निफाड | प्रतिनिधी Niphad
उगाव येथील मुस्लिम समाजातील बेपत्ता तरुण शादाब तांबोळीचा खुन चांदवड तालुयातील परसुल येथील चिंचोडी नदीच्या पुलाखाली झाला होता. या प्रकरणी पोलिस तपासात मृताची पत्नी या प्रकरणात मास्टरमाइंड असल्याचे समोर आले आहे.
शांत व व्यावसायिक कुटुंब म्हणून परिचित असलेल्या तांबोळी परिवारावर असा प्रसंग आल्याने उगाव ग्रामस्थांनी हिंदु-मुस्लिम ऐय दाखवत निफाड पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केले होते. तपास करुन गुन्हेगारांना कठोर शिक्षा करण्याची नागरिकांकडून मागणी करण्यात आली होती. यामुळे निफाड व चांदवड गुन्हे अन्वेषण विभाग पोलिसांसमोर हे मोठे आव्हान निर्माण झाले होते. पण यात जे वेगवेगळे तर्क-वितर्क लढवले जात होते, ते सर्व अंदाज फोल ठरत पत्नीच खुनाची सुत्रधार निघाल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.
याबाबत महिती अशी की, दि.१८ फेब्रुवारी रोजी शादाब तांबोळी बेपत्ता झाल्याची तक्रार निफाड पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती. त्याचा पोलिसांकडून शोध सुरू असतानाच चादंवड तालुयातील परसुल येथे नदीपात्रात एका इसमाचा मृतदेह मिळून आला होता.
अज्ञात मारेकर्यांनी मयताच्या दोन्ही हाताला नॉयलान दोरीने बांधून तोंडावर कपड्याने बाधूंन तसेच कमरेला व मांडीला दोरीने डंबेल्स बार बांधून सदर इसमाचा खुन केला होता. याबाबत चादंवड पोलीस ठाण्यात गुरन ७५/२०२६ भा.न्या. संकलम १०३ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.
बेपत्ता तरूण व सापडेला मृतदेह हा पोलिसांच्या तपासाअंती उगाव येथील शादाब तांबोळीचा निघाल्याने निफाड पोलीसांना आवाहन दिले गेले होते. या प्रकरणात पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी स्वतः लक्ष घालून तपासाची सूत्रे हातात घेतली होती. त्यांनी तपासात मनमाड येथील माहेर असलेल्या शादाबच्या पत्नीच्या े अनैतिक संबधातून खून झाल्याचे उघड केले. 3
शादाबच्या पत्नीचे ऋषभ मनोज वर्मा यांच्यासोबत अनैतिक संबंध होते. या दोघांना विवाह करायचा होता. परंतु पती शादाब यात अडसर ठरत होता. त्यामुळे ऋषभ वर्मा याने शादाबचा काटा काढण्याचे ठरवले. यासाठी त्याने शादाबची पत्नी मुस्कान तांबोळी व मुस्कानचा भाऊ शाहरुख शाफीक शेख यांना शादाबचा काटा काढण्यासाठी आपल्या कटात सामील करून घेतले होते.
मालेगाव येथील युवराज विजय थोरात, सलीम साबीर शेख, आर्यन सुंदर जिनवाल, शेख एजाज शेख रियाज आदी मित्रांनाही यासाठी प्रवृत्त करत कोल्ड्रिंक व्यवसायासाठी फिरत असलेल्या शादाबला मनमाड येथे दागिन्यांचा व्यवहार करायचा आहे, यासाठी ऋषभ वर्मा व शाहरुख शेख यांनी बोलवले होते. मेव्हण्याचा फोन आला म्हणून कुठलाही आड पडदा न ठेवता शादाब मनमाड येथे गेला होता.
परंतु त्याला काय कल्पना होती का? गोड बोलून आपला येथे घात होणार आहे? मनमाड-मालेगाव मार्गावरील एका बंद पडलेल्या पोल्ट्री फार्मवर त्याला बोलविण्यात आले. तेथे त्याचा खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी चांदवड-सिन्नर मार्गावरील परसुल येथील चिचोंडी नदीपात्रात पुलाखाली शादाबचा मृतदेह तोंडात बोळा घालून, हातापायाला नॉयलान दोरी बांधून तर दोरीने मृतदेह बुडण्यासाठी डंबेल्स बांधून आरोपींनी फेकून दिला होता.
परंतु खुनाला वाचा ही आरोपीने कितीही प्रयत्न केला तरी फुटते, हे गुन्हेगार विसरले होते. मृतदेह फुगल्याने पाण्यावर तरंगताना परसुल येथील नागरिकांना दिसून आला व तेथून पुढे मृतदेहाची ओळख पटवून नाशिक गुन्हे अन्वेषण शाखेचे रवींद्र मगर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस प्रशासनाने तपासाची सूत्रे हाती घेतली व एक महिन्याच्या आतच गुन्हेगारांचा शोध लावून गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या.
पत्नीच या कटात प्रियकराला साथ देण्यासाठी सामील असल्याने पतीचा खून झाला. पत्नी आता तुरुंगात जाणार परंतु दोन वर्षाच्या शादाबच्या मुलीला आता आई-वडील या दोघांना मुकावे लागणार आहे. अनैतिक संबंधांमधून एका मितभाषी व अजातशत्रू असलेल्या शादाबचा हकनाक बळी गेल्याची चर्चा उगाव परिसरात होत आहे. या खुनात सामील असणार्या सर्व संशयिताना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे नागरिकांमधून बोलले जात आहे.
तपासासाठी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड बाजीराव महाजन, चांदवड पोलीस ठाणे निरीक्षक कैलास वाघ, निफाड पोलीस ठाणे निरीक्षक गणेश गुरव, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस अधिकारी नितीन रणदिवे, प्रकाश भालेराव, नवनाथ सानप, पोलीस हवालदार सुधाकर बागुल, प्रशांत पाटील, हेमंत गलबिले, श्रीकांत गारुंगे, ज्ञानेश्वर सानप, सचिन वराडे, विशाल गोसावी, संदीप राठोड, प्रदीप बहिरम, नितीन गांगुर्डे, प्रवीण गांगुर्डे, किशोर बोडके या पथकाने गुन्हा उघडकीस आणण्यासाठी परिश्रम घेतले.





