मालेगाव । प्रतिनिधी Malegaon
फिडरवरील बिघाड दुरूस्तीसाठी पथदीपावर चढलेल्या कर्मचार्यास वीजेचा जबर धक्का लागून तो खाली पडल्याने जागीच गतप्राण झाला. शहरातील मोतीबागनाका भागात आज सकाळी 6 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. या घटनेने संतप्त झालेल्या शिवसेना पदाधिकारी व ग्रामस्थांनी नुकसान भरपाईसाठी मालेगाव वीजपुरवठा कंपनीच्या अधिकार्यांना घेराव घातला.
मृत कर्मचार्याच्या आई-वडिलांना 36 लाख रूपयांची रोख मदत तसेच संरक्षण विम्याचे 15 लाख असे एकुण 51 लाख रूपये तसेच कुटूंबातील एका सदस्यास अनुकंपावर नोकरी व आई-वडिलांना पेन्शन देण्याचे लेखी आश्वासन कंपनीचे कार्यकारी अधिकारी प्रेमसिंग यांनी दिल्यानंतर हे घेराव आंदोलन मागे घेण्यात आले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा
तालुक्यातील मुंगसे येथील जितेंद्र भागचंद सुर्यवंशी (24) हा अभियंता येथील मालेगाव वीजपुरवठा कंपनीत कार्यरत होता. आज सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास फिडरवरील बिघाड दुरूस्तीसाठी तो मोतीबाग नाक्यालगत खांबावर चढला असता वीजेच्या प्रवाहीत तारेचा धक्का लागल्याने त्याचा हात जळून तो जमीनीवर कोसळला. यात गंभीर दुखापत होवून तो जागीच गतप्राण झाला. त्यास परिसरातील नागरीकांनी तातडीने उपचारासाठी सामान्य रूग्णालयात हलविले असता डॉक्टरांनी तपासणीअंती मृत घोषीत केले.
या घटनेची माहिती मिळताच मुंगसे येथील कुटूंबीय व ग्रामस्थांनी रूग्णालयात धाव घेतली. कंपनीच्या हलगर्जीपणामुळे तरूणाचा अंत झाल्याने ग्रामस्थ संतप्त झाले होते. या घटनेची माहिती शिक्षणमंत्री दादा भुसे यांना ग्रामस्थांनी दिली असता त्यांनी शिवसेना महानगरप्रमुख विनोद वाघ, उपजिल्हाप्रमुख सुनिल देवरे, प्रमोद शुक्ला, श्रीरामा मिस्तरी, प्रमोद पाटील यांना तातडीने रूग्णालयात जाण्याचे निर्देश दिले.
शिवसेना पदाधिकार्यांसह संतप्त ग्रामस्थांनी कंपनी कार्यालयात अधिकार्यांना घेराव घालत मृत कुटूंबियांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. मात्र अत्यल्प मदत दिली जात असल्याने शिवसैनिक व ग्रामस्थ संतप्त झाले होते. जोपर्यंत 50 लाखाची मदत दिली जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही, असा इशारा वाघ यांच्यासह ग्रामस्थांतर्फे देण्यात आला.
अखेर कार्यकारी अधिकारी प्रेमसिंग यांनी वरिष्ठ अधिकार्यांशी चर्चा करत 36 लाख रूपये रोख मदत तसेच विम्याचे 15 लाख रूपये व कुटूंबातील एका सदस्याला नोकरी व आई-वडिलांना पेन्शन असे मदतीचे लेखी आश्वासन दिल्यानंतर घेराव आंदोलन मागे घेण्यात आले. अनुचित प्रकार घडू नये यास्तव पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता. सायंकाळी मृत जितेंद्र सुर्यवंशी याच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात मुंगसे येथे अंत्यसंस्कार केले गेले.