नेवासा |वार्ताहर| Newasa
तू पोलिसांना आमच्या खबर्या देतो का? असे म्हणून शनिवारी पहाटे झोपेत असलेल्या तरुणाला 10 जणांनी मारहाण करुन त्याच्यावर बंदुकीची गोळी झाडल्याची घटना नागफणी साईनाथनगर येथे घडली असून या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला आहे. याबाबत दाखल फिर्यादीवरुन दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सपना शहाराम भोसले (वय 32 रा. नागफणी साईनाथनगर ता. नेवासा) यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, 10 ऑक्टोबर रोजी पहाटे 5 वाजण्याचे सुमारास घरामध्ये मी, पती शहाराम छगन भोसले, सासू प्रयागाबाई छगन भोसले असे आम्ही आमचे मुलांसह झोपलो होतो. भाया रमेश छगन भोसले व जाव रोशनी रमेश भोसले असे दोघे घराच्या बाहेर अंगणात पलंगावर झोपलेले असताना अचानक जाव रोशणी रमेश भोसले ही ओरडत घरात आली म्हणून आम्ही सर्व घराच्या बाहेर येवुन पाहीले असता माझे मामे सासरे कल्याण भानुदास चव्हाण, कुणाल कल्याण चव्हाण, अभिषेक उर्फ अभी कल्याण चव्हाण, गणेश उर्फ गण्या कल्याण चव्हाण, हरण कल्याण चव्हाण, कोमल रोहीत काळे, रोहीत काळे (पूर्ण नाव माहीत नाही), पुजा परसिंग भोसले (सर्व रा. देवगड फाटा, ता. नेवासा), उमेश हारसिंग भोसले रा. जोगेश्वरी ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर, आकाश गौतम चव्हाण रा. वाळुंज असे मिळून भाया रमेश छगन भोसले यास ‘तू पोलीसाचा खबर्या होतो का, तू पोलिसांना आमच्या खबर्या देतो का? तुझा आता जिवच घेतो असे म्हणून शिवीगाळ दमदाटी करुन कुणाल चव्हाण याने त्याचे हातातील तलवार तसेच गणेश उर्फ गण्या चव्हाण व उमेश भोसले हे त्यांचे हातातील कुर्हाड, हरण चव्हाण याचे जवळील कोयता, आकाश चव्हाण याचे हातातील चाकू व कल्याण चव्हाण, कोमल काळे, रोहीत काळे हे त्यांचे हातातील लाकडी दांडक्याने भाया- रमेश छगन भोसले याचे डोक्यावर, हातावर, पोटावर, पायावर मारहाण करीत असताना दिसले.
तेव्हा आम्ही सर्व भाया रमेश छगन भोसले याला वाचवण्यासाठी मध्ये पडलो असता त्यावेळी इंदू नारायण भोसले व सागर नारायण भोसले यांना रोहीत काळे याने लाकडी दांड्याने मारहाण करुन जखमी केले. त्याचवेळी अभिषेक उर्फ अभि कल्याण चव्हाण याने त्याचे हातातील बंदुकीने भाया रमेश छगन भोसले याचे पाठीत गोळी मारुन तुम्हाला एक एकाला याचे सारखीच गोळी मारुन संपवून टाकू अशी धमकी देवून कुणाल चव्हाण याचे हातातील तलवार व लाकडी दांडके तेथेच सोडून तेथुन पळून गेले. दरम्यान गंभीर जखमी रमेश छगन भोसले याच्यावर अहिल्यानगर येथे औषधोपचार सुरु आहेत. वरील फिर्यादीवरुन वरील दहा जणांवर नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं. 844/2026 भारतीय न्याय संहिता कलम 109(1), 118(1), 115(2), 189(2), 190), 190(2), 190(3), 351(2), 352, शस्त्र अधिनियम कलम 3, 4,25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




