अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
पारनेर शहरातील वैदुवस्ती परिसरात एलसीबी शनिवारी केलेल्या कारवाईत 2 लाख 58 हजार 100 रुपयांचा प्रतिबंधित मावा, सुगंधी तंबाखू, सुपारी आणि मावा तयार करण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी पूर्वसूचना देऊनही अन्न व औषध प्रशासनाचा एकही अधिकारी घटनास्थळी उपस्थित राहिला नसल्याचे समोर आले आहे.
जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई करण्याच्या पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने शनिवारी पारनेरमध्ये छापा टाकला. राजू शिंदे (वय 55) आणि मच्छिंद्र शिंदे (वय 40, दोघेही रा. वैदुवस्ती, पारनेर) यांच्या घरावर छापा टाकून मशीनच्या साहाय्याने तयार करण्यात येणारा मावा, सुगंधी तंबाखू, सुपारी, इलेक्ट्रिक मशीन व प्लास्टिक पाऊच असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या कारवाईत प्रतिबंधित अन्नपदार्थांवरील कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासनाला पूर्वकल्पना देण्यात आली होती. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यापूर्वी स्पष्ट निर्देश दिले आहेत की, पोलीस विभाग अशा कारवाया करत असेल आणि प्रशासनाला माहिती दिली असेल, तर संबंधित अधिकारी पोलिसांसोबत उपस्थित राहणे बंधनकारक आहे. मात्र, या आदेशाकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले.
चार्ज बदलल्यामागे नेमके कारण काय?
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यापूर्वी पारनेर तालुक्याचा कार्यभार सांभाळणार्या अन्न सुरक्षा अधिकार्याकडून हा चार्ज अलीकडेच काढून घेण्यात आला. विशेष म्हणजे संबंधित अधिकारी शनिवारी मुख्यालयात उपस्थित होते, तरीही त्यांना पोलिसांसोबत कारवाईसाठी पाठविण्यात आले नाही. त्यामुळे हा निर्णय नेमका कोणत्या कारणासाठी घेण्यात आला, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.
वेगळे स्पष्टीकरण; फिर्यादीत वेगळाच उल्लेख
याबाबत सहाय्यक आयुक्त सोपान इंगळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, इतर ठिकाणी कारवाई सुरू होती. पारनेर तालुक्याचा चार्ज कोणाकडेही दिलेला नाही. त्या तालुक्यासाठी नियुक्त अधिकारी अद्याप रुजू झालेले नाहीत, असे स्पष्टीकरण दिले. मात्र, पोलिसांनी दाखल केलेल्या फिर्यादीत याच्या उलट उल्लेख करण्यात आला आहे. एलसीबीच्या अधिकार्यांनी इंगळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पारनेरचा चार्ज माझ्याकडे आहे. मी दुसर्या कामात व्यस्त आहे. तुम्ही कारवाई करून घ्या, असे सांगितल्याचा उल्लेख फिर्यादीत करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.




