Sunday, November 1, 2026
HomeनगरAhilyanagar : महिला शेतकरी नोंदणी, प्रमाणपत्र वितरणात नगर राज्यात अव्वल!

Ahilyanagar : महिला शेतकरी नोंदणी, प्रमाणपत्र वितरणात नगर राज्यात अव्वल!

3 लाख 20 हजार महिलांची नोंदणी || 1 लाख 5 हजारांहून अधिक प्रमाणपत्रांचे वितरण

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

महिला शेतकर्‍यांना स्वतंत्र ओळख मिळवून देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेत नगर जिल्ह्याने राज्यात अव्वलस्थान पटकावले आहे. जिल्ह्यात 30 ऑक्टोबरअखेर तब्बल 3 लाख 20 हजार महिला शेतकर्‍यांची नोंदणी पूर्ण झाली असून 1 लाख 5 हजारांहून अधिक महिला शेतकरी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले आहे. नोंदणी आणि प्रमाणपत्र वितरण या दोन्ही बाबींमध्ये जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे.

- Advertisement -

संयुक्त राष्ट्रसंघाने 2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केले आहे. या पार्श्वभूमीवर महिला शेतकर्‍यांचे शेती आणि शेतीपूरक व्यवसायांमधील योगदान अधोरेखित करण्यासाठी तसेच त्यांना स्वतंत्र ओळख, सन्मान आणि अधिकार मिळवून देण्यासाठी राज्य शासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेची अहिल्यानगर जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. महिला शेतकरी सक्षमीकरणाच्या दृष्टीने राज्य शासनाने जुलै 2026 मध्ये झालेल्या पावसाळी अधिवेशनात ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, 2026’ संमत केला. या कायद्यामुळे प्रत्यक्ष शेती आणि शेतीपूरक व्यवसायांमध्ये कार्यरत असलेल्या, मात्र स्वतःच्या नावे शेतजमीन नसलेल्या महिलांनाही स्वतंत्र महिला शेतकरी म्हणून कायदेशीर ओळख मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

महिला शेतकरी प्रमाणपत्रामुळे महिलांना शासकीय स्तरावर स्वतंत्र ओळख मिळण्यास मदत होणार आहे. तसेच पात्रतेनुसार विविध कृषी योजना, अनुदाने, संस्थात्मक कर्ज, पीक कर्ज आणि पीक विमा योजनांचा लाभ घेण्याची प्रक्रिया सुलभ होणार आहे. याशिवाय बियाणे, खते व अन्य कृषी निविष्ठा, कृषीविषयक प्रशिक्षण, आधुनिक तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन, कृषिमालाची साठवणूक, वाहतूक आणि बाजारपेठेशी जोडणी यांसारख्या सुविधांचा लाभ मिळविण्यासही मदत होणार आहे.

विशेषतः स्वतःच्या नावे शेतजमीन नसतानाही प्रत्यक्ष शेतीत राबणार्‍या महिलांना या प्रमाणपत्राच्या माध्यमातून स्वतंत्र ओळख मिळू शकणार आहे. त्यामुळे महिला शेतकर्‍यांचे आर्थिक सक्षमीकरण होण्यासह कृषी क्षेत्रातील त्यांचा सहभाग अधिक बळकट होण्याची अपेक्षा आहे. मात्र, विविध शासकीय योजनांचे लाभ संबंधित योजनांच्या अटी आणि पात्रतेनुसारच मिळणार आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील अधिकाधिक महिलांनी महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणी करून घ्यावी. यासाठी संबंधित गावातील सहायक कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केले आहे.

कृषी विभागाच्या नियोजनाला यश
महिला शेतकरी नोंदणी आणि प्रमाणपत्र वितरणात जिल्ह्याने मिळविलेले यश हे कृषी विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांच्या समन्वित प्रयत्नांचे फलित मानले जात आहे. मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी क्षेत्रीय स्तरावर नियोजन करण्यात आले असून, नोंदणी आणि प्रमाणपत्र वितरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. या प्रयत्नांमुळेच जिल्ह्याला राज्यात दुहेरी अव्वलस्थान मिळविता आले आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी अखेरचा सुपर संडे

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा बँकेच्या पंचवार्षिक संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी उद्या 2 नोव्हेंबर रोजी मतदान होऊन त्यानंतर लगेच 3 तारखेला मतमोजणी होणार आहे. दरम्यान निवडणुकीच्या...