Friday, July 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजदुर्दैवी : घराचा स्लॅब कोसळला; आजीसह नातवाचा मृत्यू

दुर्दैवी : घराचा स्लॅब कोसळला; आजीसह नातवाचा मृत्यू

मालेगाव | प्रतिनिधी Malegaon

- Advertisement -

शहरात आज सकाळपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कलेक्टर पट्टा भागातील घराचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत आजीसह नातवाचा जागीच मृत्यू झाला. दुपारी तीन वाजेच्या दरम्यान झालेल्या या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

विमलबाई पंढरीनाथ येवले (८०) व चेतन रामचंद्र येवले (२०) ही त्या मृत आजी – नातवाची नावे आहेत. कलेक्टर पट्टा भागातील महारूद्र हनुमान मंदिराजवळ राजेंद्र येवले हे कुटुंबियांसह वास्तव्यास आहेत. दिवसभर पावसाची संततधार सुरू असल्याने येवले हे काही कामानिमित्त जिन्याने घराच्या गच्चीवर जात असतांनाच या घराचा संपूर्ण स्लॅब अचानक कोसळला.

यावेळी घरात येवले यांची पत्नी, मुलगी, आई विमलबाई, मुलगा चेतन हे होते. स्लॅब अचानक पडल्याने परिसरात मोठा आवाज झाला. या आवाजाने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. याच दरम्यान नागरिकांनी महानगरपालिका अग्नीशमन दलाला कळविले. अग्निशमन अधिक्षक संजय पवार यांनी आपल्या सहकार्यासह तातडीने तेथे धाव घेत मदतकार्य सुरू केले.

मात्र या दरम्यान अवजड स्लॅबखाली दबल्याने विमलबाई व चेतन गंभीर जखमी झाले. त्यांना नागरिकांनी रूग्णालयात दाखल केले.मात्र त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. अग्निशमन दलाचे जवान व स्थानिक रहिवाशांनी तत्परता दाखवित मदतकार्य सुरू केल्याने घरातील अन्य तिघांचे प्राण वाचले. याघटनेचे वृत्त कळताच छावणी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सानप यांनी तेथे धाव घेतली. भरपावसातही या घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

दरम्यान मनपा भाजपा गटनेते मदन गायकवाड, नगरसेवक विनोद वाघ व अन्य कार्यकर्त्यांनी मदतकार्यात सहकार्य केले. या घटनेची माहिती उपविभागीय अधिकारी नितिन सदगीर यांना देण्यात आली असून त्यांनी घटनेचा पंचनामा करण्याची सूचना आपल्या अधिकार्‍यांना दिली. या आपदग्रसत कुटुंबियांना तातडीने शासकिय मदत देण्यात यावी अशी मागणी नगरसेवक गायकवाड व वाघ यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

सुरगाणा तालुक्यात मुसळधार पाऊस; वाहतुकीची कोंडी

0
सुरगाणा | प्रतिनिधी Surgana एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून यावर्षी प्रथमच नार, पार, तान, मान, अंबिका, गिरणा, कादवा या नद्यांना पुर...