Wednesday, April 15, 2026
HomeनगरSangamner : राज्यघटना देशाला एकसंघ ठेवण्यासाठी जपा - थोरात

Sangamner : राज्यघटना देशाला एकसंघ ठेवण्यासाठी जपा – थोरात

संगमनेरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

जगात पददलित आणि शोषितांच्या न्यायासाठी होणार्‍या प्रत्येक क्रांतीमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार महत्त्वाचे आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले समतेचे आणि मानवतेचे विचार हे जगातील प्रत्येकासाठी सदैव प्रेरणादायी असून त्यांनी दिलेली राज्यघटना देशाला एकसंघ ठेवण्यासाठी जपा, असे आवाहन काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणी समितीचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

- Advertisement -

संगमनेरात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त डॉ. आंबेडकर पुतळा येथे अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजीत तांबे, दुर्गा तांबे, नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे, युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा डॉ. जयश्री थोरात, सुधाकर रोहम, उत्कर्षा रूपवते, कुसुम माघाडे, प्रा. शशिकांत माघाडे आदिंसह विविध पदाधिकारी, मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते. माजी मंत्री थोरात पुढे म्हणाले, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आज संपूर्ण जगामध्ये अभिवादन होत आहे. ते आंतरराष्ट्रीय पातळीवरील मोठे व्यक्तिमत्व आहेत. देशाच्या आणि आपल्या सर्वांच्या वाटचालीमध्ये त्यांचे योगदान राहिले आहे.

राज्यघटनेमुळे अनेकांना पदे मिळाली आहेत. त्यांनी अत्यंत कठीण काळामध्ये शिक्षणाला सुरुवात केली. बडोद्याचे सयाजीराव गायकवाड आणि शाहू महाराज यांनी त्यांना शिक्षणासाठी मोठी मदत केली. कायदेतज्ज्ञ, इतिहासकार, समाजतज्ज्ञ, अर्थतज्ञ असलेल्या डॉ.आंबेडकरांमध्ये मोठी विद्वत्ता होती असे नमूद करत देशामध्ये सध्या राज्यघटना धोक्यात आली असून न्यायव्यवस्था, निवडणूक आयोग, ईडी यासारख्या संस्था स्वायत्त आहे की नाही हा मोठा प्रश्न आहे. राज्यघटनेला जर कोणी पायदळी तुडवणार असेल तर सर्वांनी सक्षमपणे राज्यघटनेच्या विचारांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.

मागील 40 वर्षांपासून माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. थोरात, तांबे परिवार हा कायम लोकशाही मानणारा व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जोपासणारा आहे आणि यापुढेही हाच विचार जोपासला जाईल असे सांगून आमदार सत्यजीत तांबे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची सुरुवात घरापासून करा. घरात विचार आले तर देशात येतील असे ते म्हणाले.

अश्वारुढ व पूर्णाकृती पुतळा होणार…
संगमनेर बसस्थानकावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि याठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभा करण्यात येणार आहे. शेजारी संविधान भिंत निर्माण केली जाणार असून छत्रपतींचा पुतळा असलेल्या जागेवर 100 फूट तिरंगा झेंडा उभा करण्यात येणार आहे. माळीवाडा परिसरात महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा पुतळा उभा केला जाणार आहे. यासाठी नगरपालिकेच्या पहिल्याच बैठकीमध्ये हा ठराव मंजूर करण्यात आला असून हा सर्व परिसर राष्ट्रप्रेमाचा विचार देणारा ठरेल.
सत्यजीत तांबे (आमदार)

ताज्या बातम्या

Ahilyanagar : मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश अन् विविध प्रशिक्षणाबाबत प्रश्नचिन्ह

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar केंद्र शासनाकडून स्पष्ट निर्णय न झाल्याने राज्यभर समग्र शिक्षा अभियान सध्या ठप्प आहे. यामुळे मोफत विद्यार्थ्यांची गणवेश, पाठ्यपुस्तके योजनेसह शिक्षक, साधन व्यक्तींचे...