सुरगाणा | प्रतिनिधी Surgana
एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून यावर्षी प्रथमच नार, पार, तान, मान, अंबिका, गिरणा, कादवा या नद्यांना पुर आला असून दुथडी भरून वाहत आहेत. यामुळे पावसा अभावी एक महिन्यापासून भात पिकांच्या रखडलेल्या पेरण्यांना वेग येणार आहे.या पावसामुळे गुजरात राज्यास जोडणारा नाशिक- सापुतारा महामार्गावर रस्तेकामासाठी खोदून ठेवलेल्या खड्डय़ामुळे वाहतूक कोंडीचे चित्र पाहायला मिळाले आहे.
नागझरी फाट्याजवळ रस्त्याची फरशी सुमारे तीन ते चार महिन्यापासून खोदून ठेवल्याने पर्यायी कच्चा रस्ता काढून दिला होता मात्र पावसामुळे रस्ता व तात्पुरता पूलही वाहून गेल्याने पाच ते सात तास संपूर्ण रस्ता बंद झाला होता.त्यामुळे प्रवासांचे खुप हाल झाले. रस्त्यातच मोठमोठी वाहने अडकून पडली होती.त्यामुळे प्रवासी,शेतकरी, शाळकरी मुले,रुग्णवाहिका अडकून पडल्या होत्या.याच महामार्गावरील घागबरी, हिरीडपाडा,चिखली गावाजवळ रस्त्यावर वाहने खड्डयात अडकून पडत आहेत.रस्त्यावर गाळ, माती, चिखल पसरल्याने वाहनांचे अपघात होत आहेत.चारचाकी वाहने सरकून बाजूला जात आहेत. पर्यायी रस्ता तात्काळ उपलब्ध करण्यात यावा अशी मागणी केली जाते आहे.
9 जून 2026 रोजी सुरगाणा तालुका मार्क्सवादी काम्युनिस्ट पक्षाने, माजी जिल्हा परिषद सदस्य कॉ जनार्दन भोये, आजी माजी सरपंच, चालक मालक संघटना पदाधिकारी आणि बोरगावं घाटमाथ्यावरील हजारो शेतकऱ्यांनी पावसाळ्याचा धोका ओळखून बोरगावं येथे रास्ता रोको करण्याचे निवेदन दिले होते,यावेळी सबंधित अधिकारी यांनी रास्ता रोको थांबवा आम्हीं अडचणी सोडवू असे आश्वासन देण्यात आले होते. यासाठी शेतकऱ्यांना ८ जून रोजी चर्चेकरिता तहसील कार्यालयात बोलावण्यात आले होते. या दरम्यान सर्व पक्षाचे पदाधिकारी, शेतकरी यांना आश्वासन दिले की, खाते, बी बियाणे, तसेच पावसाळ्यात रस्त्याची अडचण होणार नाही, रस्त्याचा प्रश्न आम्हीं त्वरित सोडवू,एका आठवड्यात पर्यायी डांबरी रस्ते बनवू पावसात वाहतुकीस अडथळा येणारे नाही असे आश्वासन देण्यात आले होते. अधिकाऱ्यांनी व प्रशासनाने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला.
तालुक्यात जनतेची सेवा करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना गोर गरीब जनतेचे,शेतकऱ्यांचे काहीही पडलेले नाही.जनतेच्या प्रश्नांची आणि दैनंदीन अडचणीचे काळजी नाही. सकाळपासून सबंध शेतकरी, प्रवासी आणि परिसरातील नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.येत्या काही तासात तात्काळ वाहतूक सुरळीत करावी,प्रशासनाने पर्यायी रस्ता तयार करुन दयावा अन्यथा संतप्त शेतकरी नागरिक कायदा हातात घेतील आणि प्रसासनाला सळो किं पळो करतील असा इशारा माकपचे माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन भोये यांनी दिला आहे.




