Friday, May 3, 2024
HomeUncategorizedबचत गटातून महिला सक्षमीकरण

बचत गटातून महिला सक्षमीकरण

कुटुंबाच्या दैनंदिन गरजा पतीच्या पगारातून भागवण्यासाठी देवळाली कॅम्प परिसरातील महिलांना अथक प्रयत्न करावे लागत. तरीही काही साध्य होत नसल्याने नाईलाजाने दरमहा 10 ते 20 टक्के व्याजाने पैसे घावे लागत असत. कितीही परतावा केला तर व्याज संपत नसे. मुद्दल कधी फेडायचे, हा प्रश्न ‘आ’ वासून उभा होता. बचत गटामुळे तो मार्गी लागला. 500 महिला व त्यांचे कुटुंबीय आता आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले आहे. त्यामुळे महिला सबलीकरणास खर्‍या अर्थाने बळकटी मिळाली आहे.

नाशिक जिल्हा महिला बचतगट व जिजाऊ सेवा भावी संस्थेच्या सहकार्याने देवळाली कॅम्प परिसरात 50 महिला बचतगट स्थापन केले. 500 महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी 2010 पासून सुरुवात केली. या भागातील अनेक कुटुंबे सावकारी पाशात अडकल्याने त्यांचे दारिद्य्र दूर होत नव्हते. महिलांच्या सबलीकरणासाठी सरकारने अनेक योजना सुरू केल्या, पण त्याचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचत नव्हता. पुढाकार घेऊन अश्विनीताई बोरस्ते यांच्या माध्यमातून तुलसी महिला बचत गटाची स्थापना केली. 2 टक्के वार्षिक व्याजदराने महिलांना कर्ज उपलब्ध होऊ लागले. जमा होणारे व्याज 5 वर्षांनी महिला सदस्यांना पुन्हा दिले जाते. त्यामुळे बचत गटांना मोठा प्रतिसाद मिळाला.

- Advertisement -

बघता-बघता 500 महिलांचे 50 गट तयार झाले. आज या गटांचा महिन्याची आर्थिक उलाढाल 15 ते 20 लाखांवर पोहोचली आहे. सर्व व्यवहार बँकेमार्फत आणि धनादेशाने होतात. त्यामुळे व्यवहारात पारदर्शकता आली आहे. हा विश्वास लाखमोलाचा ठरत आहे. दररोजच्या खर्चातून शिल्लक राहणारे पैसे आता कपाटात, साडीच्या घडीत वा डब्यात न ठेवता ते बचत गटातून बँकेत जमा होऊ लागले आहेत. घरखर्च, मुलांचे शिक्षण, दवाखाना यासाठी घरातील कर्त्या पुरुषाला मदत होऊ लागली.

आर्थिक सक्षमीकरण झाल्याने सावकारी फास टळू लागला. कुटुंबातील वादविवाददेखील थांबले. उलट पुरुष मंडळी स्वतः एखादे आर्थिक काम असल्यास बचत गटातून कर्ज मिळाले तर बरे होईल, असे पत्नीला सांगतात. केवळ कुटुंबासाठी नव्हे तर सामाजिक जबाबदारी म्हणूनदेखील बचत गट वेळोवेळी आघाडीवर राहत आहेत.

बचत गटातील महिला दरवर्षी देशातील धार्मिक आणि सार्वजनिक ठिकाणी भेटी देतात. सामाजिक एकोपादेखील त्यातून दिसत आहे. शासनदेखील महिला बचतगटांना प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे खर्‍या अर्थाने महिला सबलीकरण होत आहे. बचत गटांना विविध सण-उत्सवांत अनेक लघुउद्योग करण्याची संधी दिली जाते. मेणबत्ती, द्रोण, वाती, अगरबत्ती, फराळ अशी अनेक कामे मिळतात. महिला ती कामे घरी बसून करू शकतात.

यामुळे घरातच रोजगार उपलब्ध होतो. शासनाने आता तुलसी महिला बचत गटाला स्वस्तधान्य दुकान मिळाले आहे. ‘करोना’च्या महामारीत विविध हॉस्पिटलमध्ये डबे पुरवण्याचे कामदेखील मिळाले आहे. देवळाली परिसरात सावकारी पाशातून अनेक कुटुंबे मुक्त होऊन स्वाभिमानाने जीवन जगत आहेत. महिला बचत गटाची हीच खरी ताकद आहे.

-कावेरी कासार

(संस्थापिका, तुलसी महिला बचत गट)

- Advertisment -

ताज्या बातम्या