अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
लग्नाचे आमिष दाखवून एका युवतीला घरातून घेऊन जात तिच्यासोबत राहणार्या तरूणाने रिक्षा खरेदी करण्यासाठी आई-वडिलांकडून पैसे आणण्याचा तगादा लावला. त्यासाठी वारंवार मारहाण, मानसिक छळ आणि उपासमार केल्याचा गंभीर आरोप आहे. तसेच जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या जात असल्याने या त्रासाला कंटाळून युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मानसी संजय ढवळे (वय 19, रा. बुरूडगाव रोड) असे मृत युवतीचे नाव आहे.
याप्रकरणी तिचे वडील संजय बापु ढवळे (वय 45, रा. बुरूडगाव रोड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विशाल आप्पा साठे (रा. साठे वस्ती, माळीवाडा, हल्ली मुन्सीपल कॉलनी, वारूळाचा मारूती) याच्याविरूध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मानसी आणि विशाल यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यातून 1 सप्टेंबर 2026 रोजी विशाल हा मानसीला घरातून घेऊन गेला होता. त्यानंतर दोघेही मुन्सीपल कॉलनी, वारूळाचा मारूती परिसरात राहत होते. या काळात विशाल हा मानसीला रिक्षा खरेदी करण्यासाठी तिच्या आई-वडिलांकडून पैसे आणण्याची मागणी करीत होता. त्यासाठी तिला मारहाण केली जात होती. लग्नाचे आमिष दाखवून सोबत आणल्यानंतर लग्न न करता तिचा मानसिक व शारीरिक छळ केला जात असल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. 20 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास संजय ढवळे कामावर असताना त्यांचा मुलगा विक्रम याचा फोन आला. मानसीने गळफास घेतल्याचे आणि तिला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर संजय ढवळे यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. मानसीने मुन्सीपल कॉलनी परिसरात गळफास घेतला होता.
विशाल साठे आणि त्याच्यासोबत असलेल्या ज्योती नावाच्या महिलेने सकाळी आठच्या सुमारास तिला हॉस्पिटलला आणले होते. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर उपचारापूर्वीच तिला मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर कुटुंबीयांनी नालेगाव येथील अमरधाममध्ये तिच्यावर अंत्यसंस्कार केले व मंगळवारी (24 नोव्हेंबर) पोलिसांत फिर्याद दिली.
मावस भावाला दिली होती माहिती
अंत्यविधीनंतर मयत मानसीचा मावसभाऊ वैभव खंडागळे यांनी कुटुंबीयांना महत्त्वाची माहिती दिली. 19 नोव्हेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास मानसीने त्यांना फोन केला होता. यावेळी विशाल हा सतत मारहाण करीत असून रिक्षा घेण्यासाठी आई-वडिलांकडून पैसे आणण्याचा तगादा लावत असल्याचे तिने सांगितले होते. तसेच लग्नाचे आमिष दाखवून पळवून आणले, बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले; मात्र लग्न केले नाही, असेही तिने सांगितल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या छळाला कंटाळून जगण्याची इच्छा उरली नसल्याचेही तिने म्हटले होते, अशी माहिती वैभवने कुटुंबीयांना दिली.




