श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
श्रीरामपूर तालुक्यातील रामपूर कोकरे परिसरातील गोदावरी नदीपात्रातील वाळूपट्ट्याच्या लिलावाविरोधात ग्रामस्थांनी तीव्र आक्रमक भूमिका घेतली असून, महिलांवर झालेल्या कथित दगडफेकीच्या घटनेनंतर रामपूर व नाऊर येथे झालेल्या विशेष ग्रामसभांमध्ये संतप्त भावना व्यक्त करण्यात आल्या. महिलांनी रणरागिणीचा अवतार धारण करत वाळूचा रस्ता होऊ देणार नाही, तसेच नदीपात्रातील वाळूचा एक खडादेखील उचलू देणार नाही, असा निर्धार व्यक्त केला.

रामपूर येथे आयोजित विशेष ग्रामसभेला मोठ्या संख्येने महिला, शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी महिलांनी आक्रमक भूमिका घेत वाळू उपसा व वाहतुकीला ठाम विरोध दर्शविला. परिसरातील शांतता, शेती व पाणीपुरवठा धोक्यात घालणार्या वाळू उपशाविरोधात आता अहोरात्र जागता पहारा ठेवण्यात येईल, असा इशाराही ग्रामसभेतून देण्यात आला. ग्रामसभेनंतर महिलांनी ट्रॅक्टरमधून नाऊर गावाकडे मोर्चा काढत तेथेही विशेष ग्रामसभा घेतली. नाऊर ग्रामस्थांनीदेखील एकमुखाने वाळू उपशाला विरोध दर्शवत शासनाने संबंधित वाळूपट्ट्याचा लिलाव तात्काळ रद्द करावा, अशी मागणी केली. दोन्ही गावांतील ग्रामस्थांनी गोदावरी नदी ही परिसराचा आत्मा आहे असे सांगत नदीपात्रातील वाळू संवर्धनासाठी एकजुटीने लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी अनेक शेतकरी व महिलांनी आपल्या भावना तीव्र शब्दांत मांडल्या. गोदावरी नदीमुळेच शेती आणि शेतीपूरक व्यवसाय टिकून आहेत. नदीपात्रातील वाळूमुळे पाझरपाणी टिकते आणि सिंचनासाठी पाणी उपलब्ध राहते. त्यामुळेच या भागात अद्याप तीव्र पाणीटंचाई जाणवलेली नाही, असे ग्रामस्थांनी सांगितले. वाळू उपशामुळे भूजलपातळी खालावण्याचा धोका निर्माण होणार असून भविष्यात शेती उद्ध्वस्त होण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली. नाऊर परिसरातील नागरिकांनी गोदावरी नदीतील वाळूचे संरक्षण केले आहे. शंभर वर्षांच्या इतिहासात आम्ही वाळूचा एक कणदेखील उचलू दिलेला नाही. यापुढेही वाळूचे रक्षण करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत, असा निर्धार महिलांनी ग्रामसभेत व्यक्त केला.
महिलांवर झालेल्या दगडफेकीच्या घटनेचा निषेध करत संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली. ग्रामस्थांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की, स्थानिकांच्या भावना आणि शेतीचे हित लक्षात न घेता वाळू उपशाचा निर्णय राबविण्यात आल्यास तीव्र स्वरुपात समृद्धी महामार्ग वर लोकआंदोलन उभे राहील. दरम्यान, गोदावरी परिसरातील सर्व गावांनी एकत्र येऊन नदी संवर्धनासाठी व्यापक जनआंदोलन उभारण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. महिलांच्या आक्रमक भूमिकेमुळे रामपूर व नाऊर परिसरातील वातावरण चांगलेच तापले असून प्रशासनाची पुढील भूमिका काय राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महिलांवर दगडफेक होऊनही संबंधित वाळू वाहतूकदारांवर अद्याप ठोस कारवाई न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तालुका महसूल प्रशासनाने घटनाकडे गांभीर्याने लक्ष देऊन दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी होत आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असताना प्रशासन नेमके कोणाची वाट पाहत आहे? असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात असून, लवकर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
वाळू उपशाविरोधात आम्ही ग्रामस्थांसोबत – महंत राममगिरी महाराज
रामपूर नाऊरसह सराला-गोवर्धन, वांजरगावसह गोदावरी परिसराचा वाळू उपसाला विरोध आहे. वाळू गेल्यामुळे शेतीचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होतो, वाळूमुळे मुले व्यसनाधीन बनतात, खेड्यातील रस्ते पुर्णतः उखडून जाऊन रस्त्याची दुरवस्था होते, ग्रामीणचे रस्ते पुन्हा होत नाही, त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचा येण्या-जाण्याचा प्रश्न निर्माण होतो, वाळू उचलल्यामुळे पाण्याचा स्पीड वाढून बेटाला धोका निर्माण होऊ शकतो, सराला बेट हे महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असून, शेतकरी व रामपूरच्या सर्व गावकर्यांनी वाळू उपशाला जो विरोध केला आहे, त्या लढ्याला आम्ही तुमच्या सोबत असून नदीपात्रात पाणी असताना तहसिलदार यांना ठेकेदाराला ताबा देण्याचा किंवा नदीपात्रात साधन नेण्याचा कुठलाही अधिकार नाही. याबाबत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व मंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा झाली असून अजूनही काही मंत्री महोदयाशी बोलण्याची गरज पडल्यास त्यांच्याशी देखील बोलू, वाळू उपशा विरोधात आम्ही तुमच्या सोबत असल्याचे मठाधिपती रामगिरी महाराज यांनी ठणकावून सांगितले.




