राहुरी |प्रतिनिधी| Rahuri
गवत आणण्यासाठी गेलेल्या विवाहित महिलेला (Married Woman) बिबट्याने ओढून नेल्याची अफवेने तीला शोधण्यासाठी नातेवाईक, वनविभाग (Forest Department) व पोलीसांची चांगलीच दमछाक झाली होती. मात्र, सदर महिला हि सहिसलामत आपल्या नातेवाईकांकडे सापडल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला आहे. राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर (Baragaon Nandur) परिसरातील एक महिला गाईसाठी गवत आणायला शेतात गेली होती. मात्र संध्याकाळपर्यंत ती घरी परतली नाही. कुटुंबीयांनी शेतात जाऊन शोध घेण्याचा प्रयत्न केला असता, त्या महिलेकडील गवत आणण्यासाठी असलेले कापड, तिच्या मोबाईलचा कव्हर, तिच्या गळ्यातील मंगळसूत्र, हातातील फुटलेल्या बांगड्या, मोबाईलची बॅटरी तसेच गवत कापण्यासाठी नेलेला विळा, त्या विळ्याला रक्त लागलेले आढळून आले.
महिलेच्या अंगावरील साडीचा तुकडा व स्कार्फ असे साहित्य त्या ठिकाणी अस्ताव्यस्त पडलेले आढळून आले होते. त्यामुळे तिच्या नातेवाईकांना संशय आला की, बिबट्याने (Leopard) तिच्यावर हल्ला करून बिबट्या तिला घेऊन गेला असावा. त्यांनी राहुरी पोलिसांना व वनविभागातील अधिकार्यांना व कर्मचार्यांना कल्पना दिली. वनविभागाच्या तीन पथकांनी व 300 ते 400 ग्रामस्थांनी आजूबाजूच्या जवळपास 300 एकरात त्या विवाहित महिलेचा रात्रभर शोध घेतला. परंतु ती कुठेच सापडली नाही. त्यामुळे नातेवाईकांनी राहुरी पोलिसांत दिनांक 30 मार्च रोजी ती हरवल्याची तक्रार दाखल केली. घडलेल्या ठिकाणाची पोलिसांनी फॉरेन्सिक टीम व श्वानपथक यांच्या मदतीने बारकाईने तपासणी केली. तपासणीमध्ये घटनास्थळी कोठेही बिबट्याचा हल्ला (Leopard Attack) झाला आहे असा पुरावा मिळाला नाही. त्यामुळे या प्रकरणांमध्ये त्या महिलेकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला गेला असल्याची पोलिसांसह सर्वांची खात्री झाली.
तांत्रिक विश्लेषणातून निष्पन्न झाले की, ही महिला नेवासा (Newasa) तालुक्यात आहे. राहुरी पोलिसांनी वेगाने तपास करून त्या विवाहित महिलेला 48 तासात ताब्यात घेऊन तिला राहुरी पोलीस स्टेशन (Rahuri Police Station) येथे आणण्यात आले. त्यामुळे या महिलेला बिबट्याने पळवून नेल्याची केवळ अफवा असल्याची ग्रामस्थांच्या व नातेवाईकांच्या निदर्शनास आल्यामुळे सर्वांचा जीव भांड्यात पडला. पो. नि. संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक ज्योती डोखे, पो. ना. गणेश सानप, पो.हे.कॉ.विकास वैराळ, सागर नवले, अंबादास गीते, प्रमोद ढाकणे, सायबर सेलचे सचिन धनाड यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.