अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
सरकारच्यावतीने महिलांमधील गर्भाशय मुखाच्या कॅन्सरला लगाम घालण्यासाठी 14 ते 15 वर्षे वयोगटातील मुलींचे लसीकरणाची मोेहिम हाती घेण्यात आली आहे. गर्भाशय मुखाच्या कॅन्सरला एचपीव्ही विषाणूचे संक्रमण कारणीभूत असून या एचपीव्हीमुळे केवळ महिलांच नव्हे, तर पुरूषांनाही मुख, जिभेसह घशाच्या कॅन्सरची शक्यता आहे. यामुळे महिलांसह पुरूषांनाही एचपीव्हीचे लसीकरणासोबत वेळीच निदान, उपचार आवश्यक असल्याचे मत नगरचे कॅन्सरतज्ज्ञ डॉ. सतिष सोनवणे यांनी व्यक्त केले.
गर्भाशय मुखाच्या कॅन्सरला उच्च जोखमीचे एचपीव्ही विषाणूचे संक्रमण असून यासह लवकर लैंगिक जीवन सुरु करणे, अनेक लैंगिक भागीदार, धूम्रपान, एचआयव्ही, प्रतिरक्षा कमी होणे, दीर्घकाळ हार्मोन्स-ओसीपीचा वापर, अनेक प्रसूती, नियमित चाचणी न होणे ही कारणे आहेत. या कॅन्सरमध्ये रुग्णाला सुरुवातीला अनेकदा लक्षणे नसतात. मात्र, नंतरच्या लक्षणात लैंगिक संबंधानंतर रक्तस्राव, असामान्य रक्तस्राव दुर्गंधीयुक्त स्त्रीरज्जू, पेल्विक वेदना, संभोगात वेदना, मूत्र/वृक्कांशी संबंधित समस्या, वजन कमी होणे किंवा पाय सुजणे आदी प्रकार दिसून येतात.
या कॅन्सरला रोखण्यासाठी लसीकरण हा प्रमुख प्रतिबंधक उपाय असला तरी तो शंभर टक्के प्रभावी आहे, असे नाही. यामुळे नियमित पॅप व एचपीव्ही स्क्रीनिंग, गर्भाशय ग्रीवा कॅन्सर तपासण्यासाठी सर्वात उपयुक्त आहे. तसेच धूम्रपान बंद करणे, सुरक्षित लैंगिक आचरण व डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली वेळेत निदान व योग्य उपचार याला महत्व असल्याचे डॉ. सोनवणे यांनी आर्वजून सांगितले. तसेच महिलांप्रमाणे पुरूषांना एचपीव्हीमुळे धोका असून या विषाणूमुळे मुख, जिभेसह घशाच्या कॅन्सरची शक्यता आहे.
एचपीव्ही म्हणजे काय ?
एचपीव्ही हा छोटा विषाणू आहे, जो त्वचा आणि श्लेष्मलपीदांच्या संपर्कातून पसरतो. अनेक प्रकारचे एचपीव्ही असतात (सुमारे 100 हून प्रकार). काही प्रकार साध्या तोंडातील/त्वचेवरील वेर्ट्स देतात, तर काही प्रकार कॅन्सरशी संबंधित असतात.
एचपीव्ही कसे पसरतात
मुख्यतः लैंगिक (यौन) संपर्काद्वारे पसरतो, लैंगिक सान्निध्य, जननांग संपर्क, ओरल सेक्स. त्वचा संपर्क, जसे जननांग भागातील संपर्क, पण कंडोम पूर्ण संरक्षण देत नाहीत. अनेकदा शरीर आपोआप विषाणू नष्ट करतो; परंतु काही लोकांमध्ये संक्रमण दीर्घकाळ टिकते आणि समस्या होते. तसेच इतर अनोजेनेटल कॅन्सरमध्ये वेजाइना, व्हल्वा (महिलांमध्ये), पेन्स (पुरुषांमध्ये), अॅनस कॅन्सर- काही एचपीव्ही प्रकार कारणीभूत ठरतात. ओरोफॅरिंक्स (तोंड/गळ्याचे) कॅन्सर- विशेषतः पुरुषांमध्ये एचपीव्हीची संबंधीत आहेत.
एचपीव्हीला प्रतिबंध
लसीकरणासोबतच पॅप स्मिअर किंवा एटेस्ट नियमितपणे करणे महत्त्वाचे आहे. मात्र, लस घेतली तरी सर्व एचपीव्हीपासून शंभर टक्के संरक्षण होत नाहीत म्हणून स्क्रीनिंग आवश्यक आहे. तसेच सुरक्षित लैंगिक आचरण व कंडोम वापरल्यास धोका कमी होतो परंतु पूर्णपणे नाही. एकाच भागीदाराशी कायमचे नाते आणि लसीकरण यामुळे जोखीम कमी होते. तसेच आरोग्य शिक्षण व जनजागृती आवश्यक आहे.
लसीकरणात नगर राज्यात तिसर्या स्थानावर
सरकारच्यावतीने 9 मार्चपासून राज्य एचपीव्ही प्रतिबंधकात्मक लसीकरण सुरू केली आहे. यात नगर शहरी व ग्रामीण भागात शासकीय आरोग्य संस्थांमध्ये एचपीव्ही लसीकरण करण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 840 मुलींना एचपीव्हीची लस देण्यात आलेली आहे. यात नगर मनपा 60, जिल्हाशल्यचिकित्सक 56 आणि जिल्हा परिषद आरोग्य विभाग 724 अशी आकडेवारी आहे. या लसीकरणात नगर जिल्हा सध्या राज्यात तिसर्या स्थानावर आहे. नगरच्या पुढे ठाणे आणि जळगाव जिल्हे आहेत.
जागतिक गर्भाशय कर्करोगमृत्यूंपैकी एक चौथ्यांश
जागतिक आरोग्य संघटनेच्या 2022 अहवालानुसार, भारतात दरवर्षी गर्भाशय कर्करोगाचे 1 लाख 20 हजारांहून अधिक नवीन प्रकरणे आणि जवळजवळ 80 हजार मृत्यू नोंदवले जातात- ही जागतिक पातळीवर सर्वाधिक मृत्युसंख्या आहे. खरेतर, जगभरातील वार्षिक गर्भाशय मुख कर्करोग मृत्यूंपैकी सुमारे 25 टक्के भारतात आहे. दर चार मिनिटांनी एक नवीन प्रकरण निदान होते, आणि सुमारे दर सात मिनिटांनी आणखी एक महिला यामुळे मरण पावते.सध्या अंदाजे भारतात जन्म घेणार्या प्रत्येक 50 पैकी एका मुलीला तिच्या आयुष्यात गर्भाशय ग्रीवा कर्करोग होण्याची शक्यता आहे, आणि व्यापक लसीकरणामुळे हा धोका लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो.
भारतामध्ये लसीकरण कार्यक्रम नसतानाही स्क्रीनिंग, वैयक्तिक स्वच्छता व स्वच्छतेचे पालन आणि लवकर आरोग्य हस्तक्षेप यांमुळे गर्भाशयग्रीवा कर्करोगाचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र हे 100 टक्के परिणामकारक नाही. म्हणूनच कझत लसीकरणाची गरज आहे.
– डॉ. सतीष सोनवणे, कॅन्सर तज्ज्ञ




