अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्हा परिषद प्रशासनाने लागू केलेल्या क्यूआर कोडच्या निर्णयावर चर्चा करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने बुधवारी बोलावलेल्या बैठकीवर अखेर शिक्षक संघटनांनी बहिष्कार टाकला. त्यामुळे इतर संघटनांना बरोबर घेत प्रशासनाने ही बैठक उरकली. दरम्यान, या बैठकीला प्राथमिक शिक्षक वगळता अन्य संवर्गाचे कर्मचारी हजर होते. यावेळी या कर्मचार्यांनी आपल्या विविध मागण्या प्रशासनासमोर मांडत त्या तातडीने सोडवण्याची मागणी केली. प्रशासनाने देखील कर्मचार्यांच्या या मागण्या ऐकून घेत त्या महिनाभरात सोडवण्याचे आश्वासन दिले. बैठकीत शिक्षक वगळता हजर अन्य कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी क्यूआर कोडला जवळपास मान्यता दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून जिल्हा परिषद कर्मचारी तसेच प्राथमिक शिक्षकांच्या हजेरीसाठी क्यूआर कोड लागू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र शिक्षक संघटनांचा या क्यूआर कोड प्रणालीला कडाडून विरोध आहे. या प्रश्नावरून काही महिन्यांपूर्वी शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. मात्र त्यापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर आणि शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी यांच्यात बैठक होऊन तात्पुरता तोडगा निघाला होता. मात्र आता पुन्हा जिल्हा परिषद प्रशासनाने क्यूआर कोड लागू करण्याचा निर्णय घेतल्याने याविरोधात शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर बुधवारी जिल्हा परिषद प्रशासनाने प्राथमिक शिक्षकांसह जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचारी संघटनांची बैठक बोलावली होती. या बैठकीला शिक्षक वगळता अन्य कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी हजर होते. यावेळी लिपिक वर्ग संघटना, आरोग्य सहाय्य पुरूष व महिला पशुधन पर्यवेक्षक, परिचर शाखा अभियंता यासह ग्रामसेवक संघटनांचे प्रतिनिधी हजर होते. ही बैठक सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके यांच्या उपस्थितीत पार पडली. बैठकीला जिल्हा परिषदेच्या सर्व विभागाचे खाते प्रमुख उपस्थित होते. बैठकीत जिल्हा परिषद कर्मचार्यांना लवकरात लवकर पदोन्नती देण्यात यावी, आश्वासित पदोन्नती योजनेचा लाभ कर्मचार्यांना देण्यात येऊन त्यानुसार सुधारित वेतन मिळावे, शिक्षकांच्या धर्तीवर प्रत्येक विभागातील कर्मचार्यांना त्यांच्या कामानुसार आदर्श कर्मचारी पुरस्कार देण्यात यावा, जिल्हा परिषद कर्मचार्यांची क्रीडा स्पर्धा घेण्यात यावी, तसेच आस्थापनाविषयक बाबी पूर्ण करत नियमानुसार पदोन्नती देण्यात यावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेळके यांनी जिल्हा परिषद पातळीवर असणार्या बाबी आणि विषय महिनाभरात पूर्ण करत कर्मचार्यांच्या मागणीवर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. या बैठकीला प्राथमिक शिक्षक गैरहजर असल्याने त्यांचा प्रमुख विषय असणार्या क्यूआर कोडवर निर्णय होऊ शकला नाही. मात्र बैठकीत शिक्षक वगळता अन्य कर्मचार्यांनी क्यूआर कोडला संमती दिल्याची माहिती माहिती सूत्रांनी दिली. बैठकीला जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे अभय गट, विकास साळुंखे, मनोज चोभे, रजनी जाधव, कल्पना शिंदे, वैशाली कासार, ग्रामसेवक संघटनेचे युवराज पाटील, परिचय संघटनेचे निलेश गाडेकर, सागर आगरकर, लिपिकवर्गीय संघटनेचे कल्याण मुटकुळे, आरोग्य कर्मचारी संघटनेचे योगेंद्र पालवे यासह अन्य कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.