Saturday, July 4, 2026
Homeनगरखारेकर्जूने येथे आतापर्यंत 29 जण क्वारंटाईन

खारेकर्जूने येथे आतापर्यंत 29 जण क्वारंटाईन

सार्वमत

अहमदनगर (प्रतिनिधी) – करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन कालावधीत नगर तालुक्यातील खारेकर्जूने येथे आतापर्यंत बाहेरून गावात आलेल्या 29 व्यक्तींना जि.प.व माध्यमिक शाळेच्या इमारतीत क्वारंटाईन करण्यात आले. त्यापैकी 21 जणांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. सरपंच उषाताई पानसंबळ, ग्रामसेवक पी.व्ही. भोर, तलाठी श्रीमती शुभांगी जाधव क्वारंटाईन करण्यात आलेल्या नागरिकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून काळजी घेत आहेत. यासाठी त्यांना सर्व ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थ सहकार्य करित आहेत.

- Advertisement -

मात्र येथे आलेल्या नागरिकांच्या नाष्टा आणि जेवणाचा प्रश्न कायम आहे. यासाठी कोणत्याही प्रकारचा निधी नसल्याने सद्यस्थितीत ग्रामदक्षता समितीला याबाबतची व्यवस्था करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे. अनेकदा ग्राम दक्षता समिती स्वखर्चातून नागरिकांना नाष्टा आणि जेवण पुरवत आहे. तर काही नागरिकांना गावातील त्यांचे कुटुंबिय जेवण पुरवित आहेत.
दरम्यान करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हयाबाहेरून येणार्‍या नागरिकांना क्वारंटाईन करण्याच्या उद्देशाने गावागावातील शाळा इमारती प्रशासनाने ताब्यात घेतल्या आहेत.

सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांची जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने ग्रामदक्षता समिती स्थापन करण्यात आली आहे. ग्राम दक्षता समितीस आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका, मदतनिस, आशा सेविका, प्राथमिक शिक्षक व ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामपंचायत सदस्य आदींची मदत होत असून आरोग्य सेवक रोज क्वारंटाईन असलेल्या लोकांची आरोग्य तपासणी करत आहेत. तसेच शाळेतील शिक्षकांना व्यवस्थापकाची भूमिका निभावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. समित्यांनी आपल्या गावातील शाळा तयार ठेवल्या आहेत. मात्र येथील क्वारंटाईन व्यक्तींच्या नाष्टा व जेवणाच्या व्यवस्थेबाबत स्पष्ट मार्गदर्शन देण्यात आलेले नाही. त्यामुळे ग्रामदक्षता समितीला अडचणींचा सामना करावा लागत आहे.

 करोनाविषयी गांभीर्य अजूनही काही लोकांना नाही. गावात बाहेरुन येणार्‍या व्यक्तींना क्वारंटाईन करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा व्यक्तींनी स्वत:हून प्रशासनास माहिती देणे आवश्यक आहे मात्र असे होताना दिसत नाही. काही व्यक्ती तर मनमानी करत क्वारंटाईन होण्यास नकार देत ग्रामदक्षता समितीला दमदाटी करत आहेत. त्यामुळे पोलीसांची मदत घ्यावी लागत आहे. -उषाताई पानसंबळ, सरपंच. 

ताज्या बातम्या

सुरगाणा तालुक्यात मुसळधार पाऊस; वाहतुकीची कोंडी

0
सुरगाणा | प्रतिनिधी Surgana एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून यावर्षी प्रथमच नार, पार, तान, मान, अंबिका, गिरणा, कादवा या नद्यांना पुर...