Thursday, March 13, 2025
Homeनगरजिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणूक गाजणार!

जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणूक गाजणार!

तळेगाव, वडगावपान जिल्हा परिषद गट || सत्ताधारी-विरोधकांकडून मोर्चेबांधणी

तळेगाव दिघे |वार्ताहर| Talegav Dighe

गेल्या अडीच वर्षांपासून लांबणीवर पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अर्थातच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होण्याचे संकेत मिळू लागले आहेत. मात्र, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा शिवसेनेचे उमेदवार अमोल खताळ यांनी पराभव करून आमदारकी मिळविल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता गाजणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

- Advertisement -

संगमनेर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेचा पूर्वी तळेगाव नावाने असलेला जिल्हा परिषद गट मागील निवडणुकीत वडगावपान नावाने जिल्हा परिषद गट झाला. याच गटात संगमनेर पंचायत समितीचे तळेगाव व कोकणगाव दोन गण आहेत. तळेगाव-वडगावपान जिल्हा परिषद गटावर आत्तापर्यंत काँग्रेस पक्षाचे वर्चस्व राहिले आहेत. गतवेळच्या निवडणुकीनंतर माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे यांनी या गटाचे जिल्हा परिषदेत नेतृत्व केले. जिल्हा परिषद व पंचायत समितीचा कार्यकाळ संपल्यानंतर निवडणुकांसाठी नव्याने गट आणि गण रचना जाहीर करण्यात आली होती. त्याबरोबरच आरक्षणही जाहीर करण्यात आले होते. मात्र त्यास न्यायालयात आव्हान देण्यात आले आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका रखडल्या.

दरम्यान राज्यात सत्तांतर झाले आणि महाविकास आघाडीला पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतर राज्यात नव्याने महायुतीचे सरकार स्थापन झाले होते. निवडणुका लांबणीवर टाकण्यास त्यावेळी महायुतीस असणारे प्रतिकूल वातावरण कारणीभूत असल्याचे राजकीय वर्तुळातून बोलले जात होते. मात्र, आता राज्यात महायुतीला मोठे यश मिळाले असून राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. त्यादृष्टीने इच्छुक उमेदवार निवडणूक मोर्चेबांधणी करू लागले आहेत. तळेगाव-वडगावपान गटात पुन्हा निवडणूक गाजणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. काँग्रेस पक्ष अर्थातच महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांमध्ये पुन्हा सत्तेसाठी जोरदार रस्सीखेच होणार आहे. झालेली विधानसभा निवडणूक लक्षात घेता यावेळी तळेगाव-वडगावपान गटात काँग्रेस पक्षाची पिछेहाट झाली.

त्यामुळे या गटात काँग्रेसला आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक सोपी नाही. यापूर्वी तळेगाव व कोकणगाव पंचायत समिती गणातून शिवसेनेचे उमेदवार विजयी झालेले आहेत. हीच पार्श्वभूमी लक्षात घेता आता पुन्हा या भागातील निळवंडे आणि भोजापूरचा पाणीप्रश्न आणि त्याबरोबरच स्थानिक विकासाचे मुद्दे निवडणुकीच्या अग्रस्थानी असतील. त्यातच भाजपाचे नेते, माजी मंत्री, आमदार राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीपासून संगमनेर तालुक्यात विशेष लक्ष घातले आहे. मात्र, विधानसना निवडणुकीत गाफील असलेले काँग्रेस नेते आणि दुसर्‍या -तिसर्‍या फळीतील काँग्रेस पदाधिकारी सावध झाले आहेत. मात्र, आता विद्यमान आमदार अमोल खताळ हे काँग्रेस नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि त्यांच्या यंत्रणेच्या विरोधात संघर्षात उतरलेले असल्याने होणारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक गाजणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

राजकीय संघर्षाची चिन्हे…
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मोठे राजकीय धु्रवीकरण झाले. अमोल खताळ आमदार झाल्याने काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या विरोधकांना राजकीय बळ मिळाले. त्यातच आता संघर्षासाठी माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची यंत्रणा पाठिशी असल्याने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राजकीय संघर्ष पाहावयास मिळणार असून काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा राजकीय अस्तित्वासाठी कस लागणार आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...