अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
पूर्ववैमनस्यातून पती- पत्नीला मारहाण केली. त्यांचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या भावावर लाकडी दांडके व लोखंडी रॉडने हल्ला करून त्यांच्या खुनाचा प्रयत्न केल्याची घटना नगर तालुक्यातील टाकळी खातगाव शिवारात मंगळवारी (24 डिसेंबर) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. भाऊसाहेब पोपट शिंदे (पत्ता नाही) असे जखमीचे नाव आहे. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
त्यांची बहिण वैशाली राजाभाऊ नरवडे (वय 35 रा. टाकळी खातगाव) यांनी बुधवारी (25 डिसेंबर) रात्री दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात सात जणांविरूध्द खुनाचा प्रयत्न व अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल शिवाजी पादीर, वैभव काशिनाथ पादीर, सचिन मुरलीधर ठाणगे, तन्मय राजेंद्र पादीर, शितल राजेंद्र पादीर, संध्या लक्ष्मण पादीर, संतोष काशिनाथ पादीर (सर्व रा. टाकळी खातगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. वैशाली व त्यांचे पती राजाभाऊ टाकळी खातगाव शिवारातील त्यांच्या शेत गट नंबर 64 मध्ये मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास काम करत होते.
त्यावेळी त्यांना त्यांच्या शेजारी राहणारे संतोष काशिनाथ पादीर व त्यांच्या इतर सहा साथीदारांनी मागील भांडणाच्या कारणावरून लाकडी दांडक्याने मारहाण केली. भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या वैशालीचा भाऊ भाऊसाहेब पोपट शिंदे यांना देखील लाकडी दांडके व लोखंडी रॉडने डोक्यात मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ते गंभीर जखमी झाले असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. जखमी भाऊसाहेब यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक संपत भोसले, एमआयडीसीचे सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक जाधव करत आहेत.