मुंबई | Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांची गेल्यावर्षी दसऱ्याच्या दिवशी १२ ऑक्टोबरला वांद्रे येथील कलानगर परिसरातील कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. यानंतर बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddique) यांनी पोलिसांना जबाब दिला होता. यात बिल्डर आणि नेत्यांची नाव असून झिशानने आपल्या जबाबात बिश्नोई गँगचा उल्लेख केला नसल्याचे बोलले जात आहे. पंरतु, झिशान सिद्दीकी यांनी आपल्या जबाबात ठाकरे गटाचे आमदार अनिल परब आणि भाजप नेते मोहित कंबोज यांची नावे घेतल्याची माहिती समोर आली आहे.
झिशान सिद्दीकी यांनी पोलिसांना (Police) दिलेल्या जबाबात म्हटले की, “माझ्या वडिलांना रोज डायरी लिहण्याची सवय होती. या डायरीत त्यांनी या सगळ्या बिल्डर्सची नावे लिहून ठेवली आहेत. १२ ऑक्टोबरला जेव्हा माझ्या वडिलांची हत्या झाली त्या दिवशी त्यांनी डायरीत एक शेवटचे नाव लिहले होते. हे नाव भाजप नेते मोहित कंबोज यांचे होते. यानंतर माझ्या वडिलांनी मोहित कंबोज यांच्यासोबत व्हॉटसअॅपवर चॅटिंगही केले होते. पण माझ्या वडिलांनी डायरीत मोहित कंबोज यांचे नाव का लिहले, हे मी सांगू शकत नाही. त्यामुळे या गोष्टीचा तपास होणे गरजेचे आहे, असे झिशान आपल्या जबाबात म्हणाले आहेत.
तसेच माझे वडील दोन दिवसांनी विधान परिषदेवर शपथ घेणार होते. पण त्याआधीच १२ ऑक्टोबरला त्यांची गोळी झाडून हत्या झाली. यानंतर १५ ऑक्टोबर २०२४ ला विधान परिषदेसाठी नामांकित केलेल्या नेत्यांनी शपथ घेतली, असे झिशान सिद्दीकी यांनी म्हटले आहे. दुसरीकडे बिश्नोई गँगने बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. मात्र, झिशान सिद्दीकी यांनी या प्रकरणात बिश्नोई गँग किंवा त्यांच्या कुठल्या सदस्याचे नाव घेतलेले नाही. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
दरम्यान, झिशान सिद्दीकी यांच्या वक्तव्यामुळे राजकीय विरोधक मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्याविरुद्ध आक्रमक होण्याची शक्यता आहे. कारण मोहित कंबोज यांची भाजपमधील बड्या नेत्यांशी जवळीक आहे. तसेच ते भाजपच्या वर्तुळातील एक प्रभावशाली व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे आता बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणात मोहित कंबोज यांचा उल्लेख आल्याने भाजपला (BJP) टीकेचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
मोहित कंबोज काय म्हणाले?
झिशान सिद्दीकी यांचे वक्तव्य तोडून वापरले जात असून माझे यात नाव नाही. झिशान सिद्दीकी यांच्य्याशी बाबा सिद्दीकींची हत्या झाली त्यादिवशी माझे बोलणे झाले होते. बाबा सिद्दीकी हे माझे चांगले मित्र होते. आम्ही गेल्या १५ वर्षांपासून एकमेकांना ओळखत होतो. ते एनडीए आघाडीचा भाग होते. आम्ही दोघे नेहमी एकमेकांशी बोलायचो, यामध्ये अनेकदा निवडणुकीचा विषयही होत असायचा. बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली तेव्हा मला मोठा धक्का बसला होता. त्यावेळी मी त्यांच्या कुटुंबीयांना धीर देण्यासाठी रुग्णालयात गेलो होतो. दुर्दैवाने आम्ही सगळ्यांनी बाबा सिद्दीकी यांच्यासारखा मित्र गमावला. याप्रकरणातील सत्य बाहेर येईल आणि योग्य तो न्याय होईल, असे त्यांनी म्हटले.