Sunday, November 1, 2026
Homeब्रेकिंग न्यूजराज-का-रण : अन्नदानाच्या आनंदाचेही अपहरण?

राज-का-रण : अन्नदानाच्या आनंदाचेही अपहरण?

नाशिक | शैलेंद्र तनपुरे – दै. ‘देशदूत’ – संपादक

- Advertisement -

साधू संत येती घरा तोचि दिवाळी दसरा, असे संत तुकाराम महाराजांनी सांगितले असले तरी गेल्या काही महिन्यांपासून नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारी निमित्ताने जो कोणी येत आहे, त्यांच्यामुळेही नाशिककरांना सणासुदीचाच आनंद वाटतो, असे तर्कट महायुतीचे काही कार्यकर्ते मांडत असतात. सिंहस्थाच्या तयारीसाठी म्हणून जे काही पस्तीस हजार कोटींचे विकासपर्व सुरू आहे, त्याच्या अंमलबजावणीमुळे नाशिककर मेटाकुटीस आलेले आहेत, हे अशांच्या गावीही नाही. किंबहुना, भविष्यात नाशिक ही नगरी जणू कुबेरनगरी बनणार असल्याने हे हाल सोसायलाच हवे, असा सल्ला ही मंडळी देत असतात. भाजप नेते अर्थातच त्याला अनुमोदन देत असतातच.

नाशिककरांची नाराजी फारच वाढल्यानंतर साक्षात कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी दिलगिरी व्यक्त करून टाकली. काही दिवस कळ सोसा; नंतर पाहा, नाशिक कसे दिमाखदार दिसेल, असा साधारण या सगळ्यांचाच दावा आहे. आता तर काय ध्वजारोहणामुळे साक्षात देशाच्या प्रथम नागरिक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येऊन गेल्या असल्याने सिंहस्थाची अधिकृत सुरुवातही झाली आहे. खरे साधू-संत येऊ लागले आहेत. राजकारणातील तथाकथित साधू-संतही गेल्या काही महिन्यांपासून वारंवार ये-जा करीत असल्याने नाशिककर या प्रेमवर्षावाने धन्य झाले आहेत. अशातच, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही नुकतीच नाशिक-त्र्यंबकेश्वर अशी परिक्रमा केली. त्र्यंबकनगरीत साधू-संत संमेलनात त्यांनी सिंहस्थातील तमाम साधू-संतांच्या सर्वच आखाड्यांची भोजन व्यवस्था शिवसेना करणार, अशी घोषणा करून टाकली. ही व्यवस्था मंत्री दादा भुसे करतील, हे सांगायलाही ते विसरले नाहीत. त्यावर दादा भुसेंची प्रतिक्रिया काय झाली हे काही कळले नाही.

परंतु शिंदेंच्या या घोषणेमुळे आखाड्यांचे साधूही क्षणभर अवाक् झाले. सिंहस्थात जे आखाडे येतात, त्यांचा मेळा संपेपर्यंत अन्नदानाचा भंडारा सुरू असतो. लक्षावधी लोक या भंडार्‍यातील प्रसादाचा लाभ घेत असतात. या भंडार्‍यासाठी आपलाही खारीचा वाटा असावा म्हणून अनेक दानशूर धनधान्यादी वस्तूंंची मदत करीत असतात. अनेक जण तर ही मदत करताना आपला उल्लेखही नको, असे सांगून दानाची महती जपताना आढळतात. त्यामुळेच एकप्रकारे हा भंडारा म्हणजे संबंधित आखाड्यांची अन्नसेवाच असते. त्यातून अन्नदानाचे जे पुण्य मिळते, त्यामध्ये त्यांना खरा आनंद असतो. आता आधुनिक काळातील कुबेराची भूमिका बजावणारे एकनाथ शिंदे यांनी हा त्यांचा आनंदही हिरावून घेण्याचा प्रयत्न केला आहे, असे त्यापैकी काहींना वाटत असावे. शिंदेंसारखा उदार राजकारणी अलीकडच्या काळात कोणी पाहिला वा अनुभवला नाही. कोणालाच कशालाही नाही म्हणायचे नाही, हा त्यांचा स्वभाव असल्याने त्यांच्याभोवती नेते-कार्यकर्त्यांचा गोतावळा सातत्याने वाढत असतो.

आता साधू-संतांनाही आपलेसे करण्याच्या नादात त्यांनी अन्नदानाचे त्यांचे मुख्य कार्यच काढून घेऊन त्यांनाच अन्नदान करण्याचे पुण्य कमावण्याचा प्रयत्न तर चालविलेला नाही ना, अशी शंका काहींना आली आहे. नाशिक दौर्‍यात त्यांनी इतरही अनेक घोषणा केल्या. त्यातील कितपत वास्तवात उतरतात ते बघायचे. याच दौर्‍यात गंगापूर रस्त्याला समांतर अशा पर्यायी महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा शुभारंभही त्यांच्या हस्ते झाला. या रस्त्यासाठी ६५ कोटींच्या निधीस प्रशासकीय मंजुरी दिली गेली आहे. त्याबद्दल कृतज्ञता म्हणून ऋणनिर्देश ठीक; पण या कामाचे श्रेय घेण्यातही लोकप्रतिनिधींनी केलेली स्पर्धा शिसारी आणणारी ठरली. काहींनी या कामाचे श्रेय पालकमंत्री यांना देऊन त्यांना मनापासून धन्यवाद देत असल्याचे फलक शहरभर लावले. एकीकडे उच्च न्यायालय फलकांमुळे शहर विद्रुपीकरण होते म्हणून अशा फलकांवर बंदी घालते आणि शासनाचेच प्रतिनिधी मात्र अशा बंदी धुडकावून येनकेन प्रकारे फलकांचीही स्पर्धा करतात, ही पराकोटीची लाचारीच झाली.

आपलेच नेते असतात. आपल्या सार्वजनिक कामांसाठीच त्यांची नियुक्ती असते. अशा वेळी एखादे काम झाले तर त्याची गावभर प्रसिद्धी करून काय मिळते. लोकांना काम होण्याशी मतलब असतो. पण हल्ली लाळघोटेपणा करणे हीच काय ती राजकारणात खरी निष्ठा बनली आहे. एका महाभागाने तर प्रभावशाली नेत्याला चक्क बंगला गिफ्ट दिल्याची सध्या नाशिकमध्ये जोरदार चर्चा आहे. कोणी फ्लॅट देतो, कोणी प्लॉट तर कोणी बंगल्यांची सजावट करून देतो, हादेखील लाचारीचा अतिरेक म्हणावा लागेल. अर्थात, सध्या राजकारणाची तीच परिभाषा बनली असून संस्कृतीच्या गप्पा या केवळ दिखाव्यासाठीच उरल्या आहेत, असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरू नये.
मो . ९३२५३८३०९२

ताज्या बातम्या

राज-का-रण : आयुक्त तुम्ही सुद्धा…!

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक मालेगाव महापालिकेच्या पंचवीस वर्षांच्या कारभाराचा पट भ्रष्ट कारवायांनी झाकोळला आहे. रवींद्र जाधव यांच्या लाचखोरीमुळे काळ्याकुट्ट कारभारावर...