Friday, May 3, 2024
Homeअग्रलेखपिढ्यानपिढ्या जोपासलेली भारतीय सहिष्णूता हिंस्त्र का होत आहे?

पिढ्यानपिढ्या जोपासलेली भारतीय सहिष्णूता हिंस्त्र का होत आहे?

यवतमाळमधील रॅगिंग प्रकरणाने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. करोनामुळे विस्कळित झालेले शैक्षणिक क्षेत्र हळूहळू पुर्वपदावर येऊ लागले आहे. शाळा-महाविद्यालये विद्यार्थ्यांनी गजबजली आहेत. करोनाच्या दीर्घकालावधीच्या सुट्टीनंतर शैक्षणिक वेळापत्रकाशी जमवून घेण्याचा प्रयत्न विद्यार्थी करत आहेत आणि शिक्षक देखील! आता सारे काही सुरळीत होईल असे सर्वांना वाटत असतानाच वैद्यकीय महाविद्यालयातील रॅगिंग प्रकरण उघडकीस आले. घटना यवतमाळमधील वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयात घडली.

प्रथम वर्षात शिकणार्‍या एका विद्यार्थ्याला त्याच्याहून त्या कॉलेजात काही जास्त वर्ष काढलेल्या विद्यार्थ्यांनी जीवघेणा त्रास दिल्याची तक्रार रॅगिंग पीडित विद्यार्थ्याच्या आईने केली आहे. त्यामुळेच हा प्रकार उघडकीस आला. मोठे विद्यार्थी पीडित विद्यार्थ्याला तासनतास उभेच राहायला लावायचे. प्रसंगी मारहाणही करायचे. सतत उभे राहिल्याने त्या विद्यार्थ्याला सेलुलायटिस हा दुर्धर आजार जडला आहे असे आरोप त्याच्या आईन केले आहेत. रॅगिंगचा हा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच महाविद्यालय प्रशासनाने चौकशी समिती नेमली. रॅगिंग केल्याचा आरोप असलेल्या पाच विद्यार्थ्यांना तातडीने निलंबित करण्यात आले.

- Advertisement -

या प्रकरणाची चौकशी यथावकाश पुर्ण होईल. किंवा कदाचित महाविद्यालयाच्या लौकीकाचा प्रश्न निगडित असल्याने चौकशी काही काळ रेंगाळत राहू शकेल. कदाचित दोषींना शासनही होईल. पण त्यामुळे प्रथम वर्षात शिकणार्‍या त्या विद्यार्थ्याचा या दुष्ट अनुभवामुळे विचलित झालेला आत्मविश्वास त्याला परत मिळेल का? रॅगिंगमुळे त्याच्या मनावर झालेल्या जखमा भरल्या जातील का? वैद्यकीय शिक्षण कमालीचे महागडे झाले आहे.

मुलाला शिकायला पाठवणार्‍या पालकांची सगळी स्वप्ने त्या मुलाच्या भविष्यकाळाशी एकवटलेली असतात. त्याच मुलाला दुर्धर आजार जडल्याचे लक्षात आल्यावर त्याच्या पालकांची काय अवस्था झाली असेल? माणसे दुसर्‍या माणसाशी इतकी अमानुष दुष्टाव्याने कशी वागू शकतात? माणसात दुष्टता वाढत असल्याचे हे पहिलेच उदाहरण नाही. क्षुल्लक कारणांसाठी माणसे सहज एकमेकांच्या जीवावर उठत असल्याच्या घटना दिवसेदिवस वाढत आहेत. क्षुल्लक कारणांसाठी माणसे एकमेकांचा जीव का घेऊ लागली आहेत? मित्रांचे भांडण होते आणि सगळे मिळून एका मित्राचा खुन करतात.

नवरा-बायकोच्या वादात दोघेही एकमेकांच्या जीवावर उठतात व दोन्हीपैकी एक बळी जातो. घरात वाद झाला म्हणून माणसांनी त्यांच्याच मुलांचा जीव घेतल्याच्या घटना घडण्याचे प्रमाणही वाढत आहे. अशा माणसांना पशू तरी कसे म्हणावे? पशुही अकारण एकमेकांचा जीव कधीच घेत नाहीत. बिबट्याने माणसावर हल्ला केला तर त्याला माणसे ‘नरभक्षक’ असे लेबल चिकटवतात. संधी मिळाली तर लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण करुन त्याचा जीव घ्यायला देखील माणसे मागेपुढे पाहात नाहीत. पण क्षुल्लक कारणांसाठी एकमेकांचा जीव घेणार्‍या माणसांना काय म्हणावे?

भारतीय संस्कृतीचा आणि भारतीय संस्कारांचा गौरव उच्चरवाने करण्याची चढाओढ सध्या भारतीय समाजात आढळते. भारतासारखी कुटुंबपद्धती जगात कुठेच नाही याचा अभिमान ओरडून सांगण्याची चढाओढ समाजातील काही विशिष्ट घटक समाजमाध्यमांवर करत असतात. तथापि कु्रर वर्तनाने त्याच भारतीय समाजातील माणसे संस्कृतीचे आणि अभिमानाचे धिंडवडे कशी काढू शकतात? हे समाजतज्ञांपुढे मोठेच आव्हान आहे. विश्वगुरुत्वावर आपली नाममुद्रा उठवण्यास उत्सुक असणार्‍या समाजात ही प्रवृत्ती का वाढत आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न सर्वज्ञ नेतेमंडळी करतील का?

- Advertisment -

ताज्या बातम्या