मुंबई | प्रतिनिधी Mumbai
पुढील वर्षी त्र्यंबक-नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी २२ हजार १८१ कोटी रुपयांच्या कामांना शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षेतेखाली झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामध्ये पहिल्या टप्प्यातील ५ हजार १४० कोटी आणि दुसऱ्या टप्प्यातील १७ हजार ४१ कोटी रुपयांच्या कामांचा समावेश आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षेतेखाली आज विधानभवनात नाशिक सिंहस्थ कुंभमेळा शिखर समितीची बैठक पार पडली. या बैठकीत कुंभमेळा निमित्त सुरू असलेली आणि प्रस्तावित असलेल्या कामांमध्ये कुणी वाईट हेतूने किंवा मुद्दाम विलंब होण्याच्या हेतूने अडथळा आणत असेल तर त्याची गय केली जाणार नाही. त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा फडणवीस यांनी यावेळी दिला.
कुंभमेळा निमित्ताने करण्यात येणाऱ्या कामांसाठी लागणाऱ्या जमिनीच्या भूसंपादनाचा योग्य मोबदला शेतकऱ्यांना देण्यात यावा. नाशिक वर्तुळ मार्गातील अडथळे दूर करीत विशेष बाब म्हणून ५० टक्के भूसंपादन पूर्ण झाल्यानंतर रस्त्याच्या कामाला सुरुवात करावी. कुंभमध्ये स्वच्छता अत्यंत महत्वाची असून या कामांमध्ये करण्यात येणारी शौचालय दर्जेदार असावी. कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकच्या परिसरातील स्थानकांची पायाभूत सुविधांची कामे रेल्वेच्या माध्यमातून सुरू करण्यात येत आहेत. यामध्ये निफाड रेल्वे स्थानकाचाही समावेश करण्यात यावा. याबाबत रेल्वेने पडताळणी करून कार्यवाही करावी, अशी सूचना फडणवीस यांनी केली.
कुंभमेळ्यासाठी येणारे भाविक शिर्डी आणि शनिशिंगणापूरला निश्चितपणे जाणार आहेत. त्यामुळे शिर्डी ते नाशिक रस्त्याचे काम करण्यात यावे. कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांना संपर्कामध्ये कुठलीही अडचण होऊ नये म्हणून मोबाईल संपर्काची व्यवस्था भक्कम असावी. त्यासाठी आतापासूनच तयारी करण्यात यावी. द्वारका जंक्शन येथे वाहतूक सुरळीत करण्यासाठी सुरू असलेल्या कामांमध्ये अंतर्गत रस्त्यांचा विचार करून परिसरातील रस्त्यांचा एकीकृत विकास करावा. नवीन घाटांच्या जागेकरिता शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा, यासाठी विशिष्ट पद्धतीचा अवलंब करावा. त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त आणि नाशिक येथील गोदावरी नदीतील पाणी कुंभमेळा दरम्यान शुद्ध राहण्यासाठी यंत्रणांनी विशेष काळजी घ्यावी, असे निर्देश फडणवीस बैठकीत यांनी दिले.
नाशिक येथील काळाराम मंदिराचे काम करताना आजूबाजूच्या वाहतुकीला अडथळा होणार नाही, याबाबत दक्षता घेण्यात यावी. राम काल पथाच्या कामाला गती देण्यात यावी. शहरातील ऑप्टिकल फायबर केबलचे काम वेगाने पूर्ण करावे. तसेच स्मार्ट सिटी प्रकल्पातील नादुरुस्त सीसीटीव्ही बाबत पडताळणी करून नवीन सीसीटीव्ही कार्यान्वित करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची मान्यता घ्यावी. अमृत स्नानांच्या दरम्यान शहरातील भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता महाविद्यालयांमधील जागा पार्किंग तसेच पोलिसांसाठी घेण्याबाबत संबंधित विभागाशी चर्चा करून निर्णय घ्यावा, अशी सूचना फडणवीस यांनी केली.
या बैठकीला अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार सीमा हिरे, देवयानी फरांदे, सरोज अहिरे, पंकज भुजबळ, माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, हिरामण खोसकर, राहुल ढिकले, नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेर आदी उपस्थित होते.




