अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
किरकोळ कारणातून महिलेला शिवीगाळ करत मारहाण केली. त्यांच्याशी लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. तसेच मुलीला अॅसिड टाकून मारून टाकू अशी धमकी दिल्याची घटना मंगळवारी (24 डिसेंबर) रात्री साडेआठच्या सुमारास सावेडी उपनगरात घडली. या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून बुधवारी (25 डिसेंबर) तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मिरा अविनाश बडे, निशा अविनाश बडे, अविनाश बडे (सर्व रा. गुलमोहर रस्ता, सावेडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. फिर्यादी व संशयित आरोपी यांच्यात पाणी भरण्याच्या कारणावरून वाद झाले. या वादातून संशयित आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी, लोखंडी पाईपने मारहाण केली. अविनाशने लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.
तसेच निशा व अविनाश यांनी तुझ्या घरातील मुलीला अॅसिड टाकून मारून टाकू, तुझ्या आईला व तुला जिवे मारून टाकू अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. दरम्यान, सदरचा प्रकार पीडिताने दुसर्या दिवशी तोफखाना पोलिसांना सांगितला. पोलिसांनी तिघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास महिला पोलीस अंमलदार प्रियंका राऊत करत आहेत.