Thursday, May 2, 2024
Homeनगरसमानीकरणाला फाटा यंदा झेडपीच्या बदल्यांचा शुभारंभ

समानीकरणाला फाटा यंदा झेडपीच्या बदल्यांचा शुभारंभ

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

दरवर्षीच्या समानीकरणाच्या नियमाला छेद देत कालपासून जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्यांना सुरूवात झाली आहे. पहिल्या दिवशी पदाधिकारी आणि अधिकारी यांच्या उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे सामान्य प्रशासन विभागातील 40 कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात 22 प्रशासकीय आणि 18 आपसी बदल्यांचा समावेश आहे.

- Advertisement -

दरम्यान, आज ग्रामपंचायत विभागांतर्गत विस्तार अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक यांच्या तर दुपारच्या सत्रात महिला बालकल्याण विभागातील विस्तार अधिकारी, पर्यवेक्षिका, शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुखांच्या बदल्या होणार आहेत.

करोनाच्या संकटामुळे रखडलेल्या जिल्हा परिषदेतील सर्वसाधारण बदल्यांची प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने कालपासून सुरू करण्यात आली आहे.

ग्रामविकास विभागाच्या निर्देशानुसार करोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी यंदा बदलीपात्र कर्मचार्‍यांना मुख्यालयात न बोलवता तालुकास्तरावर गटविकास अधिकार्‍यांच्या अखत्यारित एकत्र करून बदली प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मंगळवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्रीताई घुले पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके, सभापती सुनील गडाख, मिरा शेटे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, निखिलकुमार ओसवाल, संजय कदम, डॉ. संदीप सांगळे आदी उपस्थित होते.

दरवर्षी होणार्‍या समानिकरणाच्या नियमाला यंदा जिल्हा परिषद प्रशासनाने छेद दिला आहे. कर्मचार्‍यांच्या बदल्यांमध्ये समानिकरण न झाल्याने अनेक तालुक्यात पडणारे रिक्त जागांचे खड्डे तसेच राहणार असून यात कर्मचार्‍यांची सोय होणार असली तरी प्रशासनाची गैरसोय होणार आहे. जिल्हा परिषदेच्या सभागृहात झालेल्या या व्हिडिओ कॉन्फरन्स बदल्यांसाठी नगर तालुक्यातील कर्मचारी बोलविण्यात आले होते.

सामान्य प्रशासन विभागातील कर्मचार्‍यांच्या बदल्यांमध्ये 22 प्रशासकीय आणि 18 आपसी बदल्या करण्यात आल्या आहेत. आपसी बदल्यांना टक्केवारीची अट नसल्याने त्या कितीही केल्या तरी त्याचा प्रशासनाच्या कामावर परिणाम होत नाही. मात्र, समानिकरणाच्या बदल्या न केल्याने अनेक कर्मचार्‍यांची गैरसोय होणार आहेे. तसेच त्याचा परिणाम तालुका पातळीवरील कामकाजावर होणार आहे.

सामान्य प्रशासनाच्या बदल्या

कक्ष अधिकारी 2 प्रशासकीय आणि 2 आपसी, कार्यालयीन अधीक्षक 4, वरिष्ठ सहाय्यक 2 आपसी, कनिष्ठ सहाय्यक 10 प्रशासकीय आणि 16 आपसी अशाप्रकारे 22 प्रशासकीय आणि 18 आपसी एकूण 40 कर्मचार्‍यांच्या सामान्य प्रशासन विभागात बदल्या करण्यात आल्या आहेत.

दरवर्षी प्रमाणे कर्मचार्‍यांची गैरसोय झाल्यास अथवा प्रशासनाने एखाद्याची गैरपध्दतीने सोय केल्यास त्या विरोधात तक्रारी सोबत झालेल्या बदल्यांच्या निर्णयाविरोधात अपील होत असतात. या अपिलावर समानधान न झाल्यास त्या विरोधात नाशिकपर्यंत पाठपुरावा सुरू असतो. यंदा देखील ही परंपरा कायम राहणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या