कारखान्यांच्या पुनरुज्जीवनासाठी विशेष समिती
मुंबई | प्रतिनिधी
सहकाराची पंढरी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात सहकारी साखर कारखानदारीला घरघर लागल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. दोन दशकांपूर्वी राज्यात २०० पेक्षा अधिक सहकारी साखर कारखाने कार्यरत होते. मात्र, मागील २५ वर्षांत प्रत्यक्ष गाळप करणाऱ्या सहकारी साखर कारखान्यांची संख्या १०० च्या आत आली असून, स्वबळावर गाळप करणारे कारखाने केवळ ७५ च्या आसपास उरले आहेत. साखर कारखान्यांच्या या घटत्या संख्येने चिंताक्रांत झालेल्या सरकारने सहकारी साखर कारखान्यांच्या पुनरुज्जीवनासाठी विशेष समिती गठीत केली आहे. सहकार विभागाने सोमवारी यासंदर्भतील शासन निर्णय जारी केला.
राज्यातील सहकारी साखर कारखाने सुरू राहावेत, त्यांची आर्थिक स्थिती सुधारावी आणि अडचणीत आलेले कारखाने पुन्हा सुरु व्हावेत, यासाठी सहकार विभाग आणि महाराष्ट्र राज्य सहकारी विकास बँकेच्या संयुक्त अभ्यासातून नवीन मॉडेल तयार करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यासाठी साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली १३ जणांची विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीला दोन महिन्यांच्या आत सविस्तर अहवाल आणि शिफारशी सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सहकार विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यात सन २००० पर्यंत २०० पेक्षा अधिक सहकारी साखर कारखाने कार्यरत होते. मात्र, गेल्या २५ वर्षांत आर्थिक अडचणी, अवसायन प्रक्रिया आणि अन्य कारणांमुळे अनेक कारखाने बंद पडले किंवा त्यांची विक्री झाली. आजच्या घडीला ३० ते ३२ सहकारी साखर कारखाने खासगी व्यवस्थापनामार्फत भाडेतत्त्वावर अथवा सहयोगी तत्त्वावर चालविले जातात. त्यामुळे स्वतःच्या बळावर गाळप हंगाम घेणाऱ्या सहकारी कारखान्यांची संख्या घटून ती ७५ वर आली आहे.
विशेष म्हणजे, गेल्या दोन वर्षांत शासन हमीवर एनसीडीसीमार्फत ३३ सहकारी साखर कारखान्यांना अर्थसहाय्य मिळाले. मात्र, ही मदत मिळूनही संबंधित कारखान्यांची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे सक्षम झाली नाही. त्यामुळे सहकारी साखर उद्योगाच्या सद्यस्थितीची कारणमीमांसा करून दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज शासनाने अधोरेखित केली आहे.




