मुंबई | Mumbai
लोकसभेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्याच्या निषेधार्थ भाजपने देशभरात आक्रमक पवित्रा घेतला आहे. मात्र, मुंबईतील वरळी येथे आयोजित ‘जनआक्रोश मोर्चा’ दरम्यान एका वेगळ्याच घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मोर्चाच्या राड्यामुळे झालेल्या वाहतूक कोंडीत अडकलेल्या एका महिलेने थेट राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांची भररस्त्यात खरडपट्टी काढली. आता याच महिलेविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. वकील गुणरत्न सदावर्ते यांची कन्य झेन सदावर्ते हिने महिलेविरोधात तक्रार दाखल केली आहे.
लोकसभेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानंतर भाजपने सोमवारी वरळी येथे मोर्चाचे आयोजन केले होते. यावेळी मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. या कोंडीमुळे त्रस्त झालेल्या एका महिलेने मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर जात आपला संताप व्यक्त केला होता.
संबंधित महिला आपल्या मर्सिडीज कारमधून उतरली आणि तिने थेट गिरीश महाजन आणि उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना सुनावण्यास सुरुवात केली. “शट अप”, “डोन्ट टॉक टू मी”, “गेट आऊट” अशा शब्दांत तिने मोर्चेकरांना फटकारले. इतकेच नव्हे तर रागाच्या भरात तिने पाण्याची बाटलीही भिरकावल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी महाजन यांनी अत्यंत संयमाने परिस्थिती हाताळली आणि कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले.
झेन सदावर्तेंची पोलीस ठाण्यात तक्रार
या प्रकरणावर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत असतानाच, आता वकील गुणरत्न सदावर्ते यांची कन्या झेन सदावर्ते हिने या प्रकरणात उडी घेतली आहे. झेनने वरळी पोलीस ठाण्यात धाव घेत संबंधित महिलेविरोधात लेखी तक्रार दिली आहे. “महिलेने मोर्चेकरांशी असभ्य वर्तन केले आणि अपमानजनक शब्दांचा वापर केला, त्यामुळे तिच्यावर कारवाई व्हायला हवी,” अशी मागणी झेन सदावर्तेने केली आहे.
“सदर महिलेने गिरीश महाजन यांच्यासोबतही गैरवर्तन केले. महिलेचा नेमका अजेंडा काय होता? त्यामुळे महिलेने तीन पोलीस अधिकारी आणि लोकांचा अपमान केल्याप्रकरणी कलम, १३२, २२१, २५३ अंतर्गत गुन्हा दाखल करावी, अशी तक्रार दाखल केली आहे,” अशी माहिती झेन सदावर्तेने दिली.





