संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संगमनेर शहरातील अवैध गोवंश कत्तलखान्यावर सोमवारी (दि.13) छापा टाकून जवळपास एक टन (950 किलो) गोमांस जप्त केले आहे. या पथकाची आठवडाभरात चौथी कारवाई आहे. तरी देखील कत्तलखाने बंद होत नसल्याचेच स्पष्ट होत आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गोवंश जनावरांची कत्तल करणार्या ठिकाणांची व गोमांस विक्री करणार्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत.

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेतील पोली उपनिरीक्षक महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, विजय पवार, बाळासाहेब गुंजाळ, अमृत आढाव, योगेश कर्डिले, चालक उत्तरेश्वर मोराळे यांचे पथक तयार करुन त्यांना संगमनेर शहरामध्ये गोवंश जनावरांची कत्तल करणार्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत रवाना केले.
हे पथक सोमवारी शहरामध्ये कत्तलखान्याची माहिती काढत असताना गुप्त बातमीदारामार्फत जमजम कॉलनीतील गल्ली क्रमांक 6 येथे पत्र्याच्या शेडमध्ये इसम नवाज जावेद कुरेशी हा त्याच्या साथीदारासह गोवंश जनावरांची कत्तल करत असल्याची माहिती मिळाली. पथकाने तत्काळ बातमीतील ठिकाणी छापा टाकण्यासाठी जात असताना पोलिसांची चाहूल लागताच तेथील इसम गल्लीबोळातून पळून गेले. याठिकाणी पाहणी केली असता गोमांस दिसून आले.
पथकाने हे गोमांस कोणाच्या मालकीचे आहे.
याबाबत विचारपूस केली असता तेथील लोकांनी नवाज जावेद कुरेशी, समद जावेद कुरेशी, नावेद जावेद कुरेशी (सर्व रा. भारतनगर, संगमनेर) यांचे असल्याचे सांगितले. याठिकाणावरुन 2 लाख 85 हजार रुपये किमतीचे 950 किलो गोमांस, 2200 रुपये किमतीचा एक चाकू, 2 काणस व एक इलेक्ट्रीक वजन काटा असा एकूण 2 लाख 87 हजार 200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत शहर पोलिसांत वरील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शहर पोलीस करत आहे.




