सार्वमत
संगमनेर (प्रतिनिधी) – देशभरासह राज्यांमध्ये वाढत चालला कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सर्वत्तोपरी रोखणे हेच राज्य सरकारचे प्राधान्य असून सर्वसामान्य जनतेच्या मदतीसाठी सरकार काम करत असल्याचे प्रतिपादन व दिलासा राज्याचे महसूलमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नामदार बाळासाहेब थोरात यांनी जनतेला दिला आहे.
मुंबईमध्ये एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना नामदार थोरात म्हणाले की, कोरोनाचे संकट जगासह देशावर आणि महाराष्ट्रावर आले आहे. संपूर्ण देश या राष्ट्रीय आपत्तीचा मुकाबला करतो आहे. राज्य सरकारने प्रत्येक नागरिकांचे संरक्षण करणे त्याचे कोरोनापासून रक्षण करणे याला प्राधान्य दिले आहे. यासाठी शासनाच्या विविध विभागातील कर्मचारी पूर्णपणे सतर्कतने काम करत आहे.
अनेक सेवाभावी संस्थांनी ही पुढाकार घेत राज्य सरकारला मदत केली आहे. अशा संकटाच्या काळात सरकार हे शेतकर्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. एका बाजूला कोरोनाचे संकट तर दुसर्या बाजूला शेतकर्यांसाठी केळी, द्राक्ष, आंबा हे उत्पादन बाजारात पाठविण्याचे संकट त्यामुळे राज्य सरकारने अत्यावश्यक सेवांमध्ये कृषी उत्पादनाचा समावेश केला असून याबाबदची दुकाने ही आता 24 तास सुरु राहणार आहे. राज्यात अवकाळी पावसाचे संकट शेतकर्यांपुढे उभे ठाकले आहे. मात्र शेतकर्यांनी व नागरिकांनी अशा काळात सरकारला सहकार्य करावे. कोरोना रोखणे हे आपले प्राधान्य आहे.
शहरांमध्ये आणि ग्रामीण भागांमध्ये पोलिस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, महसूल यंत्रणा व शासनाच्या विविध विभागातील कर्मचारी अतिशय सक्षमपणे काम करत असून कोणी आजारी असेल तर त्याची माहिती घेवून अत्यंत तातडीने त्यावर उपाययोजना केल्या जात आहे. तरी नागरिकांनी घराबाहेर पडू नये स्वत:चे रक्षण हेच कुटुंबाचे रक्षण ठरणार आहे. राज्यामध्ये पहिला रुग्ण 6 मार्च 2020 आढळला, 10 मार्चला राज्य सरकारने सर्व यंत्रणा सतर्क केली आणि 14 मार्चला अधिवेशन पूर्ण करून सर्व लक्ष रोखण्यासाठीच काम केले आहे. मुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांसह सर्व मंत्री व शासकीय यंत्रणा अत्यंत कार्यक्षम पणे काम करत आहे. कोरोनाच्या या लढाईत नागरिकांनी घरीच थांबवून सरकारला मदत करुन आपल्या कुटुंबीयांचे व स्व:ताचे ही रक्षण करावे असे आवाहन ही त्यांनी केले.




