाते

पंडित कुमार गंधर्व यांनी ‘गीतवसंत’ अशा रागाची निर्मिती केली आहे. ती मुळातूनच ऐकायला हवी. प्रेम आणि वसंत याचं अतूट असं नातं आहे. प्रेमाचा महिना अशी वसंताची ख्याती आहे. कविवर्य सुरेश भट यांनी ‘’मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो..तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो…’’ अशा शब्दांमध्ये अव्यक्त प्रेमाची कबुली दिली आहे. मराठीत एकेकाळी तीन वसंतांनी रसिकांच्या मनात मानाची जागा निर्माण केली होती. हे तीन वसंत म्हणजे संगीतकार वसंत पोवार, वसंत प्रभू आणी वसंत देसाई. या त्रिकुटाने अवीट गोडीची गाणी मराठी श्रोत्यांना दिली आहेत. पैकी संगीतकार वसंत देसाई यांनी हिंदी चित्रपट सृष्टीतही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

‘अशी ही बनवाबनवी’ नावाचा एक मराठी चित्रपट सन १९८८ मध्ये प्रदर्शित झाला होता. यात ‘हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे…’ हे बहारदार प्रेमगीत होतं. कवी शांताराम नांदगावकर यांनी लिहिलेलं हे गाणं संगीतकार अरुण पौडवाल यांनी श्रवणीय चालीत बांधलं आहे. या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे यासाठी संगीतकार पौडवाल यांनी शैलेन्द्रसिंह –सुरेश वाडकर-अनुराधा पौडवाल-सुदेश भोसले-सचिन पिळगावकर –अपर्णा मयेकर अशा तब्बल सहा गायकांचा आवाज वापरला आहे. ३० वर्षांपेक्षा जास्त काळ लोटूनही हे गाणं आजही तेवढंच ताजं-उत्फुल्ल वाटतं. या गाण्याच्या कर्त्यांना सलाम.

सरळ दुसऱ्या वर्षी कोरोनाचे सावट

वर उल्लेख केल्याप्रमाणे ‘वसंत’ म्हणजे हर्ष-उल्हास-चैतन्य असं असलं तरी आज परिस्थिती मात्र तशी नाहीये. गतवर्षी देखिल आख्ख जग याच काळात करोना संकटाला सामोरे जात होतं. दुर्दैवाने आजही तशीच परिस्थिती उद्भवली आहे. मधल्या काळात करोना जरासा अंतर्धान पावल्यासारखा भासला होता पण तो केवळ एक भासच होता, हे आता दिसून येत आहे. भारतातल्या अनेक राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये करोना वेगाने डोकं वर काढत आहे. बाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. देशात आपले राज्य करोनाच्या संकटाला मोठ्या प्रमाणात तोंड देत आहे. सरकार आपल्या परीने प्रयत्न करीत आहे. पण ही फक्त सरकारची जबाबदारी नाहीये. सरकारपेक्षा जास्त जबाबदारी लोकांची-नागरिकांची आहे. आपल्या समाजात स्वंयशिस्तीचा अभाव आहे. याचमुळे मग नियंत्रण करणारी यंत्रणा नसली तर लोकं नियम-शिस्त-निर्बंध पाळायला तयार होत नाहीत. परिणामी या साथीचा फैलाव वेगाने होत आहे. गेल्या वसंतातही करोना या विषाणूने मानवी जीवनाला नख लावलं होतं. याही वसंतात त्याने आपला पिच्छा सोडलेला नाहीये. ही चिंतेची, काळजीची बाब आहे. सलग दोन ‘वसंत’ करोनाग्रस्त झाले आहेत. कदाचित मानवी संस्कृतीच्या इतिहासात प्लेगच्या साथीनंतर उद्भवलेली अशी पहिलीच घटना असावी. यासाठी सर्वांनी काळजी घेणे, शिस्त पाळणे, सूचनांचे पालन करणे अनिवार्य नव्हे जीवनावश्यक झालं आहे. मोठ्या अग्नीपरीक्षेची वेळ आली आहे. पुढील वर्षी येणारा वसंत ऋतू मागील दोन वर्षांसारखा नसेल अशी आशा करू या. आपल्या हृदयात वसंत फुलण्यासाठी ‘दक्षता-स्वच्छता- मुखपट्टीचा वापर आणी शारीरिक अंतर’ ही सूत्रे कटाक्षाने अंमलात आणण्याची गरज आहे. लोकं समजूतदारीने-जबादारीने वागतील आणि करोना नामक संकटाला हद्दपार करण्यात यशस्वी होतील अशी आशा करू या !

सहयोगी प्राध्यापक,

मानव्यविद्या व सामाजिक शास्त्रे विद्याशाखा,

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ,

नाशिक

मोबाईल : ९४०३७७४५३०

- Advertisment -

ताज्या बातम्या