Tuesday, July 2, 2024
Homeक्राईमफिर्याद देण्यास आलेल्या महिलेकडून 3 महिला पोलिसांना मारहाण

फिर्याद देण्यास आलेल्या महिलेकडून 3 महिला पोलिसांना मारहाण

भिंगार पोलीस ठाण्यातील घटना

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

नातेवाईकांची फिर्याद का दाखल करून घेत नाही, अशी विचारणा करत चक्क एका महिलेने पोलीस ठाण्यात महिला ठाणे अंमलदारासह तीन महिला कर्मचार्‍यांना धक्काबुक्की करून मारहाण केली. ही घटना भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अंमलदार कक्षात घडली. याप्रकरणी महिला ठाणे अंमलदार यांनी कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून फिर्याद देण्यास आलेल्या महिलेवर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सीमा गणेश काळे (रा. ब्रह्मतळे, भिंगार) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. शुक्रवारी सायंकाळी फिर्यादी महिला ठाणे अंमलदार या भिंगार पोलीस स्टेशनमध्ये ठाणे अंमलदार कक्षात ड्युटी करत असतांना सीमा काळे ही महिला तेथे आली. तुम्ही माझ्या नातेवाईकाची फिर्याद का घेत नाहीत, अशी तिने विचारणा काळे या महिलेने केली. त्यावर फिर्यादी ठाणे अंमलदार म्हणाल्या, तुम्ही फिर्याद व्यवस्थित समजावून सांगा मी घेते, असे सांगत असताना काळे या महिलेस राग आला ती फिर्यादीच्या अंगावर धावून आली. तिने फिर्यादीची गचांडी पकडून शिवीगाळ करून मारहाण केली. तुला कामालाच लावते, अशी धमकी दिली.

फिर्यादीच्या शर्टाचे बटन तोडून गळ्यातील मंगळसूत्र तोडून नुकसान केले. त्यावेळी ड्युटीवर असणार्‍या तीन महिला कर्मचारी तेथे आल्या. त्यांनाही काळे या महिलेने धक्काबुक्की करून मारहाण केली. तसेच फिर्यादी ठाणे अंमलदार व साक्षीदार यांना हाताच्या नखाने दुखापत करून सरकारी कामात अडथळा आणला. याप्रकरणी काळे नावाच्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी शहर विभागाचे पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांनी पोलीस ठाण्यास भेट दिली. या घटनेचा पुढील तपास उपनिरीक्षक साळुंके करत आहेत. फिर्याद देण्यास आलेल्या महिलेने ठाणे अंमलदार असणार्‍या महिला पोलीस कर्मचारी व अन्य महिला पोलीस कर्मचार्‍यांना केलेल्या मारहाणीचा विषय चांगलाच चर्चेत आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या