Wednesday, April 15, 2026
Homeब्रेकिंग न्यूजलग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार

तोतया पोलीस अटकेत

- Advertisement -

वावी | वार्ताहर Vavi

कॅप्टन खरात प्रकरण ताजे असतांनाच सिन्नर तालुक्यातील नांदुरशिंगोटे येथील ३५ वर्षीय महिलेची सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख करून घेत पोलीस असल्याचे भासवून एकाने फसवणूक, आर्थिक शोषण, ब्लॅकमेलिंग व अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याची धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संबंधित महिलेने वावी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी संशयितास ताब्यात घेतले आहे.

पीडित महिलेची दोन वर्षांपूर्वी इंस्टाग्रामवर आशुतोष पाटील नावाच्या व्यक्तीसोबत ओळख झाली. पुढे व्हॉट्सअ‍ॅप व इंस्टाग्रामवर संवाद वाढत जाऊन दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. आरोपीने स्वतःचे खरे नाव आसीफ कौसर तडवी रा. जळकी बाजार, ता. सिल्लोड, जि. संभाजीनगर असल्याचे सांगितले. त्याने पीडितेच्या घरी येऊन तिच्या कुटुंबीयांचीही भेट घेतली आणि लग्नाचे आमिष दाखवले. मात्र, त्याने आजपर्यंत लग्न न करता उलट पीडितेची फसवणूक केल्याचे महिलने तक्रारीत म्हटले आहे.

आरोपीने स्वतःला पोलीस उपनिरीक्षक असल्याचे सांगून पीडितेचा विश्वास जिंकला. मात्र, त्याने कधीही आपली ओळख सिद्ध केली नाही. २९ नोव्हेंबर २०२५ रोजी आरोपीने पीडित महिला एकटी असताना तिच्याकडे जबरदस्तीने शरीरसुखाची मागणी केली. विरोध केल्यावर त्याने तिला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर काही महिन्यांनी व्हॉट्सअ‍ॅप कॉलद्वारे धमकावत तिला अश्लील कृत्य करण्यास भाग पाडले. त्या घटनेचे त्याने मोबाईलवर रेकॉर्डिंग करून पुढे व्हायरल केल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

आरोपीने संबंधित व्हिडिओ गावातील एका व्यक्तीला पाठवून तो व्हायरल केला. तसेच ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करून बनावट फोटो तयार करून सोशल मीडियावर प्रसारित केल्याने पीडितेची समाजात बदनामी झाली. आरोपीने आजारपण, अपघात, कर्ज व मोटारसायकल खरेदीच्या कारणाखाली गेल्या दोन वर्षांत पीडितेकडून जवळपास ३ लाख रुपये उकळल्याचेही समोर आले आहे.

महिलेने ही रक्कम परत मागीतल्यानंतर त्याने पैसे परत करण्यास नकार दिला. फेब्रुवारी २०२६ पासून आरोपी पीडितेला सतत धमक्या देत होता. फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर दबाव टाकला जात होता. तसेच तिच्या कुटुंबीयांनाही जीवे मारण्याची धमकी आरोपी देत असल्याचे महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. उपनिरीक्षक प्रमोद सरवर, हवालदार शहाजी शिंद, किरण पवार पुढील तपास करत आहेत.

ऑफिसमध्ये येऊन पुन्हा गैरवर्तन
४ एप्रिल २०२६ रोजी दुपारी आरोपी मोटारसायकलवर येऊन पीडितेच्या कार्यालयात घुसला. पोलीस असल्याचे भासवून त्याने तिच्याशी गैरवर्तन, छेडछाड केली व धमकावले. त्यानंतर तो बाहेर थांबला असताना पीडितेने तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपीकडून पोलिसांचे बनावट आयडी कार्ड, टोपी, कपडे, शुज व त्याची दुचाकी जप्त केली आहे. पीडित महिलेने तिच्या आईसमवेत पोलीस ठाण्यात हजर राहून याबाबत तक्रार दिली आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : 12 विधानसभा मतदारसंघात 71 टक्के मतदारांचे मॅपिंग पूर्ण

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमातंर्गत जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत 70.57 टक्के मतदारांचे 2002 च्या मतदार यादीशी मॅपिंग पूर्ण झाले आहे. यात सर्वात...