मुंबई/अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
राज्यात मागील काही वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. तीन वर्षापासून महापालिका आणि जिल्हा परिषदांचा कारभार प्रशासकांच्या हाती आहे. दरम्यान, या वर्षातच महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. याबाबत सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे. राज्यात ऑक्टोंबरपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका वेगवेगळ्या होणार आहेत. याबाबत निवडणूक आयोगाकडून लवकरच वेळापत्रक येऊ शकते.
नगर जिल्ह्यात तीन टप्प्यात निवडणूका ?
नगर जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि 14 पंचायत समित्यासोबतच 11 नगर 11 नगर पालिकांच्या निवडणूक झालेल्या नाहीत. जिल्हा परिषद- पंचायत समित्या आणि महानगर पालिका तसेच नगर पालिकांच्या निवडणूका स्वतंत्र झाल्यास जिल्ह्यात देखील तीन टप्प्यात निवडणूका होण्याची शक्यता निवडणूक विभागाच्या सुत्रांकडून वर्तवण्यात आली आहे. नगर शहरात महापालिका, त्यानंतर संगमनेर, कोपरगाव, राहाता, देवळाली प्रवरा, श्रीरामपूर, राहुरी, पाथर्डी, शेवगाव, श्रीगोंदा, जामखेड आणि शिर्डी या ठिकाणी स्वतंत्रपणे तीन टप्प्यात निवडणूका होण्याची शक्यता आहे. अकाले, पारनेर आणि कर्जत नगर पालिकांची मुदत 2027 मध्ये संपणार आहे.
झेडपी गट-गण प्रभाग रचनेची नगरला होणार तपासणी
शुक्रवारपासून तीन दिवसांचे वेळापत्रक || जिल्हा प्रशासन घेणार दक्षता
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
लवकर होवू घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या गट आणि गणाच्या निवडणुकीसाठी ग्रामविकास विभागाच्या आदेशानूसार प्रत्येक तालुक्यात प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याचे काम युध्द पातळीवर सुरू आहे. तयार करण्यात येणार्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या गट आणि गणांची शुक्रवारपासून नगरला तपासणी करण्यात येणार आहे. 27, 28 आणि 30 जून जिल्हाधिकारी कार्यालयात तालुकानिहाय या प्रारूप प्रभागाची रचना तपासून त्यानंतर त्यांची घोषणा करण्यात येणार आहे. यामुळे एका प्रकारे गट आणि गणाची प्रभाग रचना करतांना जिल्हा प्रशासन दक्षता घेतांना दिसत आहे.
दरम्यान, साधारण दिवाळीत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूका होण्याची शक्यता आहे. त्याद़ृष्टीने राज्य निवडणूक आयोग आणि ग्रामविकास विभागाच्यावतीने तयारी सुरू करण्यात आली आहे. यासाठी 10 जून रोजी राज्य निवडणूक आयोगाच्यावतीने आदेश काढण्यात आले. या आदेशानंतर तयार करण्यात प्रारूप प्रभाग रचनेबाबत ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी आदेश काढत निवडणुकीसाठी नव्याने गट आणि गणांची प्रभाग रचना करण्याचे आदेश काढले. दरम्यान, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी 14 जुलैला जिल्हाधिकारी प्रारुप प्रभाग जाहीर करणार आहेत. त्यानंतर 21 जुलैपर्यंत त्यावर हरकती व सूचना सादर करता येणार आहेत. त्यानंतर 28 जुलैपर्यंत प्राप्त हरकतीच्या आधारे अभिप्रायासह जिल्हाधिकारी यांच्याकडून त्यात्या विभागीय आयुक्तांना प्रस्ताव सादर करण्यात येणार आहेत. त्यानंतर 11 ऑगस्टपर्यंत प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर सुनावणी घेऊन निर्णय घेण्यात येणार असून 18 ऑगस्टपर्यंत अंतिम प्रभाग रचना मान्यतेसाठी राज्य निवडणूक आयोग किंवा प्राधिकृत केलेल्या अधिकार्याकडे सादर करण्यात येणार आहे.
दरम्यान, 2011 ची लोकसंख्यागृहीत धरून त्यानूसार जिल्ह्यात झेडपीसाठी 75 गट आणि पंचायत समितीसाठी 150 गण तयार करून त्यांची प्रभाग रचना करण्यात येणार आहे. यासाठी 39 लाख 51 हजार 214 ऐवढी लोकसंख्या गृहीत धरण्यात येणार आहे. यात अनुसूचित जाती 4 लाख 46 हजार 464 आणि अनुसूचित जमाती 3 लाख 57 हजार 453 लोकसंख्या निश्चित करण्यात आलेली आहे. या लोकसंख्यनेनूसार अकोले 6 गट (12), संगमनेर 9 गट (18), कोपरगाव 5 गट (10), राहाता 5 गट (10), श्रीरामपूर 4 गट (8), नेवासा 7 गट (14), शेवगाव 4 गट (8), पाथर्डी 5 गट (10), अहिल्यानगर 6 गट (12), राहुरी 5 गट (10), पारनेर 5 गट (10), श्रीगोंदा 6 गट (12), कर्जत गट 5 (10) आणि जामखेड 3 गट (6) या ठिकाणची प्रभाग रचना तयार करण्यात येणार आहे.
ही प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यापूर्वी जिल्हा प्रशासन ही तालुकानिहाय तपासून पाहणार आहे. यासाठी शुक्रवार 27 जून, शनिवार 28 जून आणि सोमवार 30 जून रोजी नगरला तालुकानिहाय तयार करण्यात आलेल्या प्रभाग रचना यांची तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.
मनपा, नगर पालिका प्रभाग रचनेसाठी सुधारित कार्यक्रम
सप्टेंबरमध्ये नगर पालिका तर ऑक्टोबरमध्ये मनपासाठी अंतिम प्रभाग रचना
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
नगरविकास विभागाने अहिल्यानगर महापालिका व जिल्ह्यातील रिक्त असलेल्या 11 नगर पालिका व एका नगरपंचायतीच्या प्रभाग रचनेचा सुधारीत कार्यक्रम सोमवारी जाहीर केला आहे. त्यानुसार निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतर 3 सप्टेंबरला महानगरपालिकेची, तर 18 ऑगस्टला नगरपालिकांची प्रारूप प्रभाग रचना प्रसिध्द करण्यात येणार आहे. त्यावर हरकती व सुनावणी होऊन 9 ते 13 ऑक्टोबर दरम्यान महानगरपालिकेची, तर 26 ते 30 सप्टेंबर दरम्यान नगरपालिकांची अंतिम प्रभाग रचना प्रसिध्द करण्यात येणार आहे.
शासनाने 12 जून रोजी प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यात बदल करण्यात आला आहे. त्यानुसार अहिल्यानगर महापालिका व जिल्ह्यातील रिक्त असलेल्या नेवासा नगरपंचायत, कोपरगाव, संगमनेर, श्रीरामपूर, राहता, शिर्डी, देवळाली प्रवरा, राहुरी, पाथर्डी, श्रीगोंदा, शेवगाव, जामखेड या नगरपालिका रिक्त आहेत. त्यांच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यात आता बदल करण्यात आला असून, शासनाने सुधारीत वेळापत्रक जाहीर केले आहे.
त्यानुसार महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना प्रसिध्द करणे – 3 सप्टेंबर, प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती – 8 सप्टेंबरपर्यंत, प्राप्त हरकतींवर सुनावणी – 9 ते 18 सप्टेंबर, अंतिम प्रभाग रचना प्रसिध्द करणे – 9 ते 13 ऑक्टोबर असा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. तर नगरपंचायत व नगरपालिकांची प्रारूप प्रभाग रचना प्रसिध्द करणे – 18 ऑगस्ट, प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती – 21 ऑगस्टपर्यंत, प्राप्त हरकतींवर सुनावणी – 22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर, अंतिम प्रभाग रचना प्रसिध्द करणे – 26 ते 30 सप्टेंबर असा कार्यक्रम असणार आहे. शासनाने मात्र अद्यापही प्रभागातील आरक्षण सोडतीबाबत निर्देश दिलेले नाहीत.





