अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शहरातील बालिकाश्रम रस्ता येथे लक्ष्मी उद्यानासमोर सोमवारी (27 जानेवारी) रात्री एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा प्रकार अपघात झाल्याच्या कारणावरून घडला आहे. निखील अंबादास इपलपेल्ली (वय 25, रा. शुभवास्तू अपार्टमेंट, अहिल्यानगर) व त्याची बहिण-खुशी आणि मित्र-ओम नरेश थदाणी हे बालिकाश्रम रस्ता, लक्ष्मी उद्यानासमोर गेले असता दुचाकी (एमएच 16 सीएक्स 0408) वरून आलेल्या चार जणांनी त्यांच्यावर हल्ला केला.
हल्लेखोरांनी निखील व त्याच्या मित्रास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यातील एका हल्लेखोराने धारदार शस्त्राने निखीलच्या कंबरेच्या उजव्या बाजूला वार करून जखमी केले. त्यांचा मित्र ओम यालाही मारहाण करण्यात आली. हल्लेखोरांपैकी एका इसमाचे केस लांब होते, तो सडपातळ होता, तर दुसरा मध्यम बांध्याचा होता आणि त्याने कपाळावर टिळा लावलेला होता. घटनेनंतर जखमींना तत्काळ सिव्हिल हॉस्पिटल, अहिल्यानगर येथे दाखल करण्यात आले.या प्रकरणी निखील इपलपेल्ली यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार दीपक जाधव अधिक तपास करत आहेत.