Sunday, July 5, 2026
HomeनगरAhilyanagar : शिक्षकांचा ‘रजिस्टर’ चा भार हलका

Ahilyanagar : शिक्षकांचा ‘रजिस्टर’ चा भार हलका

लाभार्थी आणि शालेय पोषण आहारातील तांदळाची माहिती आता ऑनलाईन!

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण (पीएम पोषण) योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र शाळांमधील तांदूळ व धान्यादी मालाचा खर्च, शिल्लक साठा आणि दैनंदिन लाभार्थी विद्यार्थ्यांची नोंद आता ऑनलाईन केली जाणार आहे. प्राथमिक शिक्षण संचालकांच्या या नव्या आदेशामुळे शिक्षकांना आता शाळांमध्ये स्वतंत्रपणे जुनी नोंदवही (रजिस्टर) ठेवण्याची आवश्यकता भासणार नाही. पोषण आहार योजनेतील शिक्षकांचा अशैक्षणिक भार कमी करण्यासाठी हा महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे.

- Advertisement -

अहिल्यानगर जिल्ह्यातील 4 हजार 537 शाळांमधील 4 लाख 46 हजार 788 विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत असून, आता या सर्व शाळा आणि विद्यार्थ्यांची माहिती ऑनलाईन पोर्टलवर उपलब्ध होणार आहे. राज्यातील सर्व पात्र शाळांना शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील पोषण आहार वितरणाचा शेवटचा दिवस किंवा 30 एप्रिल 2026 अखेर उपलब्ध असलेला तांदूळ व इतर धान्यादी मालाचा शिल्लक साठा एमडीएम पोर्टलवरील ओपनिंग बॅलन्स (सुरुवातीची शिल्लक) या टॅबमध्ये नोंदविणे बंधनकारक करण्यात आले आहे.

ही नोंद इयत्ता 1 ली ते 5 वी आणि इयत्ता 6 वी ते 8 वी अशा स्वतंत्र गटांत किलोग्रामममध्ये करावी लागेल. शाळांनी ही माहिती भरल्यानंतर तिची खात्री करून ती अंतिम करायची आहे. त्यानंतर जिल्हास्तरावर निश्चित केलेल्या मेनू (पाककृती) नुसार विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या दैनंदिन आहाराची आणि लाभार्थी विद्यार्थ्यांची संख्या एमडीएम पोर्टल, मोबाईल अ‍ॅप किंवा एसएमएसद्वारे नियमितपणे नोंदवावी लागणार आहे.

दरमहा मिळणार पीडीएफ अहवाल
या योजनेअंतर्गत शाळांना तांदूळ व इतर धान्याची प्राप्ती, खर्च आणि शिल्लक साठ्याची माहिती वेळेत ऑनलाईन भरावी लागेल. प्रत्येक महिनाअखेरीस या खर्च व शिल्लक साठ्याचा एकत्रित पीडीएफ अहवाल शिक्षकांना पोर्टलवर उपलब्ध होणार आहे. हा अहवाल डाऊनलोड करून जतन केल्यास स्वतंत्र नोंदवही ठेवण्याची गरज उरणार नाही. शिक्षकांना मोबाईल अ‍ॅपमध्ये जिल्हानिहाय मेनू दिसत नसल्यास त्यांनी जुने अ‍ॅप काढून नवीन अ‍ॅप इन्स्टॉल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच गटशिक्षणाधिकारी, पीएम पोषण अधीक्षक आणि शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी या ऑनलाईन नोंदींची पडताळणी करावी, तांत्रिक अडचणींचे निराकरण करावे व नियमित देखरेख ठेवावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. शाळांच्या मार्गदर्शनासाठी प्रारंभिक शिल्लक, आवक माल, मोबाईल अ‍ॅप आणि दैनंदिन उपस्थिती याबाबतच्या चार माहिती पुस्तिका उपलब्ध करून दिल्या असल्याचे पत्र शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी सर्व गटविकास अधिकार्‍यांना पाठवले आहेत.

साडे चार हजार शाळांचे ‘पोषण’
नगर जिल्ह्यातील 4 हजार 537 शाळांची प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण (पीएम पोषण) योजनेअंतर्गत निवड करण्यात आलेली आहे. या शाळामधील 2 लाख 71 हजार 97 पहिले ते पाचवी आणि सहावी ते आठवीच्या 1 लाख 75 हजार 691 विद्यार्थ्यांना पोषण आहार योजनेत लाभ देण्यात येत आहे. या सर्व शाळा आणि त्या ठिकाणी असणार्‍या लाभार्थी विद्यार्थ्यांची माहिती शिक्षकांना आता ऑनलाईन भरावी लागणार आहे.

ताज्या बातम्या

Crime News : लग्नाचे खोटे आमिष दाखवून नर्सची 13 लाखांची फसवणूक

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi लग्नाचे खोटे आमिष दाखवून एका 33 वर्षीय खाजगी नर्सची तब्बल 13 लाख रुपये आणि तीन तोळे सोन्याने फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर...