Saturday, May 2, 2026
Homeनाशिकविशेष : नाशिक देवराई साकारताना..

विशेष : नाशिक देवराई साकारताना..

नाशिक | शेखर गायकवाड | Nashik

आज जागतिक वनदिन. नाशिक देवराईच्या साधारण शंभर एकर परिसरात जंगल साकारताना कोणकोणती संकटे आली व त्यावर मात कशी केली त्याचे हे अनुभव. मानवनिर्मित जंगल ही संकल्पना साकारण्यासाठी गिरीपुष्पसारख्या परदेशी वृक्ष प्रजातीने आच्छादलेल्या परिसरात आज दहा वर्षांनंतर जैवविविधता सक्षम असलेलं जंगल उभे राहिले आहे.

- Advertisement -

५ जून २०१५ रोजी वन महोत्सवाअंतर्गत लोक सहभागातून वनविभागाच्या (Forest Department) सहकार्याने एका दिवसात ११ हजार रोपांची साधारण चाळीस एकरामध्ये आम्ही लागवड केली. त्या कार्यक्रमानंतर पुढे त्याचे संगोपन करण्यासाठी कोणी येवो ना येवो, आम्ही त्या रोपांची तीन वर्षे संवर्धनाची जबाबदारी घेतली होती. त्यानंतर विविध मानवी व नैसर्गिक संकटांना तोंड देत दर शनिवारी व रविवारी तर कधी गरज पडल्यास इतर दिवशी जाऊन देवराईत काम सुरू ठेवले. खरं तर मूळ संकट है होतं की, गिरीपुष्प वृक्षांनी आच्छादलेल्या एवढ्या मोठ्या परिसरात या वृक्षाच्या एकसुरी लागवडीमुळे तेथील जमिनीचा (Land) पोत बिघडलेला. अशा परिसरात देशी प्रजातीची रोप लागवड करून संवर्धन करायचं. त्याच वर्षी पावसाळ्यात अल्प प्रमाणात पाऊस झाला; मात्र त्यानंतर पावसाने ओढ दिल्याने जुलैअखेरीस व ऑगस्टमध्ये रोपांना पाणी देण्याची वेळ आली. यादरम्यान एवढ्या मोठ्या परिसराला संरक्षण मिळाल्याने, त्या परिसरात होणारी वहिवाट थांबल्याने तेथे चांगल्याप्रकारे गवत वाढले.

ते वाढलेलं गवत कसं नियंत्रित करायचे, त्यासाठी माझ्या वर्कशॉपमध्ये गवत कापण्याच्या पट्ट्धा तयार करून त्याचा मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी हॉकी स्टिकसारखा वापर करत काही भागात गवत नियंत्रण केले. त्यावर्षी पाऊस (Rain) कमी झाल्याने ऑक्टोबरमध्येच उर्वरित वाळलेले गवत नियंत्रण करण्याबरोबरच रोपांना पाणी देण्यास सुरुवात केली. जानेवारीपासून गिरीपुष्प या वृक्षाला फुले येऊ लागतात. त्याकाळात त्यातून चिकट द्रव जमिनीवर पडत असतो. त्यामुळे त्या भागात लावलेल्या रोपांवर पडून त्या रोपांच्या शेंड्यावर, पानांवर एक चिकट आवरण तयार होत होते. त्यामुळे त्यांच्या वाढीवर परिणाम झाला. दुसरी बाब म्हणजे, त्याकाळात प्रचंड प्रमाणात बारीक काळी कीड तयार होऊन जमिनीवर रांगताना दिसून येई. पाणी देण्यासाठी नळ्या विविध पॉईंटला लावलेल्या होत्या, त्या पूर्णपणे किडींनी गच्च भरलेल्या असायच्या. नळ्यांवर ती कीड वळवळताना दिसून यायची. काम करताना त्या नळ्या झटकून घ्याव्या लागत. त्याचबरोबर मावा ही कीडही अवतीभोवती उडत असे. यामुळे तहान लागल्यावर पाणी पिताना हाताने तोंड झाकून पाणी प्यावे लागे. जानेवारी ते मार्चअखेरपर्यंत प्रत्येक रोप दर आठवड्याला पूर्णपणे धुवून काढावे लागायचे. हा प्रकार सुरुवातीची तीन वर्षे गिरीपुष्पे फुलण्याच्या काळात करावा लागला. त्यानंतर ज्या भागात रोप छान वाढले, त्या भागात गिरीपुष्पाचे नियंत्रण करण्यात आले.

नित्यनियमाने श्रमदान सुरू असताना २६ नोव्हेंबर २०१६ रोजी माझ्या सहकारी सुजाताताई काळे यांचा मुलगा ईशान याला घोणस दंश झाला. त्याला तत्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले. वेळीच उपचार मिळाल्याने वाईट घडले नाही. २०१६ च्या पावसाळ्यामध्ये देवराई परिसरात गवतही चांगल्या प्रकारे वाढले होते. त्यामुळे काही गुराखी आपली गुरे काही ठिकाणी कंपाऊंड तोडून आतमध्ये घालून देत व स्वतः लपून बसत. असे प्रकार हे वेळोवेळी होत. म्हशींनी आपलं डोकं घासण्यासाठी वापर केल्यामुळे काही वाढलेल्या रोपांचे नुकसान होत होते. कधी नळीमध्ये त्यांचे पाय अडकून पाण्यासाठी काढलेले पॉईंट तुटायचे. आधीच आर्थिक संकट त्यात हा खर्चाचा भार पडायचा. त्यावरही वेळोवेळी उपाययोजना करून गुराख्यांना आटोक्यात आणले. त्यातील एक विक्षिप्त होता, त्याच्या गुरांना हाकलून देत असल्याने तो त्याचा राग म्हणून कधी पाईप कापून टाकणे, नळ्यांचे पॉईंट तोडणे, तर कधी चांगले वाढलेले रोप तोडून टाकणे असे प्रकार करत असे. त्याला दम दिल्यानंतर हा प्रकार थांबला.

देवराईच्या (Devrai) मागच्या भागात निवांतपणा असल्याने गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या पार्ध्या होत, पत्त्यांचे डाव खेळले जायचे. त्यांना वेळोवेळी समजावून, तर कधी पोलीस रेड टाकून तेथून काढण्याचे काम करावे लागले. सुरक्षित व निवांत जागा झाल्याने २०१७ मध्ये असं जाणवलं की, इथे सशांची संख्या काही प्रमाणात वाढली. त्याचा परिणाम म्हणजे संगोपन केलेल्या बऱ्याचशा चांगल्या रोपांना ससे कुरतडून, वरचे शेंडे काढून टाकत होते. त्यांची शेंडे काढून टाकण्याची पद्धत अशी होती की, असं वाटायचं कोणीतरी मुद्दाम कात्रीने किंवा धारदार अवजाराने कापून बाजूला ठेवत आहे की काय! कारण ते शेंडे तसेच रोपाच्या बाजूलाच पडलेले असायचे; एक पण पान खाल्लेलं नसायचं. काही दिवसांनी लक्षात आलं, हे सशांचं काम आहे. हतबल होत यांना आटोक्यात कसं आणायचं ते सूचत नव्हते. ते कमी म्हणून की काय काही रोपांवर वेगवेगळ्या प्रकारच्या बोरकिड्यांचा उच्छाद सुरू झाला. चांगल्या वाढीस लागलेल्या रोपांची खोडांवरची काही भागातली साल पूर्ण गोलाकार फिरून खात होते, तर काही रोपांना छिद्र पाडून त्यांच्या खोडांमध्ये शिरले होते. गोल खोडावरची साल खाणाऱ्या किड्यांविषयी शेतीतज्ज्ञांना दाखवून बघितले; पण त्यांना त्याविषयी माहिती नव्हती. शेवटी बऱ्याच प्रयोगांती मी त्यावर देशी दारूचा फवारणीसाठी उपयोग केला. त्यामुळे बऱ्यापैकी या गोष्टी आटोक्यात आणता आल्या. वणवा लागण्याचे प्रकार बन्याच वेळा झाले. पण आम्ही ग्रास कटरच्या सहाय्याने वेळच्या वेळी गवत नियंत्रण ठेवत असल्याने वणवे आटोक्यात आणण्यास यश मिळाले. त्यामुळे जास्त काही नुकसान झाले नाही.

देवराईच्या संरक्षणासाठी दोन सुरक्षारक्षक ठेवले आहेत. देवराई आणि वनराई मिळून साधारण १० हजार महिना खर्च आहे. याला कुठल्याही प्रकारची शासकीय किंवा राजकीय आर्थिक मदत नाही, केवळ लोकसहभागातून तो होतो. कधी कधी अपुऱ्या देणगीमुळे मध्येच आर्थिक संकट उभे राहायचे. अशावेळी देवदू‌ताप्रमाणे देणगीदार पाठीशी उभे राहिले. श्रमदानासाठी सुरुवातीला पंधरा-सोळा स्वयंसेवक मदतीला येत होते. कोणी दोन तास, तीन तास आपापल्या परीने येत होते. त्यांच्या व्यक्तिगत कारणांमुळे हळूहळू स्वयंसेवकांची संख्या कमी होत दोन-तीनवर आली. नंतर मी आणि दोन सुरक्षारक्षक आम्ही तिघंच काम करत असू. अधूनमधून नवीन एक-दोन स्वयंसेवक येत; पण त्यांचा उत्साह तेवढ्यापुरताच असायचा. पण एप्रिल २०२५ पासून कृषी विद्याशाखेचे दोन विद्यार्थी नित्यनेमाने श्रमदानाला येत आहेत. २०२० पासून बिबट्याचा संचार देवराईत होऊ लागला. मनात भीती ठेवूनच श्रमदान सुरू होते. त्यात बिबट्याची संख्या वाढली. एकाचे तीन झाले. चार-पाच वेळा असा प्रसंग आला की, देवराईच्या काही भागात श्रमदान करायला जाताना, गवतात बसलेला तो आमच्यावर गुरगुरायचा. त्यावेळी आम्ही तेथून बाजूला निघून जाऊन दुसऱ्या भागात काम करत असू, कधी तोच उठून बाजूला निघून जाई! नंतर त्याच्या अस्तित्वाची सवय असल्यासारखे झाले. तरसाचेही वास्तव्य सुरू झाले. आता ते जोडीने आहेत. सापांच्या संख्येमध्ये वाढ झाली. त्यात चार-पाच पाच फुटांचे घोणस आहेत. नाग, धामण श्रमदान करताना कधी अचानक पायाजवळ तर कधी गवतातून रोप मोकळे करताना दिसत. त्यासाठी एक विशिष्ट प्रकारचा पेहराव करून घेतला. त्याचबरोबर ससे अधूनमधून रोप कुरतडण्याचे काम करतच होते.

पावसाळ्यात गिरीपुष्पाचे वृक्ष उन्मळून पडतात. त्याखाली आपली रोपे दबली जातात. त्यांना वेळीच मोकळे करावे लागते. काही भागातले कंपाऊंडचे अँगलच काही नशेबाज मंडळींनी चोरून नेले. अशा वेळेस गिरीपुष्प वृक्षांच्या फांद्याचे खांब उभे करून जाळीला आधार देण्याचे काम मधूनमधून करावे लागते. अशाप्रकारे अकरा वर्षे पूर्ण होत आली आहेत. नाशिक देवराईत साधारण शंभर एकर परिसरात बऱ्यापैकी जंगलात रूपांतर झाले. ऑगस्ट २०२५ मध्ये साळींदराचे काटे सापडले. त्यावेळेस खूप आनंद झाला की, साळींदरासारखा प्राणी आपल्या देवराईत आला. पावसाळा संपला आणि जसं ऊन पडायला लागलं तसं आता सर्व सुरळीत आहे असं वाटत असतानाच, डिसेंबरनंतर काही नवीन लावलेल्या रोपांना पाणी देत असताना काही रोपे बुडापासून तोडून बाजूला फेकलेले व त्या झाडांचे मूळ खाण्यासाठी तिथे खोलवर एक ते दीड फुटाचे खोल खड्डे बघायला मिळाले आणि साळींदरच्या रूपाने एक नवीन भयंकर संकट समोर उभे राहिले. त्याने दोन महिन्यात साधारण ३५० पेक्षा जास्त रोपांचे नुकसान केले. चांगल्या वाढलेल्या, पिवळा करमळसारख्या दुर्मिळ प्रजाती, विविध प्रकारची आंब्याची रोपे यांचे नुकसान झाले. सध्या त्याच्या या उपद्रवाला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. आज चांगल्याप्रकारे ३५ हजारच्या वर विविध प्रकारचे वृक्ष, वेली, बांबू व झुडपांच्या प्रजातीच्या वाढीमुळे परिपूर्ण जंगलात रूपांतर होत आहे. आपल्या अवतीभोवती असलेले छोटे-मोठे जंगल जपा. पुन्हा निर्माण करणं सोपं नाही.

ताज्या बातम्या

Shirdi : पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका यांनी घेतले साई दर्शन

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi अहिल्यानगर जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक म्हणून मुम्मका सुदर्शन (SP Mummaka Sudarshan) यांनी शनिवारी आपल्या पदाची सूत्रे हाती घेतली. पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी शिर्डी...