नाशिक। प्रतिनिधी Nashik
पतीचा खून करून त्याचा मृतदेह पंलगाखाली लपवून फरार झालेल्या पत्नीस न्यायालयाने सुनावणीअंती जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. नंदाबाई दिलीप कदम (३६, रा. वडागळागाव) असे आरोपी महिलेचे नाव आहे. सप्टेंबर २०२२ दरम्यान पती दिलीप रंगनाथ कदम (४९) यांचा तिने निर्घृण खून केला होता.
गॅरेज चालक दिलीप कदम यांचा नंदाबाईसोबत दुसरा विवाह होता. मात्र दोघांमध्ये कौटुंबिक वाद होते. २४ सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी दिलीप कदम यांचा मुलगा रोशन कदम (२५) यास घरातील पलंगाखाली दिलीप यांचा मृतदेह आढळून आला. दिलीप यांचे टॉवेलने हात पाय बांधून गळा आवळून व शरीरावर धारदार शस्त्राने वार करून खुन केल्याचे तपासात उघड झाले. तसेच खुन केल्यानंतर नंदाबाई घराला कुलूप लावून पसार झाली होती.
याप्रकरणी तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक एन. एस. बोंडे यांनी तपास करीत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. पोलिसांनी तपास करीत नंदाबाईला अटक केली. सरकारी पक्षातर्फे अॅड. शिरीष कोतवाल यांनी युक्तीवाद करीत २४ साक्षीदार तपासले. त्यात गुन्हा सिद्ध झाल्याने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांनी नंदाबाईला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.